बेंगळुरू (कर्नाटक) – श्रीराममंदिरातील श्री रामललाच्या मूर्तीसाठी वापरण्यात आलेला दगड ज्या व्यक्तीने पुरवला होता, त्याला कर्नाटकातील काँग्रेस सरकारने बेकायदेशीर खाणकाम केल्यावरून ८० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे. श्रीनिवास नटराज असे त्यांचे नाव असून तेे खाणकाम करण्याचे कंत्राट घेतात. सरकारने ठोठावलेला दंड भरण्यासाठी नटराज यांना त्यांच्या पत्नीचे दागिनेही गहाण ठेवावे लागले.
१. नटराज हरोहल्ली-गुज्जेगौदनपुरा गावात रहाणारे असून त्यांना रामदास नावाच्या शेतकर्याने त्याच्या शेतभूमीतील खडक काढण्याचे कंत्राट दिले होते. या भूमीचा एक मोठा खडक नटराज यांनी ३ दगडांमध्ये विभागला होता. यातीलच एक दगड श्री. अरुण योगीराज यांनी श्री रामललाच्या मूर्तीसाठी निवडला होता.
२. नटराज यांनी सांगितले की, मी केवळ खडक स्वच्छ केले; मात्र खाण आणि भूगर्भशास्त्र विभागाने बेकायदा खाणकाम केल्याचा आरोप करत दंड ठोठावला. या प्रकरणी मलाही कुणीतरी साहाय्य करील, याची मी वाट पहात आहे.
ज्या भूमीतून श्री रामललाच्या मूर्तीसाठी दगड मिळाला, तेथेही बांधण्यात येणार श्रीराममंदिर !
रामदास या ७० वर्षीय दलित शेतकर्याच्या मालकीच्या भूमीतून हा दगड काढण्यात आला होता. आता ते येथे श्रीराममंदिर बांधणार आहेत. रामदास म्हणाले की, येथे दक्षिणेला अंजनेय मंदिर आहे. ज्या भूमीतून श्री रामललाच्या मूर्तीसाठी दगड काढण्यात आला, त्या जागेकडे अंजनेयची मूर्ती पहात आहे. त्यामुळे मी तेथे श्रीरामाचे मंदिर बांधण्यासाठी ४ गुंठे भूमी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. या मंदिरासाठी श्रीरामाची मूर्ती घडवण्यासाठी आम्ही श्री. अरुण योगीराज यांची भेट घेणार आहोत.
संपादकीय भूमिका‘कर्नाटकातील काँग्रेस सरकार म्हणजे रावणाचे सरकार’, असे कुणी म्हटले, तर आश्चर्य वाटू नये ! |