देशभरातील मंदिरे सरकारी नियंत्रणातून सोडवणार ! – मिलिंद परांडे, राष्ट्रीय महामंत्री, विश्व हिंदु परिषद

डावीकडून सर्वश्री श्रीराज नायर, मिलिंद परांडे, संतोष नाईक आणि संजय नाईक

पणजी, ३ फेब्रुवारी (वार्ता.) : ‘मंदिर वही बनायेंगे’ हे वचन विश्व हिंदु परिषदेने पूर्ण केले असून आता देशभरातील मंदिरे सरकारी नियंत्रणातून सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी माहिती विश्व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री श्री. मिलिंद परांडे यांनी दिली. पणजी येथील हॉटेल मनोशांती येथे झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. परांडे यांनी विश्व हिंदु परिषदेच्या भविष्यातील कार्याची माहिती दिली. या वेळी विश्व हिंदु परिषदेचे प्रांत सहमंत्री श्रीराज नायर, विभाग अध्यक्ष संतोष नाईक आणि गोवा विभाग सहमंत्री संजय नाईक उपस्थित होते.

श्री. परांडे पुढे म्हणाले, ‘‘दक्षिण भारतातील मंदिरे अधिक प्रमाणात सरकारी नियंत्रणाखाली आहेत. त्या दृष्टीने राज्य आणि केंद्र स्तरांवर व्यापक कायदा केला जावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मंदिरांसाठी काम करतांना ‘हिंदूंचा पैसा हिंदूंसाठी’ या तत्त्वाचा वापर करत मंदिरांत आलेले अर्पण धर्मप्रचार, मंदिरांचा विकास आणि हिंदूंमधील वादांचे निराकरण करण्यासाठीची व्यवस्था उभी करणे, यांसाठी वापरला जाणार आहे. यासाठी विचारवंतांच्या गटाच्या साहाय्याने अभ्यास करून एखाद्या मंदिराच्या व्यवस्थापनाचे ‘मॉडेल’ (नमुना) उभे करण्यासाठी प्रयत्न असेल.’’

न्यायालयाने काशीविश्वनाथाच्या मंदिरात पूजेसाठी हिंदूंना दिलेल्या निर्णयाचे स्वागत श्री. परांडे यांनी केले. आगामी काळात लव्ह जिहाद आणि ख्रिस्ती मिशनर्‍यांद्वारे होणारे धर्मांतर रोखणे, तसेच अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश येथून भारतात आलेल्या हिंदूंना भारताचे नागरिकत्व मिळावे, यांसाठीही कार्य केले जाणार आहे. यंदा विश्व हिंदु परिषदेचे ६० वे वर्ष असल्याने शिक्षण, गरजूंचा आर्थिक विकास, आरोग्य या क्षेत्रांतील सेवा प्रकल्पांची संख्या वाढवण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.

ख्रिस्त्यांकडून गोव्यातील मंदिरे  उद्ध्वस्त केल्याचे पुरावे उपलब्ध असणे, हा महत्त्वाचा भाग !

‘पूर्वी ख्रिस्त्यांकडून धर्मांतराच्या काळात गोव्यातील मंदिरे तोडली गेल्याचे पुरावे उपलब्ध आहेत, जे भारतात कुठल्याही मंदिरांच्या संदर्भात उपलब्ध नाहीत. गोव्यातील मंदिरे उद्ध्वस्त केल्याविषयी पुरावे उपलब्ध असणे, हा महत्त्वाचा भाग आहे. त्या दृष्टीने हिंदु समाजाने पुढे येण्याचा हा भाग आहे’, असे मत श्री. परांडे यांनी व्यक्त केले.