अमळनेर – धार्मिकेतसह समाजकार्यात नेहमी अग्रेसर असणार्या येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेला सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभाग, महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘समाजभूषण’ पुरस्कार देऊन १२ मार्च या दिवशी सन्मानित करण्यात आले.
मुंबई येथील जमशेद भाभा नाट्यगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, युवक आणि क्रीडामंत्री संजय बनसोडे, आमदार संजय सावकारे, सचिव ओमप्रकाश बकोरिया यांच्या प्रमुख उपस्थितीत अन् शुभहस्ते मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले आणि सहसचिव दिलीप बहिरम यांनी पुरस्कार स्वीकारला.
संस्थेच्या वतीने धार्मिकतेसह नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम निरंतर राबवले जातात. प्रतिवर्षी सहस्रो गरीब आणि गरजू विद्यार्थी यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, गरजू रुग्णांना विनामूल्य वैद्यकीय सेवा, अंधश्रद्धा निर्मूलन, हुंडाबंदी, राष्ट्रप्रेम, व्यसनमुक्ती, शेतकर्यांसाठी मार्गदर्शनपर विविधांगी कार्यशाळा, पर्यावरणपूरक उपक्रम आदी कार्याची महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागाने नोंद घेत २५ सहस्र रोेख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन संस्थेला भव्यदिव्य कार्यक्रमात सन्मानित केले.