प्रेमळ आणि संत अन् साधक यांच्याप्रती भाव असलेले क्षेत्रमाहुली, सातारा येथील श्री. सुनील नामदेव लोंढे आणि सौ. सुलभा सुनील लोंढे !

‘फाल्गुन शुक्ल पंचमी (१४.३.२०२४) या दिवशी क्षेत्रमाहुली, सातारा येथील श्री. सुनील नामदेव लोंढे आणि सौ. सुलभा सुनील लोंढे यांच्या विवाहाला ३४ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त सनातनच्या आश्रमात राहून साधना करणार्‍या त्यांच्या मुलीच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. सुनील लोंढे आणि सौ. सुलभा लोंढे यांना विवाहाच्या ३४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !

१. श्री. सुनील नामदेव लोंढे (वडील) यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

श्री. सुनील नामदेव लोंढे

१ अ. इतरांना साहाय्य करणे : ‘माझे वडील कुटुंबात सर्वांत मोठे असल्यामुळे त्यांच्यावर घराचे दायित्व होते. ते घरातील आणि शेजारच्या व्यक्तींना व्यवहारातील अडचणी सोडवण्यासाठी मनापासून साहाय्य करतात. त्यांनी गावातील अनेक व्यक्तींना नोकरीला लावले आहे. ते लोक अजूनही बाबांची आठवण काढतात.

१ आ. प्रेमभाव : बाबांना इतरांना काहीतरी द्यायला आवडते. ते नातेवाईक किंवा साधक यांच्याकडे जातांना त्यांना आवडेल असा खाऊ घेऊन जातात. मी घरून आश्रमात जातांना ते साधक आणि माझ्या मैत्रिणी यांचा विचार करून खाऊ देतात. त्यांना ‘साधकांना किती देऊ’, असे वाटते. एकदा मी बाबांना ‘एका साधकाला ‘स्ट्रॉबेरी’ आवडतात’, असे सहज सांगितले. त्यांनी ते लक्षात ठेवून एका शेतकर्‍याकडून ताज्या ‘स्ट्रॉबेरी’ आणल्या आणि त्या साधकासाठी पाठवल्या.

१ इ. मुलीला साधनेसाठी साहाय्य करणे : मी घरी असतांना बाबा तेथे जवळपास रहाणार्‍या साधकांची माझ्याशी भेट घालून देण्याचा प्रयत्न करतात. बाबा माझ्याशी भ्रमणभाषवर बोलतांना व्यावहारिक गोष्टी न बोलता साधनेविषयीच बोलतात.

१ ई. कृतज्ञताभावात रहाणे : एकदा मी बाबांना माझा भ्रमणभाष ‘रिचार्ज’ करायला (पैसे भरायला) सांगितले होते. दुसर्‍या दिवशी ते देवपूजा करत असतांना त्यांना त्याविषयी आठवले. तेव्हा त्यांनी ‘रिचार्ज’ करण्यासाठी भ्रमणभाष हातात घेतला आणि मी पाठवलेला ‘आजच्या ऐवजी उद्या ‘रिचार्ज’ करावे’ हा संदेश वाचला. त्या वेळी त्यांनी मला पुढील संदेश पाठवला. ‘मी पूजा करत असतांना गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) मला तुझा भ्रमणभाष ‘रिचार्ज’ करायचा आहे’, याचे स्मरण करून दिले; म्हणून मी भ्रमणभाष चालू केला. तेव्हा तुझा ‘आज ‘रिचार्ज’़ नाही केला, तरी चालेल. उद्या ‘रिचार्ज’ करा. एका दिवसाचे पैसे वाया नको जायला’, असा संदेश वाचला. त्या वेळी ते मला म्हणाले, ‘‘मी विसरलो होतो; पण देवालाच माझी किती काळजी आहे !’’ ते नेहमी म्हणतात,

आवडीनें भावें हरिनाम घेसी ।
तुझी चिंता त्यासी सर्व आहे ।। १ ।।

नको खेद धरूं कोणत्या गोष्टीचा ।
पति तो लक्ष्मीचा जाणतसे ।। २ ।।

– संत एकनाथ महाराज

१ उ. संतांप्रती भाव

१. देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात सद्गुरु राजेंद्र शिंदे यांची उग्ररथ शांती (वयाच्या ६० व्या वर्षी करायचा विधी) होती. मी बाबांना त्याविषयी सांगितले. तेव्हा बाबांनी देवद आश्रमातील एका साधिकेच्या साहाय्याने सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना शाल आणि श्रीफळ अर्पण केले.

२. एकदा आई-बाबांना सातारा येथे एका संतांसाठी महाप्रसाद बनवून पाठवण्याची सेवा मिळाली होती. तेव्हा आईने केलेले जेवण डब्यात भरण्यापूर्वी बाबांनी थोडा वेळ अन्न ठेवलेल्या भांड्याच्या सभोवती नामपट्ट्यांचे मंडल घातले. त्यानंतर त्यांनी ते अन्न डब्यांमध्ये भरले.

३. एकदा आईला एका संतांसाठी खोबर्‍याच्या वड्या बनवून द्यायच्या होत्या. तेव्हा आई अकस्मात् रुग्णाईत झाली. तेव्हा बाबांनी संतांसाठी खोबर्‍याच्या वड्या बनवून दिल्या. देवाच्या कृपेने त्या वड्या चविष्ट झाल्या.

२. सौ. सुलभा सुनील लोंढे (आई) यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

सौ. सुलभा सुनील लोंढे

२ अ. प्रेमभाव

१. मी रामनाथी आश्रमातून घरी गेल्यावर आई मला प्रतिदिन माझ्या आवडीचे पदार्थ करून खाऊ घालते. एकदा मी आश्रमात येण्याच्या आदल्या दिवशी तिने मला आवडणारी भाजी करायला घेतली होती. त्या वेळी माझ्या भावाने आईला अन्य पदार्थ करायला सुचवले. तेव्हा दिवसभराच्या कामामुळे ती दमलेली असूनही तिने ते पदार्थ करण्याची सिद्धता दर्शवली. तिचा तो उत्साह आणि मुलांविषयीचे प्रेम पाहून मला पुष्कळ आश्चर्य वाटले.

कु. श्रद्धा लोंढे
कु. श्रद्धा लोंढे

२. मी घरून आश्रमात येतांना आई माझ्यासाठी आणि साधकांसाठी खाऊ बनवून देते, तसेच अन्य वेळी आश्रमात जाणारे कुणी साधक असतील, तर त्यांच्या समवेत मला आणि साधकांना खाऊ पाठवते. ‘तुझ्या आईने बनवलेल्या पदार्थात तिच्यातील भावाची स्पंदने जाणवतात’, असे मला काही साधकांनी सांगितले.

२ आ. मुलीकडे साधिकेच्या भूमिकेतून पहाणे : माझी आई माझ्याकडे ‘मुलगी’ या नात्याने न पहाता ‘एक साधिका’ या भूमिकेतून पहाते. आई माझ्याशी नेहमी साधनेविषयी बोलते. ती मला तिला शिकायला मिळालेली सूत्रे सांगते. ती मला ‘एखाद्या प्रसंगात साधनेचा दृष्टीकोन कसा ठेवायला हवा ? किंवा स्वयंसूचना कशी घ्यायची ?’, याविषयी प्रांजळपणे विचारते. एकदा मी घरी असतांना एका सत्संगात भावजागृतीचा प्रयोग सांगितला. तेव्हा आईची भावजागृती झाली आणि तिला अनुभूती आली.

२ इ. व्यष्टी साधनेची तळमळ : आईला सकाळी लवकर उठून बाबा आणि आजी यांच्यासाठी डबा बनवावा लागतो, तसेच तिच्याकडे माझ्या ताईची मुलगी सांभाळण्यासाठी असते. हे सर्व करत असतांना ती प्रतिदिन भ्रमणभाषवर व्यष्टी साधनेचा आढावा देते. ती नियमित स्वयंसूचना सत्रे आणि नियमित नामजपादी उपायही करते. ती यात कधीच सवलत घेत नाही.

२ ई. तळमळीने सेवा करणे 

२ ई १. आश्रम स्वच्छतेची सेवा भावपूर्ण करणे आणि गुरुदेवांनी संबंधित साधकांना प्रसाद देणे : आईला एकदा रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील स्वच्छतेची सेवा करण्याची संधी मिळाली होती. प्रत्यक्षात तिला शारीरिक सेवा करणे कठीण आहे; परंतु याविषयी तिने गार्‍हाणे न करता उत्साहाने आणि भावपूर्णपणे सेवा केली. तिचा तो उत्साह आणि सेवाभाव पाहून ‘मी आश्रमात रहात असूनही माझा सेवाभाव किती अल्प पडतो !’, हे देवाने माझ्या लक्षात आणून दिले. तिने या कालावधीत सलग ८ दिवस सेवा केली. एक दिवस तिला शारीरिक त्रास झाल्यामुळे ती खोलीत विश्रांतीसाठी आली. तेव्हाही तिने केवळ १५ मिनिटेच विश्रांती घेतली आणि ती पुन्हा सेवेला गेली. सर्व साधकांनी इतक्या भावपूर्ण सेवा केली की, त्यांची सेवा गुरुदेवांच्या चरणांपर्यंत पोचली आणि त्यांनी ‘सेवा छान झाली’, असा निरोप पाठवून संबंधित साधकांसाठी प्रसाद पाठवला.

२ ई २. घरातील कामात अतिशय व्यस्त असतांनाही नियमित आणि भावपूर्ण सेवा करणे अन् सद्गुरु स्वाती खाडये यांनी आईचे कौतुक करणे : माझी मोठी बहीण रुग्णाईत असतांना आई तिच्याकडे ६ मास राहिली होती. तेव्हा आई प्रतिदिन बहिणीच्या लहान मुलींना सांभाळणे, ७ – ८ जणांचा स्वयंपाक करणे आणि घरातील अन्य कामे करणे, असे करत असे. त्या वेळी ती घरकामात एवढी व्यस्त असतांनाही बाहेर जाऊन ३ – ४ घंटे प्रचारसेवा करत असे. मी आईला विचारल्यावर ती मला म्हणाली, ‘‘घरातील कामे करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. ती ऊर्जा मला ३ – ४ घंटे केलेल्या सेवेतून मिळते. त्यामुळे मी प्रतिदिन सेवा करते.’’ आईने अशा परिस्थितीत केलेल्या सेवेविषयी सद्गुरु स्वाती खाडये यांना समजले. तेव्हा त्यांनी आईला सांगितले, ‘‘तुमची सेवा गुरुचरणांपर्यंत पोचली.’’

३. आई-वडिलांची जाणवलेली सामूहिक गुणवैशिष्ट्ये

३ अ. घराविषयी कृतज्ञताभाव असणे : आमचे घर लहान असल्यामुळे मला कुणाला घरी बोलवतांना संकोच वाटत असे. तेव्हा आई-बाबा मला म्हणाले, ‘‘या घरामुळेच आपल्याला आश्रय मिळाला आणि आपण या घरात आल्यापासूनच साधना करू लागलो आहोत. त्यामुळे घरातही चैतन्य निर्माण झाले आहे. अशा घराविषयी आपल्या मनात नेहमी सकारात्मकता आणि कृतज्ञताभाव असायला हवा.’’

३ आ. घर आश्रमाप्रमाणे चैतन्यमय वाटणे : आमच्या घरी आई आणि बाबा दोघेच असतात. ते घरात सात्त्विक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे घरातही अनेक चांगले पालट झाले आहेत. देवघरातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र गुलाबी रंगाचे झाले आहे. बाहेरील व्यक्तींना घरात आल्यावर मंदिराप्रमाणे वाटते. मलाही आश्रमातून घरी गेल्यावर ‘घर म्हणजे आश्रमच आहे’, असे वाटते. घरातील चैतन्यामुळे माझ्यावर अनिष्ट शक्तींचा परिणाम अल्प होतो.

३ इ. साधकांप्रती भाव : आश्रमातील साधक आमच्या घरी आल्यावर आई-बाबांना ‘साक्षात् गुरुदेवच घरी आले आहेत’, असे वाटते. ते साधकांसाठी अधिकाधिक करण्याचा प्रयत्न करतात. आई-बाबांची साधकांशी प्रथम भेटीतच जवळीक साधली जाते. आई-बाबांना भेटून आलेले साधक मला सांगतात, ‘‘तुझे आई-बाबा पुष्कळ प्रेमळ आहेत. तुमच्या घरी गेल्यावर आम्हाला आमच्याच घरी गेल्यासारखे वाटले.’’

३ ई. नाती दैवी बालिका असल्याबद्दल कृतज्ञता वाटणे : माझ्या सर्वांत मोठ्या बहिणीला २ मुली आहेत आणि दुसर्‍या बहिणीला एक मुलगी आहे. या तिन्ही मुली दैवी बालिका असल्याचे समजल्यापासून आई आणि बाबा त्या तिघींसाठीची प्रत्येक कृती सेवा म्हणूनच करतात. आमच्या घरात दैवी बालके असल्याबद्दल बाबांना कृतज्ञता वाटून त्यांची भावजागृतीही होते.

‘श्री गुरूंनी मला साधक आई-बाबांच्या पोटी जन्माला घालून साधनेचा मार्ग दाखवला’, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. ‘गुरुदेवांनीच माझ्याकडून त्यांना अपेक्षित अशी साधना करून घ्यावी’, अशी त्यांच्या कोमल चरणी प्रार्थना आहे.’

– कु. श्रद्धा लोंढे (मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.११.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक