पुणे येथे ‘शहरी गरीब’ योजनेतील बनावट लाभार्थी सापडला

बनावट कागदपत्रे सादर करून रुग्णालयाचे देयक भरण्याचा प्रयत्न

पुणे – फुरसुंगीमधील एका खासगी रुग्णालयामध्ये शेवाळवाडीतील रहिवासी असल्याचे भासवून ‘शहरी गरीब’ योजनेंतर्गत कागदपत्रे सादर केली. ‘ऑनलाईन’ प्रक्रियेत कागदपत्रांची पडताळणी करतांना, शिधापत्रिकेच्या वरच्या बाजूला नोंदणी क्रमांक नसल्याने आणि शिधापत्रिका ८ दिवसांपूर्वी काढल्याचा दिनांक दिसल्याने आरोग्य विभागाला संशय आला. प्रत्यक्ष पहाणी केली असता, रुग्ण तिथे रहात नसल्याचे आढळून आले. (नागरिकांनाही सर्व काही विनामूल्य मिळाले पाहिजे आणि पैसे देऊन कामे होतात, अशी वृत्ती असल्याने यामुळे अशी बनावट कागदपत्रे सिद्ध केली जातात का ? असा संशय येतो ! – संपादक) त्यामुळे रुग्णाचे देयक नाकारण्यात आले आणि त्याविषयी तसे रुग्णालयासही कळवण्यात आल्याचे समजते. यावरून शहरांमध्ये शिधापत्रिका काढून देणारे दलाल वाढत असल्याचे दिसून येते. (अशा दलालांवर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी ? – संपादक)

गेल्या वर्षापासून कागदपत्रे सादर करणे, रुग्णालयाचे देयक संमत करण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया ‘ऑनलाईन’ करण्यात आली आहे. त्यामुळे बनावट लाभार्थ्यांची संख्या नियंत्रणात येत आहे. ‘शहरी गरीब’ योजनेचे कामकाज ‘ऑनलाईन’ केल्यापासून आणि महापालिकेच्या लाभार्थ्यांची माहिती मालमत्ता कर विभागाशी जोडण्यात आल्याने योजनेचा अपलाभ घेणार्‍या श्रीमंतांच्या संख्येमध्येही घट झाल्याचे दिसून येत आहे. योजनेसाठी १ लाख रुपयांच्या उत्पन्नाचा दाखला सादर केला जातो; परंतु प्रत्यक्षात ५ लाख रुपयांचा मालमत्ता कर भरत होते, अशी काही प्रकरणे लक्षात आली आहेत. त्यामुळे महापालिकेने अशा नागरिकांना योजनेचा लाभ देणे बंद केले आहे.

साहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा नाईक म्हणाल्या, ‘‘शहरी गरीब वैद्यकीय साहाय्य योजना ‘ऑनलाईन’ केल्यामुळे अनेक बनावट प्रकरणे निदर्शनास आली आहेत. या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करता येत नसल्याने पारदर्शकता आली आहे. ही प्रक्रिया आता अधिक सक्षम करण्यात येईल.’’