UK MP Targeted India : (म्हणे) ‘भारतीय हस्तक शिखांना लक्ष्य करत आहेत !’ – महिला शीख खासदार प्रीत कौर गिल, ब्रिटन

ब्रिटनच्या संसदेत महिला शीख खासदार प्रीत कौर गिल यांचा आरोप !

लंडन (ब्रिटन) – भारतीय हस्तक ब्रिटनमध्ये रहाणार्‍या शिखांना लक्ष्य करत आहेत, असा आरोप ब्रिटनमधील महिला शीख खासदार प्रीत कौर गिल यांनी ब्रिटीश संसदेच्या कनिष्ठ सभागृहामध्ये (‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये) केला. प्रीत कौर गिल या ब्रिटनमधील विरोधी पक्ष लेबर पार्टीच्या खासदार आहेत.

सौजन्य वर्ल्ड न्यूज 

(म्हणे) ‘शिखांच्या सुरक्षेसाठी सरकार काय पावले उचलत आहे ?’ – प्रीत कौर गिल

प्रीत कौर गिल म्हणाल्या की, अलीकडच्या काही महिन्यांत, ‘फाइव्ह आईज’ देशांनी (ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, अमेरिका आणि ब्रिटन यांची गुप्तचर आघाडी) ब्रिटनममधील शीख कार्यकर्त्यांना लक्ष्य करणार्‍या भारताशी संबंधित हस्तकांच्या कारवाईवर चिंता व्यक्त केली आहे. काही हत्यांचे कट उधळण्यात आले आहेत. अमेरिका आणि कॅनडा या देशांनी अशा प्रकारची प्रकरणे सार्वजनिक केली आहेत. अशा घटना त्यांच्या सार्वभौमत्वाला आणि त्यांच्या लोकशाही मूल्यांना आव्हान आहे. ब्रिटीश शिखांना अशाच प्रकारच्या धोक्यांचा सामना करावा लागत असल्याच्या बातम्या पहाता, त्यांच्या सुरक्षेसाठी सरकार काय पावले उचलत आहे?, असा प्रश्‍न गिल यांनी या वेळी विचारला.

ब्रिटन त्वरित कारवाई करील ! – सुरक्षामंत्री टॉम तुगेंधत

खासदार प्रीत कौर गिल यांच्या प्रश्‍नाला उत्तर देतांना ब्रिटनचे सुरक्षामंत्री टॉम तुगेंधत म्हणाले की, कोणत्याही परदेशी नागरिकाकडून कोणत्याही ब्रिटीश नागरिकाला धोका असल्यास आम्ही त्वरित कारवाई करू.  (ब्रिटनने लंडन येथील भारतीय दूतावासावर आक्रमण करणार्‍या खलिस्तान्यांवर अद्याप कठोर कारवाई केलेली नाही, तसेच तेथील हिंदूंवर धर्मांधांकडून होणारी आक्रमणे नित्याची गोष्ट झाली आहे. त्यामुळे संरक्षणमंत्र्यांच्या या वाक्याला काय अर्थ आहे ? – संपादक) इतर समुदायांप्रमाणे शीख समुदायाला ब्रिटनमध्ये सुरक्षित रहाण्याचा अधिकार आहे. ब्रिटीश नागरिकाचा रंग, धर्म, श्रद्धा किंवा राजकीय निष्ठा काहीही असो, ते सर्व समान आहेत.

यापूर्वी कॅनडाने त्याच्या देशात खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येच्या प्रकरणात भारतावर आरोप केले होते, तर अमेरिकेने बंदी घालण्यात आलेली खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’चा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येच्या कथित कटाच्या प्रकरणी भारतावर आरोप केले आहेत. त्यानंतर आता ब्रिटनमधील खासदाराकडून असा आरोप करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका 

  • कॅनडा आणि अमेरिका यांनीही भारतावर यापूर्वी अशा प्रकारचे आरोप केले; मात्र दोघांनाही कोणतेही पुरावे सादर केले नाही, ही वस्तूस्थिती आहे. खलिस्तान्यांच्या आडून पाश्‍चात्त्य देश भारतावर दबाव ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे भारताने लक्षात घेऊन अशांना जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला पाहिजे !
  • भारतावर आरोप करणारे गिल यांच्यासारखी मंडळी खलिस्तानी करत असलेल्या भारतविरोधी कृत्यांविषयी चकार शब्द काढत नाहीत, हे लक्षात घ्या !