कोल्हापूर जिल्ह्यातील संत बाळूमामा देवस्थानाच्या संभाव्य सरकारीकरणाच्या विरोधात उद्या धरणे आंदोलन !

संत बाळूमामा देवस्थान

कोल्हापूर – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथे असलेल्या संत बाळूमामा देवस्थानातील कथित भ्रष्टाचाराचे कारण देत विश्‍वस्त मंडळ विसर्जित करून तेथे सध्या प्रशासक नेमण्यात आले आहेत. जे सरकारी अधिकारी सरकारी कार्यालयात भ्रष्टाचार करत असतात, त्यांच्याकडे मंदिरांची व्यवस्था देणे म्हणजे ‘चोराच्या हातात तिजोरीच्या चाव्या’ देण्यासारखे आहे. त्यामुळे मंदिराच्या सरकारीकरणाला आमचा तीव्र विरोध आहे. तरी संत बाळूमामा देवस्थानाचे सरकारीकरण करू नये.

डावीकडून सर्वश्री दीपक देसाई, सुनील सामंत, सुनील घनवट (पत्रकार परिषदेला संबोधित करतांना), निखिल मोहिते आणि बाबासाहेब भोपळे

जे माजी विश्वस्त दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई करून बाळूमामांच्या प्रामाणिक भक्तांच्या ताब्यात हे देवस्थान द्यावे, अशी आमची मागणी आहे, असे वक्तव्य ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी केले. ते कोल्हापूरच्या ‘प्रेस क्लब’ येथे १५ जानेवारी या दिवशी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

१. श्री. घनवट पुढे म्हणाले की, आमच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी ‘सद्गुरु बाळूमामा देवस्थान संरक्षक कृती समिती’ आणि ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’ यांच्या वतीने १७ जानेवारी या दिवशी ‘बाळूमामा देवस्थान संरक्षक आंदोलन’ आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनाला क्रांती ज्योती चौक, गारगोटी येथे सकाळी १० वाजता प्रारंभ होईल.

२. या प्रसंगी ‘बाळूमामा हालसिद्धनाथ सेवेकरी संस्थे’चे अध्यक्ष श्री. निखिल मोहिते, ‘हिंदु एकता आंदोलना’चे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुनील सामंत आणि ‘सद्गुरु बाळूमामा देवस्थान संरक्षक कृती समिती’चे समन्वयक श्री. बाबासाहेब भोपळे उपस्थित होते.

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रसिद्धीपत्रक –

३. पत्रकार परिषदेला संबोधित करतांना श्री. भोपळे म्हणाले, ‘‘संत बाळूमामा देवस्थानाच्या कारभाराच्या संदर्भात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रारी प्राप्त झाल्यावर धर्मादाय आयुक्त कार्यालयाने पुढील पावले ज्या गतीने उचलली, त्यावर संशय व्यक्त होतो. एरव्ही कोणतेही काम गोगलगायीच्या संथगतीने करणार्‍या धर्मादाय कार्यालयाने देवस्थानासंदर्भातील तक्रारींची चौकशी करणे, कागदपत्रे पडताळणे, तसेच त्यासाठी सतत आदमापूर येथे जाणे या गोष्टी कोणत्या विशिष्ट हेतूने केल्या आहेत का ? याची दाट शंका उत्पन्न होते.’’

४. श्री. दीपक देसाई म्हणाले, ‘‘३ सहस्रांहून अधिक मंदिरे कह्यात असणार्‍या ‘पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती’च्या महाघोटाळ्याची राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी प्रारंभ होऊन ६ वर्षे उलटली, तरीही याचा अहवाल अद्याप समोर आलेला नाही. या मंदिरांची भूमी किती क्षेत्रफळाची आहे, तसेच अन्य लोकांकडे असलेली मंदिराची भूमी परत मिळवणे, या दृष्टीनेही याचे अन्वेषण अद्याप पूर्ण झालेले नाही. दोषींना शिक्षा होत नसेल, तर अशा चौकशा लावून काय उपयोग ? ही भक्तांची आणि जनतेची फसवणूकच आहे.’’

५. श्री. निखिल मोहिते म्हणाले, ‘‘देवस्थानामधील अनियमितता आणि भ्रष्टाचार बाहेर येऊनही अद्याप तो करणार्‍यांना शिक्षा का होत नाही ? यातील अनेक गोष्टी अद्याप बाहेर आलेल्या नाहीत, त्या का बाहेर येत नाहीत ? संत बाळूमामा हे त्यांच्यावर श्रद्धा असणार्‍या भक्तांचे आहेत आणि हे देवस्थान भक्तांच्या कह्यात राहिले पाहिजे. तरी ‘बाळूमामा हालसिद्धनाथ सेवेकरी संस्थे’च्या वतीने आमचा या आंदोलनास पूर्ण पाठिंबा आहे आणि इतर भक्तांनी त्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन आम्ही करतो.’’