गुरूंना त्यांच्याबद्दल भाव असणार्या साधकापेक्षा त्यांनी सांगितलेली साधना करणारा अधिक प्रिय असतो ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे सूक्ष्म जगताविषयीचे अनुभव या लेखमालिकेतून आपण पहात आहोत.
९ मार्च या दिवशी या लेखमालेतील काही भाग पाहिला. आज अंतिम भाग पाहूया. (भाग १८)
भाग १७ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/771849.html
‘एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हाला सभोवतालच्या निसर्गाचे परीक्षण करण्यास सांगितले. तेव्हा आम्ही फोंडा (गोवा) येथील ‘सुखसागर’ येथे होतो. आम्ही तेथे बसूनच परीक्षण करण्यास आरंभ केला. परीक्षण केल्यानंतर आम्ही लगेचच गुरुदेवांकडे जाऊन आमचे परीक्षण सांगितले. तेव्हा गुरुदेव म्हणाले, ‘‘अरेच्चा, तुम्ही एवढ्या लवकर बाहेर जाऊन निसर्ग पाहून आलातसुद्धा !’’ त्यावर आम्ही म्हणालो. ‘‘नाही गुरुदेव. आम्ही बाहेर गेलो नाही. येथे बसूनच परीक्षण केले.’’ तेव्हा गुरुदेवांनी परीक्षण करण्यातील आमची चूक आमच्या लक्षात आणून दिली. ते म्हणाले, ‘‘‘सुखसागर’च्या बाहेरच एक उद्यान आहे. तेथे जायला कितीसा वेळ लागतो ? जेथे शक्य आहे, तेथे प्रत्यक्ष जाऊनच परीक्षण केले पाहिजे. त्यामुळे आपली सूक्ष्मातील शक्ती वाचते, नाहीतर असे येथे बसूनच परीक्षण करण्यात आपली साधना व्यय होते.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘आपल्या साधनेची शक्ती अथवा संचय आपण वाचवला पाहिजे. अधिकोषातील बचत खात्यात जमा केलेला पैसा आपण उगीचच व्यय करत नाही ना ? तसेच हे आहे. ‘साधना करतांना ती व्यय होणार नाही’, याचा विचार आपण केला पाहिजे, नाहीतर साधनेतील गुणवत्ता न्यून होत जाते. जसे व्यवहारात आपण जपून पैसा व्यय करतो, तसेच हे आहे. आपले परीक्षण करण्याचे ठिकाण येथून पुष्कळ दूर आहे, तर ठीक आहे; परंतु जवळच्या ठिकाणी मात्र तेथे जाऊनच परीक्षण केले पाहिजे.’’ गुरुदेवांनी आम्हाला परीक्षण करण्यातील पुष्कळ मोठी गोष्ट शिकवली आणि ‘साधनेची शक्ती अनावश्यक व्यय होता कामा नये’, याची शिकवणही दिली.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, चेन्नई, तमिळनाडू. (१.३.२०२२) (समाप्त)
|