पश्चिम आणि दक्षिण हिंद महासागर क्षेत्रात भारताची स्थिती बळकट होणार
मस्कत – सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणार्या ओमानमधील दुक्म बंदरात भारताला थेट प्रवेश देण्यास ओमान सरकारने अनुमती दिली आहे. यामुळे भारताला पर्शियन गल्फमधून व्यापार करणे सुलभ जाईल, अशी अपेक्षा आहे. ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक हे साधारण २ महिन्यांपूर्वी भारताच्या दौर्यावर आले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पश्चिम आणि दक्षिण हिंद महासागर क्षेत्रात भारताची स्थिती बळकट होण्यास साहाय्य होईल. तसेच हे पाऊल लाल समुद्र आणि पश्चिम हिंद महासागर क्षेत्रात चालू असलेल्या संकटमय हालचालींमुळे भारतीय नौदलाची भूमिका वाढण्यास साहाय्यभूत ठरू शकते.
सौजन्य : Pathfinder by Unacademy
दुक्म बंदर इतके महत्त्वाचे का आहे?
दुक्म बंदर मुंबईपासून पश्चिमेकडे सरळ दिशेला आहे. अशा स्थितीत ओमानच्या दुक्म बंदरातून भारत स्वतःच्या मालाची सौदी अरेबिया आणि त्यापलीकडे भूमार्गाने सहज वाहतूक करू शकतो. यासह एडनच्या आखात आणि लाल समुद्र यांना लागून असलेल्या भागांत हुती बंडखोरांच्या आक्रमणांना सामोरे जाणे शक्य होणार आहे. या क्षेत्रात नुकत्याच झालेल्या हिंसाचारामुळे सागरी व्यापारावर वाईट परिणाम झाला आहे.
ओमानी बंदराचा भारताला कसा लाभ होईल?
ओमानचे दुक्म बंदर सागरी सहकार्याच्या क्षेत्रात भारताला रसद पुरवण्यात साहाय्यभूत ठरेल. भारतीय आणि आफ्रिकन बाजारपेठांना पुरवठा करणार्या ‘शिपिंग लाइन’साठी (एका बंदरातून दुसर्या बंदरात माल आणि प्रवासी यांची वाहतूक करणार्या संस्थेसाठी) हे बंदर सहज उपलब्ध होणार आहे.
नौकांच्या दुरुस्तीची सुविधाही उपलब्ध !
दुक्म बंदराच्या विशेष आर्थिक विभागात नौकांची दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत नौकांच्या दुरुस्तीचे कामही सहज करता येते. हे बंदर ओमानची राजधानी मस्कतच्या दक्षिणेस ५५० किमी अंतरावर आहे. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती येथे दुक्म येथून रस्त्याने सहज पोचता येते.