UNESCO World Heritage List : युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या सूचीत समावेश होण्यासाठी भारताकडून छत्रपती शिवरायांच्या गडांचे नामांकन !

(युनेस्को ही संयुक्त राष्ट्रसंघाची शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था आहे.)

मुंबई – युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या वर्ष २०२४-२५ च्या सांस्कृतिक स्थळांच्या सूचीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडांचा समावेश होण्यासाठी केंद्राने १२ गडांचे नामांकन केले आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूशी झुंज देण्यासाठी ज्या १२ गडांचा सैन्य तळांसाठी वापर केला, त्यांचा यात समावेश आहे.

१. यामध्ये शिवनेरी, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, साल्हेर, राजगड, खंडेरी, प्रतापगड आणि तमिळनाडूमधील जिंजी या गडांची निवड करण्यात आली आहे.

२.  १७ व्या आणि १९ व्या शतकात मराठा शासनकाळात या गडांचा वापर करून राज्यकर्त्यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला. सह्याद्री, कोकण किनारपट्टी आणि दख्खनच्या पठारावर असलेल्या या गडांचे भौगोलिक, सांस्कृतिक असे महत्त्व आहे, असे ‘प्रेस इन्फर्मेशन ब्युरो’ने म्हटले आहे.

३. आतापर्यंत भारतातील ४२ आणि त्यांत महाराष्ट्रातील ६ ठिकाणांचा समावेश युनेस्कोच्या या सूचीत आहे.