Ludhiana Punjab Temple Vandalised : लुधियाना (पंजाब) येथे अज्ञातांकडून शिवमंदिरातील १४ मूर्तींची तोडफोड !

लुधियाना (पंजाब) – येथील जुगियाना भागातील साहनेवाल गावाजवळी राष्ट्रीय महामार्गाच्या ठिकाणी असलेल्या शिवमंदिरात अज्ञातांनी तोडफोड केली. मंदिरातील शिवलिंगासह एकूण १४ मूर्तींची तोडफोड करण्यात आली आहे. २६ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीनंतर ही घटना घडली. दुसर्‍या दिवशी सकाळी पुजारी मंदिरात पूजेसाठी आले असता त्यांना तोडफोड झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी गुन्हा नोंद करून अन्वेषण चालू केले आहे. प्रशासनाने हिंदूंना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. हिंदु संघटनांनी प्रशासनाला कारवाईसाठी ७२ घंट्यांचा अवधी दिला आहे.

१. मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला नव्हता. त्यामुळे आरोपींची ओळख पटू शकली नाही. पोलीस जवळपासच्या सीसीटीव्ही चित्रीकरण पडताळून आरोपींना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

२. या घटनेविषयी स्थानिक शिवसेना नेते भानू प्रताप म्हणाले की, काही दिवसांपूर्वी एका गायीचे छिन्नविछिन्न मुंडके सापडले होते. या प्रकरणी अद्याप कुणालाही पकडण्यात आलेले नाही.

३. हिंदु नेते अमित कौंडल म्हणाले की, पंजाबमध्ये मंदिरांवर आक्रमणे होणे सामान्य झाले आहे. महाशिवरात्रीच्या आधीची ही घटना हिंदूंच्या भावना दुखावणारी असल्याचे त्यांनी सांगितले.

४. हिंदु नेते ऋषभ कन्नौजिया यांनी प्रशासन कुंभकर्णासारखे झोपले असल्याचा आरोप केला.

५. पाच महिन्यांपूर्वी ट्रकने धडक दिल्याने या मंदिराची मोठी हानी झाली होती. मंदिर समितीच्या सदस्यांनी त्याची दुरुस्ती करून घेतली होती.

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून सर्वांना वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहेत. –  संपादक)

संपादकीय भूमिका 

भारतात कोणत्याही पक्षाचे सरकार असलेे, तरी प्रत्येक ठिकाणीच हिंदू आणि त्यांची धार्मिक स्थळे असुरक्षित झाली आहेत. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करत आहे, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !