Love Jihad : मढी (अहिल्यानगर) येथे लव्ह जिहादचा प्रकार : हिंदु मुलीचे धर्मांतर करून विवाह !

  • ग्रामस्थांचे गावबंद आंदोलन !

  • लव्ह जिहादच्या कचाट्यात अनेक मुलींना फसवण्याचे चालू आहेत प्रयत्न !

अहिल्यानगर – लव्ह जिहाद प्रकरणातून बळजोरीने धर्मांतर घडवून येथील पाथर्डी तालुक्यात असलेल्या मढी येथील तरुणीला फूस लावून पळवून नेत विवाह लावण्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर सर्वपक्षीय ग्रामस्थ आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून पोलिसांना निवेदन दिले. ‘मुलगी परत द्या अथवा परिणामांना सिद्ध रहा’, अशी चेतावणी देत ग्रामस्थांनी मढी गाव बंद ठेवले.

काय आहे प्रकरण ?

१. मढी येथून तरुणीला धर्मांध मुसलमान तरुणाने प्रेम प्रकरणातून फूस लावून पळवून नेले. तिला मुसलमान समाजातील नाव देऊन तिचे लग्न लावण्यात आले. २ दिवसांनी हे जोडपे पोलीस ठाण्यात उपस्थित झाल्यावर ग्रामस्थांना सर्व प्रकार कळाला. कुटुंबीय, नातेवाईक आणि ग्रामस्थ या सर्वांनी पीडितेची समजूत घालण्याचा प्रयत्न केला; पण तणावग्रस्त मन:स्थितीतील मुलगी ऐकण्याच्या सिद्धतेत नसल्याने पोलिसांनी तिची रवानगी महिला सुधारगृहात केली.

२. घटनेच्या दुसर्‍या रात्री अशाच अन्य एका मुलीला फूस लावून पळवण्याचा प्रकार ग्रामस्थांच्या आक्रमकतेमुळे थांबून चांदबीबी महालाच्या परिसरातून संबंधित मुलगी परत आली. ग्रामस्थांनी अन्य मार्गाने चौकशी केली असता अन्य काही मुलींचे आधार कार्ड संशयास्पदरित्या पालटण्यात आल्याची माहिती सरपंच संजय मरकड आणि अन्य ग्रामस्थ यांना समजली. या घटनेची माहिती पंचक्रोशीतील निवडुंगे, घाटशिरस तिसगाव, पारेवाडी, मांडवा शिरापूर, धामणगाव अशा गावांना कळून संपूर्ण परिसर संतप्त झाला.

अनेक गंभीर प्रकार उघडकीस !

भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विद्या गाडेकर यांनी आणि इतर संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कुटुंबियांची भेट घेतली. ग्रामस्थांकडून अन्यही माहिती घेतली असता अनेक गंभीर प्रकार पुढे आले. बळजोरीने धर्मांतर करून तरुणीला काहीतरी प्रकाराने भ्रमित केले असल्याचे उघडकीस आले. धर्मांतराचा अत्यंत गंभीर प्रकार पाथर्डी तालुक्यात होऊनही प्रशासन स्वस्थ आहे, असे संतप्त ग्रामस्थांनी सांगितले.

६ मार्चला ग्रामस्थ, सकल हिंदु समाज आणि अन्य संघटना यांच्या पुढाकाराने मढी येथे ग्रामसभा घेण्यात आली. यामध्ये विविध ग्रामस्थांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया नोंदवून या विरोधात आक्रमकपणे उत्तर देण्याचे धोरण ठरवण्याचा आग्रह धरला. देवस्थानच्या इनामी भूमी देवस्थान समितीकडे अथवा ग्रामपंचायतीकडे वर्ग करून घ्याव्यात, तसेच संबंधित लोकांविरुद्ध आर्थिक देवाणघेवाण बंद करावी, असे या सभेत ठरवण्यात आले.

संपादकीय भूमिका 

लव्ह जिहादच्या प्रकारांनी अक्षरश: संपूर्ण देश ढवळून निघत आहे. यावर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी तातडीने राष्ट्रव्यापी कायदा व्हावा, असे सामान्य हिंदु जनतेला वाटते !