मैंदर्गी आणि अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) येथे प्रसार सेवा करतांना कु. वर्षा जेवळे यांना संतांसंदर्भात आलेली अनुभूती, तसेच धर्मप्रेमी, वाचक आणि हितचिंतक यांच्याकडून मिळालेला प्रतिसाद यांविषयीच्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. जाहीर प्रवचनाच्या वेळी पू. दीपाली मतकर यांचे सूक्ष्मातून दर्शन होणे आणि प्रवचन निर्विघ्नपणे पार पडणे
‘मैंदर्गी (जिल्हा सोलापूर) येथील जाहीर प्रवचन मी आणि सहसाधक घेणार होतो. त्या वेळी ‘पू. दीपाली मतकर (सनातन संस्थेच्या ११२ व्या [समष्टी] संत, वय ३५ वर्षे) उपस्थित असत्या, तर सेवा आणखी परिपूर्ण झाली असती, तसेच त्यांचे आशीर्वाद आणि चैतन्य अनुभवता आले असते’, असे मला वाटत होते. पू. दीपालीताईंना अन्य सेवांमुळे त्या ठिकाणी येता आले नव्हते. मी सभागृहात पूर्वसिद्धता करत होते. त्या वेळी ग्रंथ प्रदर्शनीची सेवा करणार्या एका साधिकेच्या ठिकाणी मला पू. दीपालीताईंचे दर्शन झाले. त्यानंतर अन्य एका साधिकेच्या ठिकाणी मला पू. दीपालीताईंचे दर्शन झाले. असे एकूण ३ वेळा झाले. ते प्रवचन निर्विघ्नपणे पार पडले. त्या वेळी ‘संत सूक्ष्मातून कार्य करतात’, हे मला अनुभवता आले.
२. अक्कलकोट येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी सर्वतोपरी साहाय्य करणे
अक्कलकोट येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्याचे ठरले होते. याविषयी आम्ही ५ साधक तेथील एका लोकप्रतिनिधींना भेटण्यासाठी गेलो. प्रत्यक्षात आम्ही सर्वजण प्रथमच एवढ्या मोठ्या संपर्कसेवेसाठी गेलो होतो. लोकप्रतिनिधींना भेटण्यासाठी आम्ही रांगेत उभे राहिलो. तिथे पुष्कळ गर्दी होती. त्या वेळी आम्ही परम पूज्य गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आणि अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांना प्रार्थना करू लागलो, ‘योग्य ते तुम्हीच बोलून घ्या, आमच्याकडून विषय सांगून घ्या.’ त्या गर्दीमध्येही लोकप्रतिनिधींनी आम्हाला पाहिले आणि थोडा वेळ थांबण्यास सांगितले. त्यानंतर ते आम्हाला म्हणाले, ‘‘तुम्हाला काय हवे ? ते तुम्ही सांगा.’’ त्यानंतर त्या लोकप्रतिनिधींनी विविध गोष्टींसाठी आम्हाला साहाय्य केले. गुरुकृपेने आम्हाला हे अनुभवता आले.
३. नवीन सेवा करणार्या धर्मप्रेमींनी पुढाकार घेऊन हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रसार करणे
अक्कलकोट येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रसारासाठी साधक अल्प होते. त्या वेळी नवीन सेवा करणार्या धर्मप्रेमींनी स्वतः पुढाकार घेऊन अनुमाने २० बैठकांचे आयोजन केले. त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन वैयक्तिक निमंत्रणे दिली. या सभेसाठी ५०० लोकांची उपस्थिती लाभली. सर्वांकडून गुरुदेवांनीच सेवा करवून घेतली.
४. अक्कलकोट येथील हिंदु संघटक मेळाव्याचे आयोजन आणि सेवा यांमध्ये धर्मप्रेमींनी पुढाकार घेणे
अक्कलकोट येथे हिंदु संघटक मेळावा घेण्याचे ठरवले होते. सभेच्या माध्यमातून कृतीशील झालेल्या ४ धर्मप्रेमींनी संघटन मेळाव्याचा प्रसार केला, तसेच १४ धर्मप्रेमींनी आयोजनाच्या सर्व समित्या, सभागृह पहाणे, आसंद्यांची रचना करणे, सभागृह सजावट, व्यासपीठ सिद्धता इत्यादी सेवांमध्ये सहभाग घेतला. प्रथमच सर्व धर्मप्रेमींनी अशा प्रकारे आयोजनात पुढाकार घेतला. यावरून ‘देव येथील धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींना घडवत आहे’, असे मला अनुभवता आले.’
– कु. वर्षा जेवळे, सोलापूर (२४.७.२०२३)
|