‘हल्लीच्या विवाहात ‘पती-पत्नींचे जुळेल ना’, याची काळजी असते. पू. (सौ.) अश्विनी आणि श्री. अतुल पवार विवाह करून एक झाले. तेव्हा ‘केवळ तेच एकत्र झाले’, असे नसून ‘या दोघांची पूर्ण कुटुंबे एकत्र झाली आहेत’, हे आज लक्षात आले. याबद्दल या दोघांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे कौतुक करावे, तेवढे थोडे. सर्व नवविवाहितांपुढे त्यांनी एक आदर्श ठेवला आहे. याबद्दल दोघांचे कौतुक करावे, तेवढे थोडे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
‘एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले मला म्हणाले होते, ‘‘तुला माहेर आणि सासर या दोन्ही कुटुंबांत चांगली माणसे कशी लाभली ?’’ खरे तर त्यांच्या कृपेनेच मला चांगले माहेर आणि सासर मिळाले आहे. ‘मला या दोन्ही कुटुंबातील साधक जिवांची गुणवैशिष्ट्ये लिहिण्याची संधी मिळाली’, याबद्दल मी गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) चरणी कृतज्ञ आहे.
१. सासरी आणि माहेरी सर्व जण साधना करणारे असणे
माझ्या विवाहापूर्वी माझ्या माहेरी मी, माझी आई (श्रीमती पुष्पा साळुंखे) आणि माझा भाऊ (श्री. सचिन साळुंखे) असे आम्ही तिघे जण सनातनच्या माध्यमातून साधना करत होतो. माझे वडील (कै. सदाशिव साळुंखे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) वारकरी संप्रदायानुसार साधना करत असत. त्यांचा काही प्रमाणात आमच्या साधनेला विरोध असे. माझ्या सासरच्या कुटुंबातील सर्व जण (माझे यजमान (श्री. अतुल), सासू (सौ. मंदाकिनी पवार (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के)-सासरे श्री. केशव पदु पवार (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), दोन्ही नणंदा (सौ. वेदिका जगताप आणि कु. शीतल पवार (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) साधना करणारे आहेत.
२. सून आणि तिच्या माहेरची माणसे यांच्याशी सासरच्या माणसांचे असलेले आपुलकीचे वागणे
२ अ. वडिलांना मुलीच्या सासरी जाण्याचा फार उत्साह असणे
२ अ १. वडिलांनी मुलीच्या सासरी नेण्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवण्यात पत्नीला साहाय्य करणे : माझ्या वडिलांना (कै. सदाशिव बापू साळुंखे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) माझ्या सासरी बार्शी (जिल्हा सोलापूर) येथे जाण्याचा फार उत्साह असे. ते माझ्या सासरी येण्याच्या काही दिवस आधीपासून माझ्या आईला मला सासरी नेण्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवायला सांगत असत. ते काही वेळा माझ्या आईला पदार्थ बनवण्यासाठी साहाय्यही करायचे.
२ अ २. बार्शीला आल्यावर माझ्या सासूबाई (सौ. मंदाकिनी केशव पवार (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) माझ्या वडिलांचे आदरातिथ्य करण्यात कुठेच न्यूनता ठेवत नसत. हे पाहून माझे वडील भारावून जात असत.
२ अ ३. सासरे आणि वडील यांच्यातील मित्रत्वाचे नाते पाहून अन् दोघेही मोकळ्या मनाने अन् आपलेपणाने वागत असलेले पाहून आश्चर्य वाटणे : माझा विवाह जमवण्याच्या वेळी माझे सासरे (श्री. केशव पदु पवार) आणि वडील यांच्यात मित्रत्वाचे नाते निर्माण झाले होते. त्या दोघांना दर काही दिवसांनी एकमेकांशी बोलल्याविना चैन पडत नसे. माझे वडील माझ्यापेक्षा माझ्या सासर्यांना अधिक वेळा दूरभाष करायचे.
माझ्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर काही मासांनी ते बार्शीला (माझ्या सासरी) आले होते. त्या वेळी सासरे आणि वडील यांच्यात ‘वडिलांनी आता मधून मधून बार्शीला निवांतपणे विसावा घेण्यासाठी यायचे’, असे बोलणे व्हायचे आणि त्यानुसार त्या दोघांनी नियोजन केले होते. ‘सध्याच्या कलियुगात वडील मुलीच्या सासरी एवढ्या आनंदाने रहाणे’, हा विचार करणेही कठीण आहे; पण ‘माझे वडील आणि सासरे दोघेही मोकळ्या मनाने अन् आपलेपणाने वागत’, हे पाहून मलाही काही वेळा आश्चर्य वाटायचे.
२ आ. यजमान श्री. अतुल आणि सासूबाई (सौ. मंदाकिनी पवार) यांचे माहेरच्या माणसांशी मनमोकळेपणाने वागणे
२ आ १. माझा भाऊ एकदा बार्शीला आला असतांना माझ्या सासूबाईंनी केलेले शेवयांचे लाडू त्याला फार आवडले. त्यानंतर सासूबाईंनी मी माहेरी जातांना अनेक वेळा भावासाठी शेवयांचे लाडू करून दिले.
२ आ २. सूनेच्या भावाविषयी आत्मीयता असल्याने त्याचा विवाह पुढाकार घेऊन ठरवणे आणि सासूबाईंनी आपलेपणाने घरकामात साहाय्य करणे : माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर माझ्या भावाचा (श्री. सचिन साळुंखे यांचा) विवाह ठरवण्यासाठी माझे सासू-सासरे प्रयत्न करत होते. आजकाल सूनेच्या भावाविषयी आत्मीयता असणे, हे पहायला मिळत नाही. मला माझ्या सासूबाईंमध्ये हा गुण पहायला मिळाला.
माझ्या भावाच्या विवाहाच्या वेळी सासूबाई २ दिवस आमच्या गावी राहिल्या होत्या. त्या वेळी त्या माझ्या माहेरच्या सर्व माणसांशी एकरूप झाल्या होत्या. त्यांनी त्या कालावधीत माझ्या माहेरी भांडी घासणे, केर काढणे, अशी कामेही केली. सूनेच्या माहेरी जाऊन कामे करणे, हे सासूला अपमानास्पद वाटते; पण माझ्या सासूबाईंना त्याचे काही न वाटता त्यांनी सर्व कामे आपलेपणाने केली.
२ आ ३. श्री. अतुल यांचेही माझ्या भावाशी मित्रत्वाचे नाते आहे.
२ आ ४. श्री. अतुल यांच्या सहकार्यामुळे भावाच्या विवाहकार्यात वडिलांची उणीव न भासणे : माझ्या माहेरच्या गावी जावयाला पुष्कळ मान देतात, तरीही श्री. अतुल यांनी ‘जावई’ हे नाते विसरून कर्तव्यभावनेने विवाहाचे दायित्व पार पाडायला मला पुष्कळ साहाय्य केले. श्री. अतुल यांच्या सहकार्यामुळे विवाहकार्यात मला वडिलांची उणीव कुठेच भासली नाही.
२ आ ५. यजमानांनी माहेरच्या माणसांमध्ये समरस होणे : माझे माहेर खेडेगावात आहे. तेथे फारशा सुख-सुविधा नाहीत, तरीही श्री. अतुल तेथे आनंदाने रहातात आणि इतरांनाही आनंद देतात. ते माहेरच्या माणसांमध्ये समरस होतात. माझ्या माहेरची माणसे श्री. अतुल यांचे कौतुक करतात. श्री. अतुल यांचे माझ्या चुलत भावांशीही मित्रत्वाचे नाते आहे.
२ इ. सासू-सासर्यांचे सूनेशी असलेले आध्यात्मिक नाते
२ इ १. सासू-सासर्यांनी सुनेला गुण-दोषांसहित स्वीकारणे : सासू-सासर्यांनी मला कधीच सुनेप्रमाणे वागवले नाही. त्यांनी माझा गुण-दोषांसहित स्वीकार केला आहे. मला माझे सासू-सासरे यांच्याकडून कुलाचार, आचारधर्म, पाहुणचार असे किती तरी संस्कार मला शिकायला मिळाले आणि अजूनही शिकायला मिळतात.
२ इ २. सूनेशी मोकळेपणाने बोलणे : सासूबाईंना माझ्याकडून कोणतीच अपेक्षा नसते. त्या साधनेत पुढच्या टप्प्याला असल्याने त्या नेहमीच माझ्याशी आध्यात्मिक स्तरावर वागतात. आम्ही दोघी मैत्रिणींप्रमाणे एकमेकींशी बोलू शकतो. त्या माझ्याजवळ त्यांचे मन मोकळे करतात. त्यांची आध्यात्मिक प्रगल्भताही थक्क करणारी आहे. मी सून असूनही त्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन ‘संत’, असा असतो. त्यांचे मन फार उदार आहे.
२ ई. माझ्या सासू-सासर्यांनी माझ्या माहेरचे वातावरण, माझी चुलत भावंडे, आत्या, काका, आजोळ, यांच्याविषयी कसलीच अनावश्यक विचारपूस केली नाही.
३. सासरच्या माणसांचे कौतुक करणारी माहेरची माणसे
३ अ. आई-वडिलांनी सासरी गेलेल्या मुलीवर चांगले संस्कार करून तिला सतत कर्तव्याची जाणीव करून देणे : मुलगी सासरी गेल्यानंतर मुलीचे आई-वडील तिला भ्रमणभाष करून ‘सासरची माणसे चांगली वागतात का ? तुला काही त्रास होत नाही ना ?’, अशी विचारणा करतात; पण माझ्या आई-वडिलांनी मला सतत माझ्या कर्तव्यांची जाणीव करून देऊन माझ्यावर चांगले संस्कार केले. त्यांनी इतक्या वर्षांत माझ्या सासरी ‘काही प्रसंग घडले का ? कुणाशी मतभेद झाले का ? सासरच्यांचे स्वभाव कसे आहेत ?’, असे मला कधीच विचारले नाही. मी सासरी असतांनाही ते मला १५ दिवसांतून १ किंवा २ वेळा दूरभाष करत किंवा काही वेळा मीच त्यांना दूरभाष करत असे.
३ आ. आईचे मुलीच्या नणंदेशी आपुलकीचे संबंध असणे : माझी नणंद माधुरी (आताची सौ. वेदिका जगताप) आणि माझी आई यांनाही एकमेकींविषयी आपलेपणा आहे. आई म्हणते, ‘‘मला माधुरीशी बोलल्यावर मुलीशी बोलल्यासारखे वाटते.’’
३ इ. आईने मुलीच्या सासरी पाहुण्यासारखे न रहाता घरकामात साहाय्य करणे : आई बार्शीला माझ्या सासरी आल्यावर ती पाहुण्यांप्रमाणे न बसता स्वयंपाकघरात जाऊन आपलेपणाने स्वयंपाकही करते आणि सासूबाई आईला साहाय्य करतात.
३ ई. अन्यत्र ‘सासू आणि जावई’ हे नातेही फारसे मोकळेपणाचे अनुभवायला मिळत नाही; परंतु माझी आई अन् श्री. अतुल यांचे नाते मोकळेपणाचे आहे. आई श्री. अतुल यांना काही सूत्रे मोकळेपणाने सांगते.
३ उ. मुलीच्या नणंदेच्या बाळंतपणाच्या वेळी आईने ४ दिवस तिच्या घरी राहून कामे करणे : माझ्या नणंदेच्या बाळंतपणाच्या वेळी सासूबाई नणंदेच्या घरी राहिल्या होत्या. त्याच कालावधीत मी आणि यजमान बार्शीला एका कामासाठी ४ दिवस जाणार होतो. आम्ही मुळातच घरी अल्प दिवस रहात असल्याने सासूबाईंना आमच्या समवेत अनेक मासांनी किंवा एका वर्षाने रहायला मिळते. या वेळी नेमके आम्ही बार्शीला जाणार अन् सासूबाई तिथे नव्हत्या. त्या ४ दिवसांच्या कालावधीत माझी आई माझ्या नणंदेजवळ राहिल्याने सासूबाई ४ दिवस आमच्या समवेत बार्शीला येऊ शकल्या. आईलाही माझ्या नणंदेच्या घरी कामे करण्यात न्यूनता वाटली नाही. तिने ते सेवा म्हणून केले.
३ ऊ. माझे वडील माहेरच्या नातेवाइकांना सांगत, ‘‘अश्विनीच्या घरची माणसे ‘देवमाणसे’ आहेत.’’
४. माहेर आणि सासर यांतील व्यक्तींची जाणवलेली सामायिक गुणवैशिष्ट्ये
४ अ. मुलगा आणि सून यांनी आश्रमात रहाण्याविषयी आक्षेप न घेणे अन् त्यातून त्यांच्या मनाची उदारता दिसून येणे : विशेष म्हणजे माझे सासू-सासरे आणि आई-वडील यांनी आमच्या जीवनात कधी हस्तक्षेप केला नाही. विवाह झाल्यापासून २ मासांनंतर मी आणि यजमान सेवेसाठी वेगवेगळ्या आश्रमांत राहू लागलो. विवाहाला १० वर्षे होऊनही असेच चालू आहे; पण या चौघांनी आम्हा पती-पत्नींना ‘तुम्ही वेगळे का रहाता ?’, असा प्रश्न कधीच विचारला नाही, तसेच त्यांनी आमची कधी विनाकारण चिंताही केली नाही. त्यांनी आम्हाला नात्याच्या बंधनात अडकवलेही नाही. या प्रसंगातून त्यांच्या मनाची उदारता लक्षात येते.
४ आ. आई-वडील आणि सासू-सासरे यांनी एकमेकांच्या कुटुंबांविषयी अनावश्यक चौकशी न करणे : माझे आई-वडील आणि सासू-सासरे हे चौघेही मुळातच अंतर्मुख असल्याने त्यांनी कधी परस्परांच्या कुटुंबाविषयी अनावश्यक चौकशी केली नाही किंवा कधी एकमेकांची उणी-दुणी काढली नाहीत. आतापर्यंत आई-वडिलांनी सासरच्या माणसांविषयी आणि सासू-सासर्यांनी माहेरच्या व्यक्तींविषयी कधी नकारात्मक बोलल्याचे मी ऐकले नाही.
४ इ. माहेरी आणि सासरी या दोन्ही घरांत मला गोकुळासारखा आनंद मिळतो. दोन्हीकडील माणसांच्या प्रेमामुळे मला सासर आणि माहेर यांत कधीच भेद जाणवला नाही.
५. सासरच्या कुटुंबातील अन्य व्यक्ती
अ. नणंद : सौ. वेदिका संजय जगताप (वय ३३ वर्षे) (साधिका आहे.)
आ. नणंदेचे यजमान : श्री. संजय कल्याण जगताप (वय ३८ वर्षे) (साधक आहेत.)
इ. नणंदेचा मुलगा : कु. अवधूत संजय जगताप (वय ८ वर्षे) (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के)
ई. नणंदेची मुलगी : चि. अनुश्री संजय जगताप (वय १ वर्ष) (आध्यात्मिक पातळी ५७ टक्के)
६. माझे अन्य नातेवाईक सकाम साधना आणि भक्तीमार्गाने साधना करणारे असून ते सनातनचे वाचक अन् हितचिंतक आहेत. दोन्ही कुटुंबांत कुणाचाच साधनेला विरोध नाही.
‘गुरुदेवांनी मला ही अनमोल नाती दिली’, त्याबद्दल मी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |