सातारा, १८ फेब्रुवारी (वार्ता.) – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी श्रीमंत येसूबाई यांची संगम माहुली येथील समाधी ‘संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करण्यात आली आहे. १६ फेब्रुवारी या दिवशी राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या झालेल्या बैठकीत सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याविषयी प्राथमिक अधिसूचना जाहीर केल्याची घोषणा केली.
पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव नंदा राऊत यांनी ‘पुरातत्व वस्तूसंग्रहालय संचालनालया’ने या प्राथमिक अधिसूचनेची प्रत स्मारकाजवळ लावण्याची व्यवस्था करावी, असे आदेश दिले आहेत. संगम माहुली येथे राजघराण्यातील अनेकांच्या समाध्या अस्तित्वात आहेत. येथे श्रीमंत येसूबाई यांचीही सामधी आहे. स्वराज्य लढ्यातील श्रीमंत येसूबाई यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानानंतर औरंगजेबाने येसूबाई आणि छत्रपती शाहू यांना बंदीवान केले. नंतर २९ वर्षे त्या राजबंदी म्हणून राहिल्या. शेवटी वर्ष १७१९ मध्ये त्या राजधानी सातारा येथे आल्या. नंतर शेवटपर्यंत त्यांचे वास्तव्य सातारा येथेच होते. संगम माहुली येथे ४६.४५ चौरस मीटर क्षेत्रात संपूर्ण दगडात बांधलेली येसूबाई यांची मंदिर सदृश्य समाधी आकर्षक असून दगडांवर कोरीव काम केलेले आहे. समाधीच्या चतु:सीमा निश्चित करण्यात आल्या आहेत. यामुळे समाधी संवर्धन आणि संरक्षणासाठी निधी उपलब्धतेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या स्मारकामध्ये हितसंबंध असणार्या कोणत्याही व्यक्तीला याविषयीची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून २ मासाच्या आत हरकत नोंदवण्याची मुभा शासनाच्या वतीने देण्यात आली आहे.