China Taiwan Conflict : (म्हणे) ‘खोटे बोलण्यासाठी तैवानला व्यासपीठ देऊ नका !’ – चीन

तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारतीय वृत्तवाहिनीला मुलाखत दिल्यावर चीनचा थयथयाट !

तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वू

नवी देहली – तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वू यांनी नुकतीच एका भारतीय वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. आता चीनने यावर आक्षेप घेतला आहे. भारतातील चिनी दूतावासाने सांगितले की, भारतीय माध्यमांमुळे तैवानला त्याच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्यासाठी आणि जगात खोटे पसरवण्याचे व्यासपीठ मिळाले आहे.

चिनी दूतावासाने म्हटले होते की, ‘एक-चीन’ धोरणाचा अर्थ असा आहे की जगात एकच चीन आहे. तैवान हा आमचा भाग आहे. चीनशी राजनैतिक संबंध असलेल्या सर्व देशांनी आमच्या धोरणांचा आदर केला पाहिजे. आम्ही भारतीय माध्यमांना आवाहन करतो की, त्यांनी चीनच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता या संबंधित सूत्रांवर योग्य भूमिका घ्यावी. तैवानच्या स्वातंत्र्याच्या भावनांना व्यासपीठ देऊ नका आणि चुकीचे संदेश प्रसारित करू नका. याचा देशातील आणि जगाच्या लोकांवर नकारात्मक परिणाम होईल.

यापूर्वी सप्टेंबर २०२३ मध्ये भारतीय सैन्याच्या ३ निवृत्त अधिकार्‍यांनी तैवानला भेट दिली होती. त्यावर चीनने आक्षेपही घेतला होता. ‘भारताने तैवानसमवेत संरक्षण भागीदारी वाढवू नये’, असा सल्ला चीनने दिला होता.

आम्ही चीनची कठपुतळी नाही ! – तैवानचे प्रत्युत्तर

भारत आणि आम्ही दोन स्वतंत्र लोकशाही देश आहोत. यांपैकी कुणीही चीनची कठपुतळी नाही, जी त्याच्या आदेशाचे पालन करील. चीनने इतर देशांशी गुंडगिरी करण्याऐवजी त्याने स्वतःहून योग्य आचरण केले पाहिजे.

संपादकीय भूमिका

लहान बेटांचा देश असणारा तैवान विस्तारवादी चीनचा धैर्याने सामना करत आहे. त्याला भारत साहाय्य करतच रहाणार, हे चीनने नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे !