Bankrupt Pakistan : भुकेकंगाल पाकिस्तानात प्रतिकिलो कांदा तब्बल २५० रुपये !

काळजीवाहू सरकारच्या कालावधीत १२.४३ लाख कोटी रुपयांचे वाढले कर्ज !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भुकेकंगाल झालेल्या पाकमध्ये महागाई गगनाला भिडली आहे. लाहोर शहरात एक डझन अंड्यांची किंमत ४०० पाकिस्तानी रुपये असून प्रतिकिलो कांदा २५० रुपयांना विकला जात आहे. प्रशासन काही सामायिक किमती निर्धारित करण्यात सपशेल अपयशी ठरल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे सांगितले जात आहे. गेल्या साधारण वर्षभरापासून काळजीवाहू सरकार असून ८ फेब्रुवारीला संसदेच्या निवडणुका होत आहेत.

१. सरकारने कांद्याची किंमत १७५ पाकिस्तानी रुपये ठेवली असली, तरी तो याहून अधिक दराने विकला जात आहे. कोंबड्याचे मांस ६१५ रुपये प्रति किलोला विकले जात आहे.

२. गेल्या वर्षी कणकेची किंमत वाढल्याने काही ठिकाणी ती घेण्यामध्ये लोकांची चेंगराचेंगरी होऊन काही लोकांना त्यांचा जीवही गमवावा लागला होता.

३. पाकमध्ये एकूण कर्ज वाढून आता ६२ लाख कोटी पाकिस्तानी रुपये झाले आहे. केवळ काळजीवाहू सरकारच्या कालावधीतच १२.४३ लाख कोटी रुपये कर्ज नव्याने घेण्यात आले.

४. जागतिक बँकेने प्रसारित केलेल्या एका अहवालानुसार पाकिस्तानमध्ये येणार्‍या काळात जो काही विकास होईल, तो केवळ श्रीमंतांपर्यंतच सीमित राहील. पाकचा आर्थिक आराखडा डळमळीत आणि अप्रभावी ठरला आहे.

५. पाकमध्ये ३ दिवस आधीच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ७०० मिलियन डॉलर म्हणजे ५८ सहस्र कोटी रुपयांचे कर्ज मिळाले होते. ‘रॉयटर्स’ या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार जागतिक बँकेने पाकिस्तानी सरकारसमोर अट घातली होती की, व्याज दर, वीज आणि नैसर्गिक वायू यांचे मूल्य वाढवल्यास नव्याने कर्ज देण्यात येईल.

संपादकीय भूमिका 

जिहादी आतंकवाद आणि भारतद्वेष यांचा पाया असलेल्या अन् त्यात चिनी ड्रॅगनशी विविध करारांसाठी हातमिळवणी केलेल्या पाकची याहून वेगळी दशा काय होणार ?