तैवानचे विद्यमान उपाध्यक्ष आणि ‘डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी’चे (डीपीपीचे) उमेदवार लाई चिंग-ते यांचा (हे विल्यम या ख्रिस्ती नावानेही ओळखले जातात) राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय झाला आहे. तैवानमध्ये १३ जानेवारी या दिवशी कायदेमंडळ आणि अध्यक्षपद या दोन्ही निवडणुकांसाठी मतदान पार पडले. त्यामध्ये ‘डीपीपी’ला सलग तिसर्यांदा ऐतिहासिक विजय मिळाला.
‘डीपीपी’च्या त्साई इंग-वेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या २ कारकीर्द पूर्ण केल्यानंतर आता त्यांचे सहकारी लाई चिंग-ते अध्यक्ष होणार आहेत. हा पक्ष चीनच्या विरोधात स्वायत्त आणि सार्वभौम तैवानसाठी भूमिका घेण्यासाठी ओळखला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये चीन आणि तैवान यांच्यामध्ये तणाव वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर या निवडणुकीकडे बारकाईने लक्ष ठेवले जात होते.
१. लाई चिंग-ते यांनी ठरवलेली उद्दिष्टे
लाई यांनी यापूर्वी तैनान शहराचे महापौर म्हणून काम पाहिले आहे. ‘राष्ट्रीय संरक्षण, अर्थव्यवस्था आणि लोकशाही मित्र देशांशी सहकार्य बळकट करण्याचे काम पुढेही चालू ठेवणार आहे’, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच चीनचा करण्यात येत असलेला प्रतिकार यापुढेही कायम ठेवण्यावरही त्यांनी निवडणूक प्रचाराच्या वेळी भर दिला होता. ‘आपल्या सरकारमध्ये पक्षीय लाभ न पहाता क्षमता पाहून लोकांचा समावेश केला जाईल. त्यामुळे आव्हानांना कार्यक्षमपणे सामोरे जाता येईल, हे सरकार सर्वसमावेशक असेल आणि तैवानी जनतेला देशांतर्गत, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील आव्हानांचा सामना करण्यासाठी एकत्र आणेल’, असा विश्वास लाई यांनी व्यक्त केला आहे. मुत्सद्देगिरी, स्थैर्य, संरक्षण स्वयंपूर्णता, अर्थव्यवस्था, ऊर्जा, युवा आणि शिक्षणाचा दर्जा यांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
२. लाई यांना मिळालेले मताधिक्य
तैवानच्या केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीप्रमाणे लाई यांना ५० लाखांपेक्षा अधिक मते मिळाली. एकूण मतांमध्ये हे प्रमाण ४० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. ‘कौमितांग (के.एम्.टी.) पक्षा’चे उमेदवार हाऊ यू-इ यांना ३३ टक्के मते मिळून ते दुसर्या क्रमांकावर, तर तिसर्या क्रमांकावरील ‘तैवान पीपल्स पार्टी’चे को वेन-जे यांना २६ टक्के मते मिळाली. हाऊ यू-इ आणि को वेन-जे यांनी पराभव मान्य केला असला, तरी त्यांनाही कमी मते मिळालेली नाहीत आणि हे चिंग-ते यांच्यासाठी आव्हानात्मक ठरू शकते.
३. भावी राष्ट्राध्यक्ष लाई चिंग-ते यांच्या पुढील आव्हाने
चीनचा दबाव आणि युद्धाच्या धमक्या झुगारून तैवानच्या नागरिकांनी भरभरून मतदान केले आणि आपल्या देशाच्या स्वायत्ततेसाठी ठाम भूमिका घेणार्या व्यक्तीला राष्ट्राध्यक्षस्थानी बसवले. तैवानमध्ये निवडणुका चालू झाल्यापासून प्रथमच जनतेने एका पक्षाला सलग तिसरा कार्यकाळ दिला आहे. यामुळे चीनचे सगळे डाव फसले असून तैवान अधिक मुक्त लोकशाहीच्या दिशेने निघाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अर्थात् भावी अध्यक्ष लाई चिंग-ते यांचा मार्ग सुकर असणार नाही. ‘त्यांच्या पुढे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय आव्हाने कोणती आहेत ?’, ‘चीन आता तैवानविषयी अधिक आक्रमक होणार का ?’, ‘अमेरिका या नव्या सरकारला किती जवळ करणार ?’, अशा काही प्रश्नांचा वेध घ्यावा लागेल.
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे (१३.१.२०२४)