नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा अर्ज फेटाळला !

पिंपरी – शहरातून वहाणार्‍या पवना, इंद्रायणी नद्यांचे पुनरुज्जीवन करतांना नदीची वाहन क्षमता अल्प होता कामा नये. नदीचे शुद्धीकरण झाले पाहिजे, तसेच पर्यावरणीय समतोल साधला जाईल, याची काळजी घ्यावी. त्या संदर्भात केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र यांच्याकडून पडताळणी करून नव्याने अर्ज सादर करण्याचे निर्देश राज्य पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाने महापालिकेला दिले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्या वहातात. तीनही नद्यांसाठी एकूण ३ सहस्र ५०६ कोटी रुपयांचा खर्च महापालिका करणार आहे. नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबवण्यासाठी राज्यशासनाच्या राज्य पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाची अनुमती आवश्यक आहे. यासाठी महापालिकेने अनुमतीचा अर्ज केला होता; मात्र तो फेटाळण्यात आला. भारतीय मानकशास्त्राचे पालन करावे, तसेच पर्यावरणीय समतोल साधना जावा, या संदर्भात केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन यांच्याकडून पडताळणी करून अर्ज संमतीसाठी पाठवण्याची सूचना राज्य पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाने केली. त्यामुळे महापालिकेने पडताळणी करून घेतली असून संमतीसाठी अर्ज करणार आहे.