दुबईतून सोन्याची तस्करी करून ते भारतात विकणार्‍या ५ जणांना अटक !

  • महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई !

  • मुंबईत वर्सोवा आणि झवेरी बाजार येथे धाडी  

  • २४ किलो सोन्यासह २ कोटी रोख रक्कम जप्त

मुंबई – महसूल गुप्तचर संचालनालयाने (‘डीआर्आय’ने) मुंबईत वर्सोवा आणि झवेरी बाजार येथे धाडी घातल्या. तस्करी करण्यासाठी दुबईतून भारतात आणलेले १४ किलो सोने अधिकार्‍यांनी जप्त केले असून ५ जणांना अटक करण्यात आली आहे. महंमद रफीक रझवी (वय ५८ वर्षे), महेंद्र जैन (वय ५२ वर्षे) आणि समीर मर्चंट उपाख्य अफझल हारून बटाटावाला (वय ५६ वर्षे), उमेद सिंह (वय २४ वर्षे) आणि महिपाल व्यास (वय ४२ वर्षे) अशी आरोपींची नावे आहेत. १४ किलो ४९७ ग्रॅम सोने, २ कोटी रुपयांची रोख रक्कम आणि ४ सहस्र ६०० पाऊंड (४ लाख ८५ सहस्रांहून अधिक रुपये) जप्त केले आहेत. अटक करण्यात आलेला आरोपी समीर मर्चंट याला आधीही परदेशी चलन भारतात आणल्याप्रकरणी एकदा अटक झाली होती.

१. आरोपी समीर मर्चंट याचे आधीचे नाव अफझल बटाटावाला आहे. त्याच्या पत्नीचाही त्याच्या या कृत्यात सहभागी होता.

२. समीर मर्चंट हा सोन्याच्या तस्करीत सक्रीय होता. ही तस्करी बटाटावालाच्या माध्यमातून करण्यात येत होती. त्यानंतर भारतीय बाजारात वितरण करण्यासाठी ते सोने रझवीला देण्यात येत होते. ही विक्री माझगाव येथील दलाल महेंद्र जैन यांच्या माध्यमातून केली जात होती.

३. जप्त करण्यात आलेले सोने दुबईतील अमजद नावाची व्यक्ती भारतात पाठवायची. त्यानंतर समीर मर्चंट आणि त्याची पत्नी ज्योती किट्टी हे सोने या टोळीतील इतर सदस्यांना विक्रीसाठी द्यायचे.

४. मर्चंटला यापूर्वी १९९७ मध्ये संचालनालयाने हाँगकाँगवरून परदेशी चलन आणल्याप्रकरणी अटक केली होती. त्यानंतर २००४ मध्ये त्याला अहमदाबाद अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली होती. त्यानंतर तो वर्ष २०१३ मध्ये कारागृहाबाहेर आला. तेव्हा त्याने स्वतःचे अफझल बटाटावाला हे नाव पालटून समीर मर्चंट असे नाव ठेवले.

संपादकीय भूमिका 

सोने तस्करी करणार्‍यांना कठोरात कठोर शिक्षा झाल्याविना अशा प्रकारांना आळा बसणार नाही !