किरकोळ अमली पदार्थ विक्रेत्यांचे जाळे उद्ध्वस्त करण्याकडे पुणे पोलिसांचे लक्ष !

पुणे – पुणे पोलिसांच्या ‘गुन्हे शाखे’ने अमली पदार्थ निर्मितीचा कारखाना आणि त्याची घाऊक विक्री करणार्‍यांची साखळी उद्ध्वस्त केली आहे. आता किरकोळ स्वरूपातील अमली पदार्थांची विक्री करणार्‍यांची साखळी किंवा विक्रेते यांचा शोध चालू आहे. यासाठी गुन्हे शाखेकडून पथकांची निर्मिती करण्यात आली असून ‘लवकरच किरकोळ विक्रीचे जाळेही मोडून काढू’, असा विश्वास पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केला. (तरुण पिढीला अमली पदार्थांचे व्यसन लावणार्‍या गुन्हेगारांवर कडक कारवाई झाली पाहिजे ! – संपादक)

पुणे पोलिसांनी विश्रांतवाडी, कुरकुंभ आणि देहली येथे धाडी घालून ३ सहस्र ६०० कोटी रुपयांचे ‘मॅफेड्रोन’ जप्त करत आंतरराष्ट्रीय साखळी मोडून काढली आहे. आतापर्यंत ५० जणांची नावे उघड झाली आहेत. त्यातील काही जण अमली पदार्थ विक्रीचे सराईत गुन्हेगार आहेत. त्याचसह शहरांमध्ये गांजा विक्री करणार्‍या सराईत गुन्हेगारांवरही कारवाई करण्यात येणार आहे. यातील ५०० ते ६०० जणांची नावे समोर आली आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.