स्टेट बँक ऑफ इंडियाकडून निवडणूक रोख्यांची सर्व माहिती निवडणूक आयोगाला सादर

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा परिणाम !

सर्वोच न्यायालय

नवी देहली – सर्वोच न्यायालयाच्या कडक आदेशानंतर निवडणूक रोख्यांविषयीची सर्व माहिती अखेर स्टेट बँक ऑफ इंडियाने (एस्.बी.आय.ने) निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. ही माहिती लवकरच निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसारित करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने ‘एक्स’वरून ही माहिती दिली. १० मार्चला झालेल्या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाला १२ मार्चपर्यंत सर्व माहिती निवडणूक आयोगाला सादर करण्याचा आदेश एस्.बी.आय. दिला होता. एस्.बी.आय.ने ‘ही माहिती देण्यास आधी ४ मास लागतील’ असे सांगितले होते. त्यावर न्यायालयाने कठोर टीपणी केली होती.

१५ फेब्रुवारी या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून घोषित करण्यात आलेली निवडणूक रोखे योजना रहित केली होती. ही योजना घटनाविरोधी असल्याचे न्यायालयाने म्हटले होते, तसेच वर्ष २०१९ पासूनची सर्व माहिती निवडणूक आयोगाला सादर करण्याचा आदेशही न्यायालयाने एस्.बी.आय.ला दिला होता. यासाठी न्यायालयाने ६ मार्चपर्यंतची समयमर्यादा दिली होती. त्यानंतर एस्.बी.आय.ने ही समयमर्यादा वाढवून देण्याची मागणी करणारा अर्ज सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता; मात्र हा अर्ज फेटाळत न्यायालयाने एस्.बी.आय.ला फटकारत १२ मार्चच्या सायंकाळी ५ पर्यंत ही संपूर्ण माहिती निवडणूक आयोगाला सादर करण्याचा आदेश दिला होता.

संपादकीय भूमिका

  • ज्या गोष्टीला ४ मास लागणार, असे सांगणारी एस्.बी.आय. अवघ्या ४८ घंट्यांत तीच माहिती सादर करू शकते, हे कसे काय ? याचा अर्थ एस्.बी.आय. न्यायालयाची दिशाभूल करण्याचा आणि खोटे सांगण्याचाच प्रयत्न करत होती, असेच म्हणायला हवे ! ‘अशा बँका जनतेशी कशा वागत असतील’, याची कल्पना करत येत नाही !