१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेले व्यष्टी आणि समष्टी साधना करण्याचे महत्त्व
‘एकदा आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी त्यांनी सांगितले, ‘‘व्यष्टी आणि समष्टी या दोन्ही प्रकाराने साधना झाली, तर ती योग्य साधना होते. व्यष्टी साधना ज्याची त्यालाच करावी लागते. आपल्याकडे असलेले समष्टी दायित्व मात्र अन्य साधकाच्या माध्यमातून पार पाडता येते.’’
२. ईश्वर करत असलेले साहाय्य
नंतर आम्हाला पुन्हा परात्पर गुरु डॉक्टरांचा सत्संग लाभला. त्या वेळी मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या बोलण्याचा संदर्भ देऊन म्हटले, ‘‘ईश्वर आपल्याला व्यष्टी आणि समष्टी अशा दोन्ही स्तरावर साधना करण्याची संधी देतो. आपल्याला ती साधता यायला हवी. आपण साधना करत असतांना ईश्वर आपल्यातील स्वभावदोष दाखवून ते दूर करण्यास साहाय्य करतो.’’
३. रिक्शाची धडक बसून अपघात होणे आणि त्या वेळी ईश्वराने करून घेतलेली सेवा
३ अ. अपघातात हाताला मुका मार लागणे आणि आधुनिक वैद्यांनी ‘तुम्हाला एक मास हाताला ‘पॅड’ बांधून काळजी घ्यावी लागेल’, असे सांगणे : काही दिवसांपूर्वी मी चालत जात असतांना एका रिक्शाने मला धडक दिली. तेव्हा माझ्या डाव्या पायाला पत्रा लागून मोठी जखम झाली. त्या वेळी स्वत:चा तोल सावरण्याचा प्रयत्न करतांना माझ्या उजव्या हातावर भार आल्याने त्या हाताला मुका मार लागला. माझ्या पायाला झालेली जखम बरी झाल्यानंतर मुक्या माराच्या वेदना उद्भवल्या. माझी २ वेळा क्ष किरण तपासणी केली; मात्र त्यांचा अहवाल समाधानकारक न आल्याने आधुनिक वैद्यांनी मला तिसर्यांदा क्ष किरण तपासणी करायला सांगितली. त्याचा अहवाल पाहून आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘तुम्हाला एक मास हाताला ‘बँडेज’ बांधून काळजी घ्यावी लागेल.’’
३ आ. उत्तरदायी साधकांनी ‘साधकांसाठी नामजप करू शकता’, असे सांगणे आणि घरी राहून सेवा करता येणार असल्याने आनंद होणे : तेव्हा मला वाटले, ‘मी आता निवांत विश्रांती घेऊ शकतो’; मात्र त्या विचारावर मात करून मी उत्तरदायी साधकांना सेवेविषयी विचारले. तेव्हा त्यांनी मला सांगितले, ‘‘तुम्ही घरी राहून साधकांसाठी ३ घंटे नामजप करू शकता.’’ ईश्वराने मला ही समष्टी सेवा दिल्याने मला पुष्कळ आनंद झाला. मी विश्रांतीच्या नावाखाली सवलत घेण्याचा विचार करत असतांना साधकाने मला माझ्यातील स्वभावदोषाची जाणीव करून दिली.
३ इ. नंतर आधुनिक वैद्यांच्या अनुमतीने मला १ मास पूर्ण होण्याच्या आधीच आश्रमात जाता आले. रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाच्या चैतन्यमय वातावरणात मला नामजप करता आला.
माझी ईश्वर आणि सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त झाली.’
– श्री. सुरेश श्रीनिवास नाईक (वय ६५ वर्षे), ढवळी, फोंडा. (५.२.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |