प्रतिमासाला १ सहस्र ५०० बाल मनोरुग्ण !

दूरदर्शनसंच आणि भ्रमणभाष यांचा विपरित परिणाम !

प्रतिकात्मक चित्र

छत्रपती संभाजीनगर – ‘आई, तू मरणार तर नाही ना, मला कायमची सोडून तर जाणार नाही ना, आपल्या घराला ‘डेव्हिल’ जाळून टाकणार आहे, तो ‘व्हिलन’ पुष्कळ ‘डेंजर’ आहे, मला मारील’, अशी धक्कादायक आणि चिंता वाढवणारी वाक्ये आजकाल अनेक घरांतील लहान मुलांच्या तोंडून ऐकायला मिळू लागली आहेत. त्यांच्या वागण्यात विचित्रपणा येत आहे. हा सर्व प्रकार मानसिक आजाराची लक्षणे असून दूरदर्शनसंचावरील नाटके, कार्टून आणि भ्रमणभाष बघून मुलांच्या मनावर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. अलीकडच्या काळात दूरदर्शनसंच (टीव्ही) आणि भ्रमणभाष (मोबाईल) यांच्या अतीवापरामुळे बाल मनोरुग्णांचे प्रमाण वाढत असून प्रतिमासाला अनुमाने १ सहस्र ५०० मुलांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात येत आहे, असे बालरोगतज्ञ डॉ. विनोद तोतला यांनी सांगितले.

२ वर्षांनंतर ३० मिनिटेच टीव्ही दाखवा ! – मानसोपचारतज्ञ

मानसोपचारतज्ञ डॉ. मोनाली देशपांडे यांनी सांगितले की, मुलांची बौद्धिक क्षमता अल्प असते. दूरदर्शनसंच आणि भ्रमणभाष यांच्यासमोर मुलांना बसू देऊ नका. २ वर्षांनंतर ३० मिनिटे, तेही केवळ गोष्टी आणि कविता दाखवा.

लहान मुलांच्या घडलेल्या घटना…

१. पिसादेवी येथील ४ वर्षांचा राज वडील नोकरीला गेल्यानंतर आईसमवेत दिवसभर टीव्ही पहायचा. आईला असलेली नाटक पहाण्याची सवय मुलाला लागली. काही दिवसांत राजच्या डोक्यावर परिणाम होऊन तो नाटकामध्ये ‘आई, तू मला सोडून तर जाणार नाही ना, तू मरणार तर नाही ना, आपल्या घराला ‘डेव्हिल’ (भूत) आग लावेल’, असे सतत बोलू लागला.

२. सिडकोमध्ये रहाणारा ४ वर्षांचा अनिकेत १ वर्षांपासून सतत टीव्हीवर कार्टून बघायचा. ४ वर्षांचा झाला, तरी तो कुणाशीही बोलत नव्हता. गल्लीतील इतर मुलांसमवेत खेळायचाही नाही. टीव्हीवरील कार्टूनसारखे कृत्रिमपणे वावरायचा. आई किंवा वडिलांच्या अनेकदा, अचानक थेट श्रीमुखात मारायचा. ‘स्वयंपाकाचे कुकर बघायचे’, असा हट्ट करत होता.

संपादकीय भूमिका :

  • मोठ्या संख्येने बाल मनोरुग्ण आढळणे, हे सामाजिक आणि कौटुंबिक स्वास्थ्यासमोरील आव्हान समजून प्रशासनाने उपाय योजावेत !
  • ही आहे विज्ञानाची प्रगती ! पालकांनी मुलांना टीव्ही आणि भ्रमणभाष यांच्यापासून दूर ठेवणे किती आवश्यक आहे, हे लक्षात घ्यायला हवे !