हिंदु सुसंघटित होण्यासाठीचे कार्य ‘सेवा भारती’च्या वतीने ! – शैलेंद्र बोरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री. शैलेंद्र बोरकर

कोल्हापूर – महाराष्ट्रात १ सहस्र ८०० हून अधिक ठिकाणी, तर देशभरात १ लाखांहून अधिक सेवा-कार्य हिमालय ते कन्याकुमारीपर्यंत केले जाते. यात शिक्षण, आरोग्य, व्यसनमुक्ती, कुटुंब प्रबोधन, बचत गट अशा विभागांत ‘सेवा भारती’च्या वतीने कार्य केले जाते. तरुणांमध्ये सुसंस्काराचे बीज पेरून अखिल हिंदु समाज सुसंघटित आणि आरोग्यदायी होण्यासाठीचे कार्य ‘सेवा भारती’च्या वतीने डॉ. हेडगेवार फिरते रुग्णालय करत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे प्रांत सेवा शिक्षणप्रमुख श्री. शैलेंद्र बोरकर यांनी केले. ‘सेवा भारती इचलकरंजी’ संचालित डॉ. हेडगेवार फिरत्या रुग्णालयाचा प्रारंभ गेल्या वर्षी विजया एकादशीच्या दिवशी संघांचे दुसरे संघचालक प.पू. माधव गोळवलकर यांच्या जयंतीनिमित्त झाला. त्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी कणेरी मठातील मेंदूविकारतज्ञ डॉ. मरजक्के उपस्थित होते. श्री. गणेश खांडेकर यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. शिवाजी पवार यांनी वर्षभरात कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या सेवा कार्याची माहिती दिली.