हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातील सूक्ष्म युद्धाचे महत्त्व लक्षात आणून देणारे महान अवतारी परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे सूक्ष्म जगताविषयीचे अनुभव या लेखमालिकेतून आपण पहात आहोत. १ मार्च या दिवशी या लेखमालेतील काही भाग पाहिला. आज पुढील भाग पाहूया.

(भाग १३)

भाग १२ वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. धर्मयुद्धात देवतांचे साहाय्य आवश्यक असल्याने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना देवाप्रतीचा भाव वाढवण्यास सांगणे

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हाला सप्तलोकांचे परीक्षण करतांना अनेक गोष्टी शिकवल्या. ते म्हणत, ‘‘आपल्याला या धर्मयुद्धात अनेक देवीदेवतांचे साहाय्य लागणार आहे. त्यांच्याशी आपली जवळीक झाली पाहिजे. ‘एक हाक मारल्यावर देवता आपल्या साहाय्याला आल्या पाहिजेत’, असा भाव स्वतःत निर्माण करा.’’ साधारणतः वर्ष २००१ पासूनच गुरुदेवांनी आम्हा साधकांच्या मनावर देवाप्रतीच्या भावाचे महत्त्व बिंबवण्यास आरंभ केला.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

२. आध्यात्मिक भावाचे महत्त्व समजल्याने साधकांना ‘वाईट शक्तींच्या त्रासाशी कसे लढायचे ?’, हे कळू लागणे

त्या वेळी अनेक साधकांना वाईट शक्तींचा त्रास होत असे. त्यांना शिकवतांना गुरुदेव म्हणायचे, ‘‘देवाविषयीचा भाव हेच आपले खरे शस्त्र आहे. तो भाव वाढवा.’’ गुरुदेवांनी आध्यात्मिक भावाचे महत्त्व सतत समजावल्याने अनेक साधकांना ‘वाईट शक्तींच्या त्रासाशी कसे लढायचे ?’, हे कळू लागले. त्यामुळे वाईट शक्तींचा त्रास होत असतांनाही साधकांना ‘स्वतःचे एक रूप परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी आहे’, अशी अनुभूती येऊ लागली.

३. गुरूंचा आधार मिळू लागल्याने त्रास असणार्‍या साधकांमध्ये सकारात्मकता येऊ लागणे आणि त्यांना सतर्कतेने स्वतःच्याच देहाचे परीक्षण करता येणे

त्रास असणार्‍या साधकांना अशा प्रकारे गुरूंचा आधार मिळू लागल्याने त्यांच्यात सकारात्मकता येऊ लागली. साधक स्वतःला त्रास देणार्‍या वाईट शक्तींशी चालू असणार्‍या युद्धाकडे सतर्कतेने पाहू लागले. त्यामुळे त्यांना स्वतःच्याच देहाचे परीक्षण करता येऊ लागले. अशा प्रकारे सूक्ष्मातील जाणणार्‍या साधकांनी केलेले परीक्षण आणि त्रास असणार्‍या साधकांनी स्वतःचेच केलेले परीक्षण यांतून सूक्ष्म जगताविषयीचे अनेक पैलू आम्हाला कळू लागले.

४. त्रास असणार्‍या साधकांचे जीवन कठीण असल्याचे लक्षात आल्याने त्यांच्याविषयीचा प्रेमभाव वाढणे

यातूनच ‘त्रास असणार्‍या साधकांचे जीवन कसे असते आणि या त्रासात साधना करणे किती कठीण असते ?’, हे आम्हाला अनुभवता येऊ लागले. त्यामुळे आम्हाला त्रास असणार्‍या साधकांविषयी विशेष जवळीक वाटू लागली. ‘आपल्याला या साधकांना त्रासातून बाहेर काढायचे आहे’, अशी तळमळ आमच्यात निर्माण झाली. त्रास असणार्‍या साधकांविषयी आमच्या मनातील प्रेमभाव वाढला.

५. ‘कोणतीही सेवा करतांना आपल्यात ईश्वरी गुण येणे’, ही साधना असल्याचे परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगणे

परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘देवाला हेच अपेक्षित आहे. साधकांचा त्रास देव कसाही न्यून करू शकतो; परंतु ही सेवा करतांना ‘आपल्यात कोणते ईश्वरी गुण आले ?’, याला अधिक महत्त्व आहे आणि यालाच ‘साधना’, असे म्हणतात. कोणतीही सेवा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते. त्या सेवेतून साधना होणे महत्त्वाचे आहे.’’

६. ‘एखादे मूल अकस्मात् विचित्र वागण्यामागे ‘त्याला असणारा वाईट शक्तींचा त्रास’, हे मूळ कारण असते’, याचा शोध लागणे

‘त्रास असणारे साधक लहानपणापासून विविध प्रकारचा त्रास अनुभवत आले आहेत’, हेही कालांतराने आम्हाला उमगू लागले. ‘एखादे लहान मूल अकस्मात् आक्रमक का होते ? ते विचित्र का वागते ? समाजात वावरणार्‍या सामान्य मनुष्याच्या तुलनेत आपल्याला त्याचे वागणे विक्षिप्त का वाटते ?’, याचा अभ्यास आम्ही केला. तेव्हा ‘त्याचे मूळ त्याला असणार्‍या वाईट शक्तींच्या त्रासात असते’, हा नवीन शोध आम्हाला लागला.

७. ‘जीवनातील ८० टक्के समस्या या आध्यात्मिक स्वरूपाच्या असतात’, याविषयी जनजागृती करायची असल्याचे परात्पर गुरुदेवांनी सांगणे

याचे विवरण सांगतांना परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘सध्याच्या कलियुगात वाईट शक्तींचा प्रकोप अधिक असल्याने मनुष्याच्या जीवनात निर्माण होणार्‍या जवळजवळ ८० टक्के समस्या या आध्यात्मिक स्वरूपाच्या असतात. मुलाचे विक्षिप्त वागणे पाहून अनेक जण लगेचच त्याला मानसोपचार तज्ञाकडे नेतात आणि त्याच्या औषध-पाण्यावर भरमसाठ पैसे व्यय करतात. काही समस्या मानसिक स्वरूपाच्या असतातही; परंतु ‘ही समस्या कोणत्या प्रकारची आहे ?’, हे संतच सांगू शकतात. या सर्व गोष्टींपासून समाज अनभिज्ञ आहे. याविषयी आपल्याला समाजात जागृती करायची आहे.’’ परात्पर गुरु डॉक्टरांची प्रत्येक कृती आणि विचार यांतून ‘त्यांना समाजाच्या कल्याणाची किती ओढ आहे !’, हे आमच्या लक्षात येत होते. खरे गुरु असेच असतात, नाही का ?

८. सप्तपाताळांच्या विरोधात सूक्ष्म युद्ध करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

८ अ. परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘सूक्ष्म जगतातील वाईट शक्तींशी कसे बोलायचे ?’ इत्यादी सूत्रे शिकवणे : गुरुदेवांनी आम्हाला ‘सूक्ष्म जगतातील वाईट शक्तींशी कसे बोलायचे ? ‘त्या आपल्याला फसवत नाहीत ना ?’, हे कसे ओळखायचे ?’, हेही शिकवले. यातूनच मायावी वाईट शक्तींचे स्वरूप उघड होऊ लागले. बर्‍याचदा मायावी वाईट शक्ती देवतांचे रूप घेऊन साधकांना आतून मार्गदर्शन करत असत आणि त्यांची दिशाभूल करत असत. परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला सांगितले, ‘‘आपण देवालाच प्रार्थना करायची की, या वाईट शक्तीचे खरे स्वरूप आमच्या समोर येऊ दे.’’ अशी प्रार्थना केली की, कधी कधी साधकाला त्रास देणारी वाईट शक्ती चिडून साधकाला आणखी त्रास देत असत.

८ आ. ‘हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठीचे खरे युद्ध सूक्ष्मातील आहे’, असे गुरुदेवांनी सांगणे :  वाईट शक्तींच्या बोलण्यातून आम्हाला कळू लागले, ‘आपण म्हणतो की, सार्‍या पृथ्वीवर हिंदु राष्ट्र आले पाहिजे; परंतु हिंदु राष्ट्र-निर्मितीला विरोध करणार्‍या शक्ती या वाईट शक्तींच्या रूपात पाताळातच दडल्या आहेत. त्यांची शक्ती आधी न्यून केली पाहिजे’ आणि नेमकेपणाने परात्पर गुरु डॉक्टर आम्हाला हेच शिकवत होते. ते म्हणत, ‘‘खरे युद्ध हे सूक्ष्मातीलच आहे.’’

८ इ. ‘देवाच्या कृपेने सातव्या पाताळावर विजय मिळाल्यावर हिंदु राष्ट्राची प्रत्यक्ष स्थापना होईल’, असे गुरुदेवांनी सांगणे : पाताळातील नकारात्मक शक्ती देवतांच्या कृपेने नष्ट केली की, पृथ्वी आपोआपच ‘सुजलाम् सुफलाम्’ बनेल; परंतु त्यासाठी आपण साधना वाढवली पाहिजे, तरच या वाईट शक्तींना हरवणे सोपे जाईल; म्हणून जवळजवळ वर्ष २००० पासूनच सनातनचे हे सप्तपाताळांच्या विरोधातील सूक्ष्म युद्ध चालू आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितले, ‘‘मागील जवळजवळ २० – २१ वर्षे लढत लढत आपण आता सातव्या, म्हणजे शेवटच्या पाताळापर्यंत पोचलो आहोत. देवतांच्या कृपेने या पाताळावर विजय मिळवला की, हिंदु राष्ट्राची स्थापना झालेली आपल्याला प्रत्यक्ष पहायला मिळेल. तो दिवस दूर नाही.’’

परात्पर गुरु डॉक्टरांनी शिकवले नसते, तर आम्हाला ‘सूक्ष्म युद्ध म्हणजे काय असते ?’, हे कधी कळलेच नसते. ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात सूक्ष्म युद्धाचे महत्त्व किती आहे ?’, हे लक्षात आणून देणार्‍या परात्पर गुरु डॉक्टरांसारख्या महान अवतारी गुरूंच्या चरणी आम्हा सर्व साधकांचे कोटीशः नमन !

‘गुरुसेवा म्हणून आम्ही लिहीत असलेला हा सूक्ष्म इतिहास पुढे अनेक वर्षे सूक्ष्म जगतात सखोलपणे आणि अतिविशालपणे गुरुदेवांनी केलेल्या कार्याचे गुणगान गात राहील’, यात शंका नाही. जय गुरुदेव !’

(क्रमश:)

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, चेन्नई, तमिळनाडू. (९.२.२०२२)

भाग १४ वाचण्यासाठी येथे क्लिक करा

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.