बेळगाव – पट्टनकुडी गावातील (तालुका चिक्कोडी, जिल्हा बेळगाव) प्राथमिक मराठी शाळेतील एका धर्मांध शिक्षिकेकडून वर्गात विद्यार्थ्यांसमोर कोट्यवधी हिंदूंचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र फाडणे, ‘शिवाजी कोण होता ?’, असे एकेरी उल्लेख करून प्रश्न विचारणे, शिवजयंती आणि भगवा ध्वज यांविषयी अवमानकारक बोलणे, असे प्रकार होत असल्याचे शिवभक्त आणि हिंदुत्वनिष्ठ यांना कळले. यानंतर शिवभक्त आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी प्राथमिक शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून दिले, तसेच संबंधित धर्मांध शिक्षकेस सर्वांसमोर जाहीर क्षमा मागण्यास भाग पाडले.
या संदर्भात मुख्याध्यापकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, झालेली घटना गंभीर असून यामुळे समस्त शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. तरी शाळा व्यवस्थापनाने याची गंभीर नोंद घेऊन संबंधित शिक्षिकेवर योग्य ती कारवाई करावी. यापुढे असे प्रकार होऊ नयेत म्हणून शाळा व्यवस्थापनाने हे प्रकरण गांभीर्याने घेऊन त्यावर योग्य कृती करावी; अन्यथा शिवभक्तांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागेल.
या प्रसंगी शिवभक्त सर्वश्री अजय पुणेकर, रोहन परीट, सम्मेद श्रीपण्णावार, निपाणी येथील श्री. अजित पारळे, सर्वश्री अजित पाटील, राजू आवटे, विशाल जाधव यांसह अन्य उपस्थित होते.