Kerala PFI Death Penalty : केरळमध्ये भाजप नेत्याची हत्या करणार्‍या पी.एफ्.आय.च्या १५ जणांना फाशीची शिक्षा !

(पी.एफ्.आय. म्हणजे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया)

फाशीची शिक्षा झालेले आरोपी

थिरूनवंनपूरम् (केरळ) – केरळमधील भाजपचे नेते रंजीत श्रीनिवास यांची १९ डिसेंबर २०२१ या दिवशी त्यांच्या अलाप्पुझा येथील घरात निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येतील १५ आरोपींना दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अजमल, अनूप, महंमद अस्लम, अब्दुल कलाम उपाख्य सलाम, सफरुद्दीन, मन्शद जसीब राजा, नवाज, समीर, नझीर, अब्दुल कलाम, झाकीर हुसैन, शाजी, नैसम आणि शेरनास अश्रफ अशी त्यांची नावे असून ते बंदी घालण्यात आलेली जिहादी आतंकवादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे (पी.एफ्.आय.चे) सदस्य होते. मावेलीक्कर जिल्हा न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली. १५ पैकी ८ आरोपींनी प्रत्यक्ष हत्या करण्यात सहभागी होते, तर इतर आरोपींनी या गुन्ह्यात मुख्य आरोपींना साहाय्य केले होते.

हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण ! – रंजीत यांची पत्नी लिशा

रंजीत यांच्या पत्नी लिशा यांनी या शिक्षेवर समाधान व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, हे केवळ एक हत्येचे प्रकरण नाही, तर दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण आहे. माझ्या डोळ्यांदेखत माझ्या पतीवर आक्रमण करण्यात आले आणि त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली.

संपादकीय भूमिका

याला म्हणतात कठोर शिक्षा ! हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या करणार्‍यांना हिच शिक्षा मिळायला हवी. आता या शिक्षेची तात्काळ कार्यवाही होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे, अन्यथा पूर्वीचे अनुभव पहाता जिहादी ही शिक्षा रहित करण्याचा आटोकाट प्रयत्न करतील, हेही निश्‍चित आहे !