सत्तेत असणार्‍यांनी धार्मिक असल्यास त्याचे चांगले परिणाम दिसतात ! – रवि कुमार दिवाकर, न्यायाधीश, बरेली

  • बरेली न्यायालयाचे न्यायाधीश रवि कुमार दिवाकर यांचे न्यायालयात विधान !

  • धार्मिक व्यक्ती म्हणून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे दिले उदाहरण !

रवि कुमार दिवाकर

बरेली (उत्तरप्रदेश) – ‘सत्तेत असणार्‍यांनी धार्मिक असल्यास त्याचे चांगले परिणाम दिसतात’, असे मत बरेली न्यायालयाचे न्यायाधीश रवि कुमार दिवाकर यांनी वर्ष २०१० मध्ये बरेलीत झालेल्या दंगलीच्या खटल्यावरील सुनावणीच्या वेळी व्यक्त केले. यासाठी त्यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे उदाहरण दिले. सुनावणीच्या वेळी न्यायालयाने धार्मिक व्यवस्थेशी निगडित मौलाना तौकीर रझा खान हा दंगलीचा प्रमुख सूत्रधार असल्याचे नमूद करत त्याला समन्स (एखाद्या व्यक्तीला विशिष्ट प्रकरणात चौकशीला उपस्थित रहाण्यासाठी देण्यात आलेली सूचना) बजावले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ मार्चला ठेवण्यात आली आहे.

वाराणसी न्यायालयात न्यायाधीश असतांना वर्ष २०२२ मध्ये न्यायाधीश दिवाकर यांनीच ज्ञानवापी परिसराच्या सर्वेक्षणाची अनुमती दिली होती. त्यामुळे त्यांना धमक्या मिळाल्या होत्या आणि आजही ते सुरक्षाव्यवस्थेत रहात आहेत, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली.

काय म्हटले न्यायालयाने ?

न्यायाधीश रवि कुमार दिवाकर म्हणाले, ‘‘जर धार्मिक व्यक्ती सत्तेच्या केंद्रस्थानी असेल, तर त्याचे चांगले परिणाम पहायला मिळतात. राजकीय तत्त्वज्ञ प्लेटो याने त्याच्या ‘रिपब्लिक’ या पुस्तकात यासंदर्भात नमूद केले आहे. सध्याच्या काळात न्याय ही संकल्पना कायद्याच्या संदर्भात वापरली जाते; पण प्लेटोच्या काळात न्याय ही संकल्पना धर्माच्या संदर्भात वापरली जात होती. त्यामुळेच सत्तेच्या प्रमुखपदी धार्मिक व्यक्ती असायला हवी; कारण धार्मिक व्यक्तीचे आयुष्य स्वतःच्या आनंदासाठी नसते, तर त्यागाचे असते, बांधीलकीचे असते. उदाहरणार्थ सिद्ध पीठ गोरखनाथ मंदिराचे पीठाधीश्‍वर महंत बाबा योगी आदित्यनाथ सध्या उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी या सर्व गोष्टी सत्य असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे.’’

धमकीमुळे घराबाहेर पडतांना अनेकदा विचार करावा लागतो ! – न्यायाधीश दिवाकर

न्यायधीश दिवाकर यांनी ज्ञानवापी प्रकरणाचा उल्लेख करत सांगितले की, या खटल्यात सर्वेक्षणाचा निर्णय दिल्यानंतर धमकीचे पत्र आले होते. तेव्हापासून माझ्या कुटुंबात एक प्रकारचे भीतीचे वातावरण आहे. मी ते शब्दांत सांगू शकत नाही. कुटुंबातल्या प्रत्येकाला प्रत्येकाची प्रचंड काळजी वाटत आहे. घराबाहेर पडतांना अनेकदा विचार करावा लागत आहे. (हिंदूंच्या बाजूने निकाल दिल्यास धर्मांध ते स्वीकारत नाहीत आणि न्यायाधिशांनाच धमकी देतात, याकडे ‘देशात मुसलमान असुरक्षित आहेत’ असे म्हणणारे दुर्लक्ष करतात, हे लक्षात घ्या ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

धर्म मनुष्याला स्थिरता प्रदान करतो. त्यामुळे त्याच्या कार्याची फलनिष्पत्ती अनेक पटींनी वाढते. यासमवेत तत्त्वनिष्ठता आणि प्रामाणिकपणा वाढीस लागते. माननीय न्यायाधिशांना हेच सुचवायचे आहे; परंतु हे हिंदु धर्मियांसाठी लागू आहे. अन्य धर्मियांचा इतिहास, शिकवण आणि प्रकृती पहाता ‘त्यांच्या संदर्भात असा विचार करता येणार का ?’, असा प्रश्‍न सामान्य जनतेला पडला आहे !