मिनियापोलीस (अमेरिका) येथील ‘इंटरनॅशनल नाईट’ या कार्यक्रमात भारतीय संस्कृतीचे दर्शन !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडाची प्रतिकृती आणि अयोध्या येथील प्रभु श्रीरामचंद्र यांच्या मंदिराची प्रतिकृती सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू !

भारतीय संस्कृतीची माहिती सांगतांना सनातन संस्थेच्या साधिका सौ. गौरी कुलकर्णी

मिनियापोलीस (अमेरिका) – येथील ‘आयलँड लेक एलिमेंटरी स्कूल’ येथे प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही ८ फेब्रुवारी २०२४ या दिवशी ‘इंटरनॅशनल नाईट’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात या वर्षी १९ देश सहभागी झाले होते. प्रत्येकाने स्वत:च्या देशातील संस्कृती, परंपरा, खाद्यपदार्थ, पोशाख इत्यादींची मांडणी केली होती. या कार्यक्रमात येथील भारतीय कुटुंबियांनीही सहभाग घेतला होता. या वेळी भारताचे प्रतिनिधित्व करतांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडाची प्रतिकृती आणि अयोध्या येथील प्रभु श्रीरामचंद्र यांच्या मंदिराची प्रतिकृती ठेवण्यात आली होती. या प्रतिकृती सर्वांचे आकर्षण ठरले. याविषयी माहिती सांगणारी काही छायाचित्रेही तेथे लावण्यात आली होती. यामध्ये सनातन संस्थेचे साधक श्री. अभिजित कुलकर्णी, सौ. गौरी कुलकर्णी यांचा सहभाग होता. त्याचप्रमाणे बालसाधिका कु. ईश्वरी कुलकर्णी हिने या कार्यक्रमात ‘मेरे घर राम आये है’ या गाण्यावर नृत्य सादर केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडाची प्रतिकृती

सर्वांना एकमेकांच्या देशातील संस्कृती, परंपरा यांविषयी या माध्यमातून माहिती व्हावी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला जातो. ‘विविधतेत एकता’ अशी या कार्यक्रमाची संकल्पना होती, त्या पद्धतीने भारतियांनी विविध राज्यांतील पोषाख केले होते. कार्यक्रमाच्या वेळी काही देशांनी स्वत:च्या देशातील नृत्यप्रकारही सादर केले. त्याचप्रमाणे फलकावरती भारताविषयी विविध माहिती असणारी (राष्ट्रीय प्रतिके, चलन, नृत्य प्रकार, वाद्ये, पुरस्कार) छायाचित्रे लावण्यात आली होती, तसेच भारतीय पोशाख, आभूषणे इत्यादी पहाण्यासाठी ठेवलेले होते आणि भारतीय पदार्थांचाही सर्वांनी आस्वाद घेतला.

वैशिष्ट्यपूर्ण

कार्यक्रमातील नृत्य सादरीकरणाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री. विल्यम क्युएंदिग यांनी केले. यामध्ये त्यांनी प्रभु श्रीराम यांच्याविषयी, तसेच अयोध्या येथील मंदिराचाही उल्लेख केला.

मुख्याध्यापक श्री. क्युएंदिग यांनी प्रत्येक देशाच्या कक्षावर येऊन माहिती जाणून घेतली.