पू. (सौ.) मनीषा पाठक यांची पुणे येथील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन येथे दिले आहे. ९.३.२०२४ या दिवशी यातील काही सूत्रे आपण पाहिली. आज पुढील भाग पाहू. (भाग ५)
१९. सौ. राधिका घागरे, चिंचवड, पुणे.
१९ अ. सहसाधकांशी जवळीक साधण्यास शिकवणे : ‘आपल्या सहसाधकांना आपला आधार वाटायला हवा. त्यांना आपल्याशी मोकळेपणाने बोलता आले पाहिजे’, यासाठी कसे प्रयत्न करायचे ?’, हे पू. मनीषाताईंकडून मला शिकायला मिळाले. त्यामुळे मला साधकांशी बोलतांना येत असलेला ताण न्यून झाला. माझी साधकांशी जवळीक होऊ लागली.
१९ आ. सेवा भावपूर्ण करायला शिकवणे : पू. ताईंनी ‘कोणतीही सेवा भावपूर्ण कशी करायची ?’, हे सांगून माझ्याकडून प्रत्यक्ष सेवा करून घेतली. त्यामुळे मला सेवेतील आनंद अनुभवता आला. एकदा मला उत्तरदायी साधकांना जेवणाचे डबे द्यायची सेवा होती. तेव्हा पू. ताई मला म्हणाल्या, ‘‘कोणती भाजी करायची ? कशी करायची ? किती करायची ?’, याविषयी जेवण बनवणार्या साधकाशी बोलायला हवे.’’ हे सर्व सांगून त्यांनी माझ्याकडून ती सेवा करून घेतली. या सेवेत माझी एक चूक झाली. पू. ताईंनी ‘अंतर्मनात गांभीर्य निर्माण होईल’, अशा प्रकारे चूक सांगून ‘ती सुधारायची कशी ?’, याविषयीही मला सांगितले.
१९ इ. पू. मनीषाताईंच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
१. पू. ताई माझ्या व्यष्टी साधनेचा आढावा घेतात. तेव्हा ‘साक्षात् परात्पर गुरु डॉ. आठवले आढावा घेत आहेत’, असे मला वाटते आणि आनंद मिळतो.
२. पू. मनीषाताईंना संत म्हणून घोषित केल्यावर माझा भाव जागृत होऊन मला अखंड कृतज्ञताभाव जाणवत होता. त्या दिवशी माझा केवळ ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव’, असा जप होत होता.’
२०. सौ. कविता तापकीर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ४७ वर्षे), आळंदी, पुणे.
२० अ. प्रेमभाव
१. ‘एकदा सत्संगातील जिज्ञासूंसाठी सद्गुरु स्वाती खाडये यांचे मार्गदर्शन आयोजित केले होते. त्या वेळी त्यांच्या समवेत पू. मनीषाताईही होत्या. पू. मनीषाताईंच्या प्रथम भेटीतच त्यांनी मला एवढ्या प्रेमाने जवळ घेतले की, ‘त्यांची आणि माझी अनेक वर्षांपासून जवळीक आहे’, असे मला वाटले.
२. वर्ष २०२२ मध्ये गुरुदेवांच्या जन्मोत्सवानिमित्त पुण्यात भव्य दिंडी निघाली होती. त्या वेळी माझ्या समवेत काही वारकरी होते. परतीच्या प्रवासाच्या वेळी पू. ताईंनी त्यांच्यासाठी महाप्रसाद बनवून देण्याचे नियोजन केले. या नियोजनात त्या मला सतत मार्गदर्शन करत होत्या. अशी सेवा मी प्रथमच करत होते.
पू. ताई मला सांगत होत्या, ‘‘वारकर्यांना आनंद मिळायला हवा.’’ पू. ताईंमुळे मला ही सेवा परिपूर्ण करता आली. दिंडीच्या दुसर्या दिवशी पू. ताईंनी मला भ्रमणभाष करून विचारले, ‘‘तुम्ही रात्री किती वाजता पोचलात ? महाप्रसाद पुरेसा होता ना ? काही अडचण आली नाही ना ? तुम्ही सर्वांच्या समवेत महाप्रसाद ग्रहण केला का ?’’ त्या वेळी पू. ताईंमधील प्रेमभाव पाहून माझा भाव जागृत झाला.
२० आ. पू. ताईंचा गुरुदेवांप्रतीचा भाव त्यांच्या प्रत्येक शब्दातून व्यक्त होतो. मी त्यांच्या संपर्कात असल्याने माझीही भाववृद्धी होत आहे.
२० इ. पू. मनीषाताईंच्या संत-सन्मान सोहळ्याच्या वेळी आलेल्या अनुभूती
१. व्यासपिठावर असलेले श्रीकृष्णाचे चित्र सजीव वाटत होते आणि त्यातून चैतन्य प्रक्षेपित होत होते.
२. भावजागृतीचा प्रयोग चालू असतांना मला व्यासपिठावर गुरुमाऊलींचे विराट रूपात दर्शन झाले.
२१. सौ. उन्नती खामणकर, पुणे
२१ अ. सद्गुरु स्वाती खाडये यांच्याप्रतीचा भाव : ‘सद्गुरु स्वाती खाडये पुणे येथे असतांना ‘त्यांना कोणत्याही गोष्टीचा त्रास होणार नाही’, असा विचार करून पू. मनीषाताई कृती करत असतात. ‘संतसेवा कशी करायची ?’, हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळते.’
२२. सौ. आरती पांडुरंग कांडलकर, सिंहगड रस्ता, पुणे.
२२ अ. साधिकेच्या मनातील विचार जाणून त्याप्रमाणे कृती करणे : ‘पू. मनीषाताईंमध्ये सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता आहे’, असे मला अनेक प्रसंगांतून अनुभवायला मिळाले. गणेशोत्सव काळात बाजीराव रस्ता (पुणे) येथे सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचा वितरण कक्ष लावला होता. तेथे मला रांगोळी काढण्याची सेवा मिळाली होती. सेवा चालू केल्यानंतर माझ्या मनात ‘मला घरी जाण्यासाठी उशीर होणार नाही ना ?’, असा विचार येत होता. तेव्हा पू. ताई माझ्या जवळ येऊन माझ्या समवेत रांगोळीमध्ये रंग भरू लागल्या. त्या मला म्हणाल्या, ‘‘काही विचार करू नकोस. वेळेवर घरी जाशील.’’
एकदा मी अन्य सेवा करत असतांना मला सायंकाळी उशीर झाला. तेव्हा माझ्या मनात ‘मला घरी लवकर जायला हवे’, असा विचार आला. तेव्हा पू. ताईंनी मला घरी जायला सांगितले.
पू. ताई साधकांशी बोलत असतांना ‘त्या साधकांचे सूक्ष्म स्तरावर निरीक्षण करत आहेत आणि त्यांची आध्यात्मिक स्थिती अन् त्रास हे सर्व अभ्यासत आहेत’, असे मला जाणवते.
२३. सौ. मीना गोले, सिंहगड रस्ता, पुणे.
२३ अ. सौ. मनीषाताई संत होण्याच्या संदर्भात मिळालेली पूर्वसूचना : ‘१४.३.२०२३ या दिवशी पहाटे ५ वाजता मला जाग आली आणि देवाच्या कृपेने माझा नामजपही झाला. नामजप करतांना माझ्या मनात विचार आला, ‘पू. मनीषाताई संत होतील !’ आणि त्याच दिवशी मनीषाताईंना संत म्हणून घोषित करण्यात आले.’
२४. सौ. चारुलता पानघाटे, पुणे
२४ अ. साधिकेची गुरुदेवांवरील श्रद्धा वृद्धींगत करणे : ‘पू. मनीषाताईंनी आध्यात्मिक दृष्टीकोन देऊन अडचणींवर मात करण्यासाठी मला साहाय्य केले. पू. ताईंनी माझ्या मनावर बिंबवले, ‘प.पू. गुरुदेवांवर श्रद्धा ठेवा आणि साधना करा. प.पू. गुरुदेव काळजी घेतील.’ त्यांनी माझी गुरुदेवांवरील श्रद्धा दृढ केली.’ (क्रमशः)
(सर्व सूत्रांचा दिनांक : १६.३.२०२३)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |