दुप्पट तिकीट आकारून महाशिवरात्रीला घारापुरी येथे येणार्‍या भाविकांची आर्थिक लूट !

मुंबई – महाशिवरात्रीच्या दिवशी घारापुरी येथील प्राचीन शिवमंदिरात दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना तिकिटात सवलत द्यावी, अशी विनंती स्वत: घारापुरी ग्रामपंचायतीकडून महाराष्ट्र सागरी मंडळाकडे (मेरिटाईम बोर्ड) करण्यात आली होती. यावर कार्यवाही दूरच उलट महाशिवरात्रीच्या दिवशी तिकिटात दुप्पट वाढ करून महाराष्ट्र सागरी मंडळाने भाविकांची आर्थिक लूट केली. महाराष्ट्र सागरी मंडळाकडून दुपटीहून अधिक तिकीट आकारण्याला मिळालेल्या मान्यतेवरून ८ मार्च या दिवशी मोरा (तालुका उरण, जिल्हा रायगड) येथून घारापुरी येथे येणार्‍या भाविकांकडून बोटीवाल्यांनी अधिक पैसे उकळले.

घारापुरी गुहा येथील प्राचीन शिवपिंडीचे दर्शन घेण्यासाठी प्रतिवर्षी रायगड जिल्ह्यातील शेकडो भाविक मोरा बंदर येथून घारापुरी गुहा येथे बोटीतून येतात. या मार्गाचे नियमित प्रवासाचे येण्याजाण्याचे तिकीट प्रत्येकी ३०-३० रुपये इतके आहे; मात्र ८ मार्चला महाशिवरात्रीला दर्शनासाठी येणार्‍या प्रत्येक भाविकांकडून बोटीवाल्यांनी येण्या-जाण्याचे प्रत्येकी ६५-६५ असे एकूण १३० रुपये उकळले. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या मान्यतेनेच बोटीवाल्यांनी तिकीटदरात वाढ केली. प्रतिवर्षी तिकिटात वाढ करण्यात येत असून महाशिवरात्रीला येणार्‍या शेकडो भाविकांची मागील अनेक वर्षांपासून अशा प्रकारे लूट चालू आहे.

महाराष्ट्र सागरी मंडळाकडून राज्याच्या अंतर्गत असलेल्या जलवाहतुकीचा तिकीटदर निश्चित केला जातो. त्यामुळे घारापुरी ग्रामपंचायतीने २७ फेब्रुवारी या दिवशी महाराष्ट्र सागरी मंडळ, तसेच मोरा बंदर अधिकारी यांच्याकडे महाशिवरात्रीच्या दिवशी बोटीच्या प्रवासाचे तिकिटदर अल्प करण्याची विनंती करणारे पत्र दिले होते.

बोटीच्या प्रवासाचे तिकिटदर अल्प करण्याची विनंती करणारे पत्र

संपादकीय भूमिका 

  • हिंदूंच्या सणांच्या वेळी आर्थिक लूट करणार्‍या महाराष्ट्र सागरी मंडळावर सरकार कारवाई करणार का ?
  • महाराष्ट्र सागरी मंडळाचा हिंदुद्रोही कारभार !