कर्करोगाने पीडित असलेल्या साधिकेकडूनही समष्टीला शिकवण्याची आणि साधनेविषयी दृष्टीकोन देण्याची परात्पर गुरु डॉ. आठवले यांची तळमळ !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे सूक्ष्म जगताविषयीचे अनुभव या लेखमालिकेतून आपण पहात आहोत. २ मार्च या दिवशी या लेखमालेतील काही भाग पाहिला. आज पुढील भाग पाहूया.             

(भाग १४)

भाग १३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. गुरुदेवांनी ‘कर्करोगाने आजारी असलेली एक साधिका सतत आनंदी कशी असते ?’, याचे कारण शोधण्यास सांगणे

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हाला मृत्यूविषयीच्या स्पंदनांचा अभ्यास करायला सांगितला होता. त्या वेळी फोंडा (गोवा) येथील ‘सुखसागर’ मध्ये सौ. मंजू सिंह नावाच्या साधिका कर्करोगाने आजारी होत्या. त्यांना दिवसभर पुष्कळ यातना होत असत, तरीही त्या सतत आनंदी असायच्या. ‘एवढ्या दुर्धर आजारातही त्या सतत आनंदी कशा असतात ?’, याचे कारण शोधून काढण्यास परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला सांगितले.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

२. सततची भावावस्था आणि ईश्वरी अनुसंधान यांमुळे देहबुद्धी न्यून झाल्याने साधिकेच्या चेहर्‍यावर हास्य असल्याचे लक्षात येणे

सौ. मंजू सिंह यांचे परीक्षण केल्यानंतर आमच्या लक्षात आले की, त्यांच्या अंतर्मनात देव आणि गुरुदेव यांच्याविषयी इतका भाव आहे की, त्यांना सतत होणार्‍या वेदनांचेही काही वाटेनासे झाले आहे. सततची भावावस्था आणि ईश्वरी अनुसंधान यांमुळे त्यांची देहाविषयीची आसक्ती न्यून झाली होती. देहबुद्धी न्यून झाल्याने त्यांच्या चेहर्‍यावर सतत हास्य असे. आम्हाला याचे आश्चर्य वाटत असे.

३. परात्पर गुरु डॉक्टरांनी आजारी साधिकेच्या प्रयत्नांविषयी तिच्या बहिणीला सत्संगात बोलण्यास सांगणे आणि त्यातून इतर साधकांच्या साधनेला चालना मिळणे

परात्पर गुरु डॉक्टरांनी सौ. मंजू यांचा नित्य जीवनक्रम आणि त्या करत असलेले साधनेचे प्रयत्न यांविषयी त्यांची मोठी बहीण सौ. अरुणा सिंह यांना प्रत्येक सत्संगात बोलण्यास सांगितले होते. त्यामुळे आम्हाला मंजू यांच्या साधनेचे प्रयत्न प्रत्येक सत्संगात कळत आणि आमच्याही साधनेला चालना मिळत असे. सौ. अरुणा अत्यंत सरळ आणि ओघवत्या भाषेत मंजू यांच्या प्रयत्नांचे वर्णन करत. ‘हे वर्णन ऐकतच रहावे’, असे होते. (हे लिहीत असतांना मला मोगर्‍याचा मंद सुगंध आला.)

४. ‘मन ईश्वराच्या अनुसंधानात असेल, तर दुर्धर यातना भोगणारा जीवही स्वतःच्या सहवासाने इतरांना आनंदी बनवतो’, हे मनावर बिंबवणारे परात्पर गुरु डॉक्टर !

यातून परात्पर गुरु डॉक्टरांची साधकांना शिकवण्याची आणि त्यांना साधनेविषयीचे दृष्टीकोन देण्याची तळमळ दिसून येते. परात्पर गुरु डॉक्टर ‘साधकाच्या प्रत्येक स्थितीचा समष्टीला काय लाभ करून देता येईल ?’, हे पहायचे. खरे पहाता व्यवहारात कर्करोगाने पीडित असणार्‍या रुग्णाकडे एक दुःखी जीव म्हणूनच पाहिले जाते; परंतु येथे मात्र सर्व उलटेच होते. मंजू यांच्या सहवासात सर्व जण आनंदी होत असत. यातून परात्पर गुरु डॉक्टरांनी सर्व साधकांच्या मनावर हेच बिंबवले की, रोग केवळ देहाला आहे; परंतु मन मात्र ईश्वराच्या अनुसंधानात आनंदी असेल, तर असा दुर्धर यातना भोगणारा जीवही स्वतःच्या सहवासाने इतरांना आनंदी बनवतो, एवढी शक्ती त्या जिवात साधनेने निर्माण होते.

‘दुर्धर रोग असणारे साधक, तसेच आध्यात्मिक त्रास असणारे साधक यांच्याकडून नेमकेपणाने काय शिकायचे ?’, हे गुरुदेवांनी आम्हाला शिकवले. ‘जीवनात काय शिकायचे ?’, हेही कळले पाहिजे. यासाठीही गुरुच लागतात. ‘गुरुवीण नाही दुजा आधार ।’, हेच खरे !’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, चेन्नई, तमिळनाडू. (९.२.२०२२)

(क्रमशः)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.