जालना येथे जाणारा गॅस टँकर अचानक उड्डाणपुलाच्या दुभाजकावर चढला !

गॅस गळतीमुळे आणीबाणी उद्भवली !

छत्रपती संभाजीनगर – जालना येथे जाणारा एक गॅस टँकर अचानक उड्डाणपुलाच्या दुभाजकावर चढला. त्यामुळे टँकरचे २ व्हॉल्व्ह उघडले असून त्यातून गॅस गळती होत आहे. येथील सिडको बसस्थानक भागात टँकरमधून गॅस गळती होत असल्याने आणीबाणी उद्भवली आहे. १ फेब्रुवारीच्या पहाटे ६ वाजल्यापासून ही गॅस गळती चालू आहे. यामुळे या भागातील शाळा, वाहतूक, दुकाने, उपाहारगृहे आणि अन्य प्रतिष्ठाने पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहेत.

काळजी म्हणून या भागातील नागरिकांना विजेची उपकरणे बंद ठेवण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. या घटनेमुळे शहराची जीवनवाहिनी असणारा जालना रस्ता पूर्णतः बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. टँकरमधील गॅस निकामी करण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत टँकरमधून केवळ २ मेट्रिक टन गॅस बाहेर काढण्यात आला आहे, तर अजूनही १६ मेट्रिक टन गॅस काढणे शेष आहे. जळगाव येथील ‘इमर्जन्सी रेस्क्यू टीम’ही घटनास्थळी आली आहे. टँकरमधील गॅस दुसर्‍या टँकरमध्ये नैसर्गिक पद्धतीने भरण्याचे काम चालू झाले आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात आल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिली.