कोल्हापूर – ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि दासबोध मंडळ यांच्या वतीने ५ मार्चला श्री रामदासनवमीच्या निमित्ताने ग्रंथ दिंडी अन् पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ८ वाजता संस्थेचे अध्यक्ष संतोष कोडोलीकर, उपाध्यक्ष सौ. वृषाली कुलकर्णी, दासबोध मंडळाचे आप्पा पाटगावकर, बाळासाहेब पाटील, संस्थेचे खजिनदार रामचंद्र टोपकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.
यानंतर पालखीमध्ये ग्रंथ ठेऊन विधीवत् पूजा करण्यात आली. बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रस्ता, श्री महालक्ष्मीदेवी मंदिर, विद्यापीठ शाळेमार्गे मंगलधाम असा दिंडी सोहळा पार पडला. समर्थभक्त सौ. सायली देवधर यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. महाआरतीनंतर सर्व भक्तांना महाप्रसाद देऊन सोहळ्याची सांगता झाली. या सोहळ्यासाठी संस्थेचे कार्यवाह श्रीकांत लिमये, संचालक अशोक कुलकर्णी, व्यवस्थापक अशोक जोशी, श्रीकांत नांगनूरकर, दासबोध मंडळाच्या सौ. योगिता काकडे यांच्यासह अनेक भक्त उपस्थित होते.