भक्त आणि भाविक यांच्या दृष्टीने मंदिर व्यवस्थापन !

मंदिर प्रशासन या अनुषंगाने विचार करतांना यामध्ये मुख्यत्वे मध्यम आणि मोठ्या मंदिरांचा विचार केला आहे. लहान मंदिरांचा नाही. लहान मंदिरांमध्ये यांपैकी काही सूत्रे लागू पडू शकतात. मंदिर व्यवस्थापन हा एक मोठा विषय आहे. त्यात मंदिरात भक्त आणि अन्य माध्यमांतून येणारा अर्पण निधी, सोने-चांदी यांच्या मौल्यवान वस्तू, दागिने, दान दिलेल्या भूमी, वास्तू यांचा योग्य विनियोग करणे, त्यांचा हिशोब ठेवणे इत्यादी अनेक आर्थिक सूत्रांचा समावेश होऊ शकतो. तो या लेखाचा भाग नसून केवळ भाविकांच्या दृष्टीने मंदिरांकडून कोणत्या सोयी-सुविधा देता येऊ शकतात ? यांचा विचार केला आहे. भाविकही त्यांच्या ज्ञात मंदिरांमध्ये काही सुविधा नसतील, तर मंदिर न्यास अथवा व्यवस्थापन यांच्याकडे त्यांची मागणी करू शकतात.

४ आणि ११ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘मंदिरात दर्शन घेणे, मंदिरांच्या प्रवेशद्वारावर भाविकांना हात-पाय धुण्यासाठी सुविधा, दर्शनार्थींना सुविधा, मंदिरातील धार्मिक विधींची माहिती देणे, भाविकांना प्रसाद आणि देवतेचे निर्माल्य अन् प्रसादातील साहित्य मिळणे’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

श्री. यज्ञेश सावंत

१०. मंदिराद्वारे चालवले जाणारे उपक्रम

मंदिरांद्वारे गोशाळा, भक्तांसाठी विविध सोयी-सुविधा उभारणे, धर्मशाळा बांधणे इत्यादी उपक्रम राबवले जातात. त्यांची माहिती भक्तांना उलपब्ध केल्यास ते सढळ हस्ते धर्मदान करू शकतात. महाप्रसादासाठी धान्य, भाजीपाला, स्वयंपाकाची सामुग्री अर्पण करू शकतात. मंदिराद्वारे आगामी काळात हाती घेतल्या जाणार्‍या उपक्रमांसाठी धर्मदान स्वीकारू शकतात. आपल्या परिसरातील लहान, दुलर्क्षित मंदिरांचा जीर्णाेद्धाराचा उपक्रम मध्यम आणि मोठ्या मंदिरांनी खरे तर राबवणे अपेक्षित असते. अनेक प्रसिद्ध देवस्थानांमध्ये मोठ्या प्रमाणात अर्पणनिधी जमा होतो. हा निधी सामाजिक आणि काही वेळा सरकारी कामांसाठी वळवला जातो की, जे पूर्णपणे अयोग्य आहे. सामाजिक आणि सरकारी कामांसाठी सरकारनेच निधी उपलब्ध करणे, हे कर्तव्य भाग आहे. त्यात मंदिरांनी वाटा उचलणे अपेक्षित नाही.

मध्यम आणि मोठ्या मंदिरांनी,

अ. लहान मंदिरांचा जीर्णाेद्धार करणे

आ. अन्नछत्र चालवणे

इ. गुरुकुल निर्माण करून चालवणे

ई. धर्मशिक्षण देण्यासाठी धर्मशिक्षणवर्ग चालू करणे

उ. मुलांसाठी बालसंस्कारवर्ग चालू करणे

ऊ. सामूहिक उपासनेचे कार्यक्रम आयोजित करणे

ए. मुलांसाठी स्तोत्रपठण, प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करणे

ऐ. आपल्या मंदिरात आणि आसपासच्या मंदिरांमध्ये मंदिर स्वच्छता उपक्रम घेणे

असे अनेक उपक्रम घेऊ शकतो.

११. भाविकांना मंदिराच्या धार्मिक उपक्रमांमध्ये सहभागी करून घेणे

प्रत्येक देवतेचा उत्सव, जत्रा, पालखी सोहळा असतो. त्यांची माहिती बर्‍यापैकी मंदिरात उपलब्ध नसते. त्यामुळे भाविकांना त्या वेळी उपस्थित राहून त्यांचा लाभ घेता येत नाही. त्या त्या देवतेशी संबंधित सण मंदिरात साजरे केले जात असले, तरी भाविकाला त्यात कशा प्रकारे सहभागी होता येईल ? याची माहिती नसते. त्यामुळे त्या त्या देवतेचे तत्त्व अधिक प्रमाणात मिळवण्याची संधी जाते. असे होऊ नये म्हणून या उत्सवांच्या वेळी कोणत्या सेवा उपलब्ध असतात ? भाविक कोणत्या सेवांमध्ये सहभागी होऊ शकतात ? हे भाविकांना कळल्यास ते स्वत:हून आणि उत्साहाने सहभागी होतात.

११ अ. भाविकांना मंदिरात सेवा उपलब्ध करून देणे : नियमित आणि मोठ्या मंदिरांमध्ये स्वच्छतेच्या सेवा भाविकांना उपलब्ध झाल्यास त्या माध्यमातून सेवाही होते आणि मंदिर व्यवस्थापनावर असणारा ताणही दूर होतो. मंदिरात सेवा करण्यास मिळणे, हे भाविक स्वत:चे भाग्य समजतो. उत्सवांच्या वेळी दर्शनार्थींच्या रांगा लावणे, प्रसाद वाटप, गर्दीचे नियोजन, पाणी देणे, मंडप उभारणे, महाप्रसादासाठी आवश्यक भाजी निवडणे, चिरून देणे इत्यादी अनेक सेवांमध्ये खरे तर भाविक सहभागी होण्यास उत्सुक असतात. त्यामुळे केवळ काही ठराविक भाविक अथवा दर्शनार्थी यांच्यापुरत्या या सेवा न ठेवता अधिकाधिक जणांना सहभागी करून घेतल्यास त्यांनाही मंदिरात सेवा केल्याचा आनंद मिळतो. गावाच्या ठिकाणच्या मंदिरांमध्ये ग्रामस्थ स्वत:हून अशा गोष्टी विचारून त्यात सहभागी होतात; कारण मंदिर गावातील असते, ग्रामदेवतेविषयी ग्रामस्थांची विशेष श्रद्धा आणि जिव्हाळा असतो. तालुका, शहर अशा ठिकाणी लोकांचा कल तेवढा नसतो.

काही श्री गणेश मंदिरात गणेशोत्सवाच्या कालावधीत सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचे कार्यक्रम राबवले जातात. सामूहिक उपासनेत अधिक लाभ असल्याने प्रत्येक मंदिरात त्या त्या देवतेशी संबंधित स्तोत्रपठण, सामूहिक नामजप करणे हे उपक्रम राबवले गेले पाहिजेत. त्यातून भाविक आणि मंदिर परिसराची सात्त्विकता वाढू शकते.

११ आ. घंटानादाद्वारे आरतीविषयी सूचित करणे : मंदिरांमध्ये काकड आरती, सांज आरती यांच्या वेळेच्या पूर्वी घंटानाद करून मंदिर व्यवस्थापन भाविकांना आरती चालू होण्याची सूचना देऊ शकते. भाविक प्रत्यक्ष किंवा त्यांच्या घरी राहून आरतीत सहभागी होऊ शकतात. यामुळे कार्यरत होणार्‍या देवतेच्या तत्त्वाचा अनेकांना लाभ होऊ शकतो.

१२. मंदिरात कोणते कार्यक्रम करू शकतो ? त्याची माहिती असावी

कलाकार भक्त मंदिरात स्वत:ची कलाकृती सादर करण्यास इच्छुक असतात. उदा. गायन, शास्त्रीय नृत्य आणि संगीत. काही मोठ्या मंदिरांमध्ये देवतेसमोर कला सादर करण्याची व्यवस्था आहे. ही व्यवस्था मध्यम आणि मोठ्या मंदिरांमध्ये असल्यास स्थानिक स्तरावर कला अवगत असणार्‍यांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांनाही देवतेसमोर कला सादर करण्याचा लाभ मिळेल.

मंदिरात कलेचे सादरीकरण करता येते, याची फार अल्प जणांना माहिती आहे. मंदिरात भाविक रांगेत उभे असतात, त्यांनाही याचा लाभ घेता येईल आणि कलाकारांनाही श्रोतृवर्ग मिळेल, ओळख मिळेल.

अनेक जण लग्न, मुंज, वाढदिवस देवळात करण्यास इच्छुक असतात; मात्र ती सुविधा मंदिरात आहे का ? याची माहिती भाविकाला नसते. त्यासाठी त्याने आणि मंदिराने काय व्यवस्था करावी लागेल ? काय बंधने पाळावी लागतील ? याची योग्य ती माहिती मंदिरात दिली पाहिजे. देवतेच्या सान्निध्यात आणि सात्त्विक वातावरणात असे कार्यक्रम झाल्यावर भाविकाचा आनंद वर्धिष्णू झाला नाही तर नवल !

१३. मंदिराचा लेखा-जोखा

मंदिरात भाविक श्रद्धेने दानधर्म करतात. देवासाठी अलंकार, दागिने अर्पण करतात. काही जणांनी नवस बोललेला असतो, तो फेडण्यासाठी काहीतरी अर्पण करतात. भक्त देवासाठी त्याच्या क्षमतेनुसार जे काही अर्पण करायचे ते करण्याचा प्रयत्न करतो; मात्र बहुतांश सरकारी मंदिरांत या दानाचा विनियोग नीट होत नाही. निधी वेगळ्याच कामांसाठी वापरला जातो. त्याच्या नोंदी ठेवलेल्या नसतात, काही मंदिरांमध्ये दानाच्या संदर्भात घोटाळे उघडकीस आले आहेत. मिळालेल्या दानाच्या योग्य नोंदी ठेवणे, जमा-खर्च यांच्या नोंदी ठेवणे आवश्यक आहे. मंदिरात नियमित स्वरूपात प्राप्त झालेल्या दानाची, सण-उत्सवांच्या वेळी प्राप्त झालेल्या दानाची, मासिक, वार्षिक जमा-खर्चाची ‘डिजिटल’ फलकांद्वारे भाविकांना माहिती मिळत राहील, अशी व्यवस्था केल्यास पारदर्शकता टिकून रहाते. भाविकालाही दानाचा विनियोग मंदिर व्यवस्थापनाकडून कशा प्रकारे केला आहे ? ते माहिती होते. मंदिराकडून धार्मिक आणि आध्यात्मिक व्यतिरिक्त अन्य कारणांसाठी निधी व्यय केला असल्यास भाविकही ते लक्षात आणून देऊ शकतात.

१४. मंदिरात सूचना वही असणे अपेक्षित !

भाविकांना मंदिराची व्यवस्था, बांधकाम, सुविधा यांविषयी काही सुचवायचे असेल अथवा काही चुकीचे आढळले, तर भाविक सूचना वहीत त्याच्या नोंदी करू शकतात. भाविकांच्या सूचनांच्या अनुषंगाने मंदिर व्यवस्थापनाने काय कृती केली ? हा रकाना ठेवल्यास अथवा त्याला त्याविषयी कळवल्यास भाविकांनाही सूचना दिल्याचे समाधान होते आणि तो मंदिरासाठी अधिक सक्रीय होऊ शकतो.

१५. मंदिरात भाविक, भक्त आणि कर्मचारी यांचे प्रशिक्षण

     मंदिराचे व्यवस्थापन करण्यासाठी मंदिरात कार्य करणारे विश्वस्त, भक्त आणि कर्मचारी यांना मंदिरातील विविध व्यवस्था सांभाळण्यासाठी खरे तर प्रशिक्षण द्यायला हवे. मंदिरात स्वत:सह मंदिराचे पावित्र्य कसे टिकवून ठेवले पाहिजे ? मंदिरात सेवा कशा कराव्यात ? संभाव्य अडचणी, समस्या यांवर उपाययोजना करणे, मंदिरातील गर्दीचे नियमन करणे, दशनार्थींना सुविधा कशी होईल ? यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक सूत्रे त्यांच्या प्रशिक्षणात येऊ शकतात. प्रशिक्षण घेतले असल्यास त्यांना मंदिरातील व्यवस्था सांभाळणे सोपे जाईल.

१६. मंदिरांचे संघटन करणे

आपल्या भागात, तालुक्यात, जिल्ह्यात, शहराच्या ठिकाणी अनेक मंदिरे असतात; मात्र त्यांच्यात एकमेकांमध्ये विशेष संपर्क नसतो. मंदिराशी निगडित विषयांविषयी संवाद नसतो. या मंदिरांचे विश्वस्त, व्यवस्थापन सांभाळणारे भक्त एकमेकांच्या संपर्कात राहिल्यास समान समस्यांवर काय समान उपाययोजना काढता येईल, हे ते ठरवू शकतात. स्थानिक मंदिरांचा जिर्णाेद्धार, मंदिरांच्या परिषदा घेणे असे विषय ते ठरवू शकतात.

१७. मंदिराचे संकेतस्थळ

मंदिराशी संबंधित अधिकाधिक माहिती संकेतस्थळावर स्थानिक आणि राष्ट्रीय भाषेत उपलब्ध असावी. यामध्ये मंदिराचा इतिहास, मंदिर कधी बांधले गेले ? मंदिर बांधकामाविषयी प्रेरणा, अनुभूती इत्यादी माहिती असावी. मंदिराची वैशिष्ट्ये आणि त्यासंबंधी काही कथा, उदाहरणे असतील, तर ती अवश्य नमूद करावीत. देवतेच्या दर्शनाच्या वेळा, देवतेच्या पूजेच्या वा विधींच्या वेळा, आरतीच्या वेळा, विविध धार्मिक विधींची माहिती आणि ते कधी केले जातात ? अशा प्रकारची माहिती असावी. मंदिरात कसे जायचे ? जवळचे रेल्वेस्थानक, बसथांबा येथून मंदिरात कसे जायचे ? हेही दिले पाहिजे. मंदिराची धर्मशाळा, भक्तनिवास असल्यास त्यात खोली आरक्षण करण्यासाठी सुविधा संकेतस्थळावर असावी. दूरवर रहाणारे भक्त तिचा लाभ घेऊ शकतात.

मुंबई विद्यापिठात ‘ऑक्सफर्ड हिंदु स्टडिज’च्या साहाय्याने ‘मंदिर व्यवस्थापन (टेंपल मॅनेजमेंट)’ नावाचा ६ मासांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची व्यवस्था केली जाणार आहे, ही बातमी नुकतीच वाचनात आली. मंदिर व्यवस्थापन म्हणजे केवळ पाश्चात्त्यांप्रमाणे ‘रिसोर्स मॅनेजमेंट’ (उपलब्ध साधनसंपत्तीचा सुयोग्य वापर) एवढा विचार केल्यास त्याचा खरा लाभ होणार नाही. उदा. मंदिरात सौर ऊर्जा यंत्रणा बसवणे, फुलांचे खत अथवा फुलांपासून उदबत्ती सिद्ध करणे असा केवळ व्यावहारिक लाभाचा विचार करण्यापुरते सीमित राहू नये वाटते. मंदिरे ही हिंदूंची ऊर्जाकेंद्रे आहेत, उपासना केंद्रे आहेत, तेथून भाविकाला चैतन्य, ऊर्जा यांचा लाभ होऊन साधनामार्गावर तो गतीमान व्हायला हवा.

भाविकांच्या दृष्टीने मंदिर व्यवस्थापन मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न केला आहे. यात अशी अन्य अनेक सूत्रे असतील, जी समाविष्ट झाली नसतील. काही मंदिरे यापेक्षा अन्य अनेक प्रकारे भाविकांना सेवा देत असतील. ती सूत्रेही कुणी लक्षात आणून दिल्यास त्यांवरही विचार करून पुढील लिखाणात समाविष्ट करून घेऊ शकतो.                                                              (समाप्त)

श्री गुरुचरणार्पणमस्तु ।

– श्री. यज्ञेश सावंत, सनातन संकुल, देवद, पनवेल. (३०.१.२०२४)

मंदिराची सुरक्षा

मंदिर सुरक्षा हा सध्या महत्त्वाचा विषय आहे. हिंदूंची मंदिरे ही धर्मांध परकीय आक्रमकांची आक्रमणाची मुख्य स्थाने राहिली आहेत. हे क्रूर जिहादी हिंदूंच्या मंदिरांतील संपत्ती लुटण्यासाठी त्यांवर वारंवार आक्रमणे करत आणि हिंदु श्रद्धास्थानांचे अस्तित्व मिटण्यासाठी त्यावर मशीद उभी करत. आज आक्रमक नसले, तरी हिंदूंच्या मंदिरांमध्ये चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. प्रसिद्ध मंदिरेही त्यातून सुटलेली नाहीत. दंगलींच्या वेळी मंदिरांवर दगडफेक होते. आगामी काळात जातीय दंगलींचे प्रमाण वाढू शकते, असे अनेक भविष्याच्या जाणकारांचे म्हणणे आहे. अशा वेळी हिंदु मंदिरे ही हिंदूंना सुरक्षितरित्या एकत्र येण्याची ठिकाणेही होऊ शकतात किंवा मंदिर वाचवण्यासाठीही हिंदूंना एकत्र यावे लागेल. तेव्हा गडबड-गोंधळ टाळण्यासाठी आपापल्या मंदिराच्या सुरक्षेचा आराखडा सिद्ध करावा लागेल ! – श्री. यज्ञेश सावंत (३०.१.२०२४)