डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील अंतिम युक्तीवाद
पुणे – पंच विनय केळकर आणि किरण कांबळे यांनी ‘मुख्य संशयित शरद कळसकर अन् सचिन अंदुरे यांची छायाचित्रे ओळखली’, असा दावा ‘सीबीआय’कडून करण्यात आला आहे. वास्तविक हे करतांना ‘असे संशयित कसे ओळखावेत ?’, या संदर्भातील सीबीआयचे २००५ चे ‘क्रिमिनल मॅन्युअल’ (गुन्हेगारांची पुस्तिका), उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांनी वेळोवेळी घालून दिलेले सर्व निर्देश पायदळी तुडवण्यात आलेले आहेत. दोन्ही संशयितांना ऑगस्ट २०१८ मध्ये अटक केल्यानंतर पुढे ३ मास काहीच करण्यात आले नाही. पंचांना केवळ याच २ संशयितांची छायाचित्रे दाखवण्यात आली. संशयितांची ओळख परेड घेणे शक्य असतांना ती घेण्यात आली नाही, याच संदर्भात वर्ष २०१८ मध्ये छायाचित्र ओळखल्याचा पंचनामा आणि प्रत्यक्ष न्यायालयात नोंदवण्यात आलेली पंचांची साक्ष यांत तफावत आहे. त्यामुळे संशयित शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांची छायाचित्रे ओळखल्याचा सीबीआयकडून केवळ ‘फार्स’ करण्यात आला आहे. परिणामी हा पंचनामा खोटा आहे, असा युक्तीवाद मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केला. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश पी.पी. जाधव यांच्या न्यायालयात चालू असून केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (‘सीबीआय’कडून) विशेष सरकारी अधिवक्ता प्रकाश सूर्यवंशी हे या वेळी उपस्थित होते. या प्रकरणातील पुढील युक्तीवाद बुधवार, १३ मार्चला होणार आहे.
हत्येचे अन्य कोणत्याही कारणांनी अन्वेषण न करता केवळ ‘सनातन संस्थे’ला लक्ष्य करण्याच्या उद्देशानेच केले सर्व अन्वेषण !
१. डॉ. दाभोलकर यांच्या शर्टाच्या खिशात मिळालेल्या डायरीत ‘२५ लाख द्या; जिवे मारण्याच्या धमक्या’, असे खोडलेले वाक्य आहे, ते कशाशी संबंधित आहे ? याचे कधीच अन्वेषण का करण्यात आले नाही ? डॉ. दाभोलकर यांच्या ‘डायरी’त सनातन संस्थेशी संबंधित कोणत्याही गोष्टींचा कोणत्याही प्रकारचा उल्लेख नाही
२. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वर्ष २०१३ च्या दिवाळी अंकात जात पंचायतीविषयी भाष्य करण्यात आले होते, तसेच वर्ष २०१२ च्या दिवाळी अंकात महाराष्ट्रातील विविध दर्ग्यात चालणारे अघोरी प्रकार यांवर भाष्य करण्यात आले होते. तेव्हा या दोन्हींच्या विरोधातून डॉ. दाभोलकर यांची हत्या झाली का ? या दृष्टीने हत्येचे अन्वेषण का करण्यात आले नाही ?
३. या प्रकरणातील सर्व साक्षीदार आणि पंच यांचा डॉ. दाभोलकर करत असलेल्या अन्य अनेक कार्याच्या, त्यांनी अनेक ठिकाणी केलेल्या विरोधाच्या गोष्टी माहिती होत्या; मात्र त्या पैकी कुणी काहीच बोलण्यास सिद्ध नाही. अगदी अन्वेषण यंत्रणांनीही याचे विविधांगी अन्वेषण न करता हत्येचे केवळ न केवळ ‘सनातन संस्थे’ला लक्ष्य करण्याच्या उद्देशानेच सर्व अन्वेषण केले.
अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्या युक्तीवादातील अन्य काही सूत्रे !
१. पंच विनय केळकर हे ‘मी पंचनाम्याच्या प्रसंगी छायाचित्रे ओळखली; मात्र हेच ते दोघे संशयित होते का ? हे मी ठामपणे सांगू शकत नाही’, असे सांगितले आहे.
२. आरोपी २ मास कारागृहात असतांना त्यांची ओळख परेड घेण्यात आली नाही. साक्षीदार हे रहायला पुण्यातच होते, तरीही ओळख परेड घेण्यात आली नाही. पंच संशयितांना ओळखू शकणार नाहीत, हे माहिती असल्यानेच छायाचित्र ओळखल्याचा खोटा पुरावा सिद्ध करण्यात आला !
३. ‘जे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत’, असे सांगितले जाते, ते कधीच उपस्थित नव्हते.
४. ‘अनेक छायाचित्रे दाखवण्यात आली आणि त्यातून संशयितांची छायाचित्रे ओळखली’, असे न होता केवळ दोघांचीच छायाचित्रे दाखवण्यात आली.
५. पोलीस अधिकार्यांच्या समोरच छायाचित्र ओळखण्यात आली, जे कधीही ग्राह्य धरले जाऊ शकत नाही.
डॉ. हमीद दाभोलकर यांच्या साक्षीतील फोलपणा सिद्ध करणारी अधिवक्ता वीरेंद्र यांनी मांडलेली सूत्रे !
१. डॉ. हमीद दाभोलकर यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना ‘तुमचा दुसरा गांधी करू’, अशा सनातनकडून धमक्या आल्याचे सांगितले. जर डॉ. दाभोलकर यांना अशा धमक्या येत होत्या, तर त्या संदर्भातील एकही तक्रार पोलिसांकडे का नोंदवण्यात आली नाही ?
२. डॉ. हमीद यांनी ‘सीबीआय’ला मी सनातन संस्थेच्या विरोधातील तक्रारींचे ‘इ-मेल’ केले’, असे सांगितले; मात्र ‘सीबीआय’ने ‘आमच्याकडे असे कोणतेही इ-मेल आले नाहीत’, असे म्हणते. ‘डॉ. दाभोलकर यांनी आतंकवादविरोधी पथकाकडे सनातन संस्थेच्या विरोधात तक्रार केली होती’, असे डॉ. हमीद यांनी सांगितले. यावर आतंकवादविरोधी पथक ‘आमच्याकडे अशा कोणत्याही प्रकारची तक्रार नाही’, असे सांगते. मग ‘डॉ. हमीद दाभोलकर यांना नेमके काय माहिती आहे ?’, असा प्रश्न निर्माण होतो आणि त्यांची साक्षही कोणत्याच कसोटीवर सत्य उतरत नाही.
अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी १२ मार्चला ५ घंटे युक्तीवाद करत सरकारी पक्ष आणि साक्षीदार यांनी केवळ ‘सनातन संस्थे’लाच लक्ष्य करण्याच्या उद्देशाने कशा प्रकारे साक्षी दिलेल्या आहेत, तसेच उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील विविध दाखले देत विविधांगी युक्तीवाद केला. ‘कोणत्याही संशयितांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा सीबीआय अथवा अन्य कोणतीही अन्वेषण यंत्रणा पुढे आणू शकलेली नाही’, असे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. |