१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या वाणीतून ‘प्रीती ओथंबून वहात आहे’, असे वाटणे
‘वर्ष १९९९ मध्ये मी सनातन संस्थेच्या संपर्कात आले. तेव्हा काही दिवसांतच मला गोवा येथील आश्रमात जाण्याची संधी मिळाली. त्या वेळी सौ. बिंदा नीलेश सिंगबाळ (आताच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ) आणि श्री. नीलेश सिंगबाळ (आताचे सद्गुरु नीलेश सिंगबाळ) यांच्याशी माझी भेट झाली. तेव्हा ते दोघेही मला आनंदी आणि शांत वाटले. दोघांचे बोलणेही अल्प होते. त्या वेळी सौ. सिंगबाळ साप्ताहिक ‘सनातन प्रभात’संबंधी सेवा करत होत्या. तेव्हा त्या अत्यंत अबोल होत्या; मात्र प्रत्येक क्षणी त्यांच्या चेहेर्यावर भाव आणि प्रीती जाणवत असे. ते पाहून मला ‘त्यांच्याकडे पहात रहावे’, असे वाटत असे. ‘त्यांच्याकडून प्रीतीचा स्रोत वहात आहे’, असे मला वाटत असे. आता त्यांच्यातील प्रीतीत पुष्कळ वृद्धी झाली आहे. आता ‘त्या बोलत असतांना त्यांच्या वाणीतून प्रीती ओथंबून वहात आहे’,असे मला वाटते.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी साधिकेच्या यजमानांच्या रुग्णाईत स्थितीत आणि त्यांच्या मृत्यूनंतर साधिकेला सर्वोतोपरी साहाय्य करून आधार देणे
श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी रामनाथी, गोवा येथील आश्रमातील सेवा पहाणे चालू केल्यावर माझे यजमान (कै. सुबोध नवलकर, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) रुग्णाईत असतांना माझा त्यांच्याशी अधिक संपर्क आला. त्यांनी माझ्या यजमानांना लागणार्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या सेवेत कोणतीही उणीव किंवा अडचण येऊ दिली नाही. देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमातील साधकांच्या माध्यमातून त्यांनी माझी प्रत्येक अडचण सोडवली. इतकेच नाही, तर वर्ष २०१८ मध्ये माझ्या यजमानांचे निधन झाल्यानंतर त्यांचे मृत्यूत्तर सर्व विधी आणि नंतर वर्षश्राद्धाचे विधी माझ्यावर कोणताही ताण येऊ न देता साधकांच्या माध्यमातून केले. त्यांनी मला वेळोवेळी भ्रमणभाष करून आधार दिला आणि माझी विचारपूस केली. त्यांनी मला एकटे पडू दिले नाही. असे दैवी शक्तीच करू शकते. त्यांनी मला एका मासात प्रसंगातून बाहेर काढले आणि मला सेवेत गुंतवून ‘माझी साधना होईल’, असे पाहिले.
३. साधिकेचे शस्त्रकर्म करण्याचे ठरल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी तिला मानसिक आणि आध्यात्मिक बळ देणे अन् शस्त्रकर्म करण्याच्या कालावधीत साधिकेला ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ सतत समवेत आहेत’, असे जाणवणे
वर्ष २०२२ मध्ये माझ्या पोटाचे शस्त्रकर्म करण्याचे ठरले. याविषयी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना समजल्यावर त्यांनी मला भ्रमणभाष करून त्याविषयी जाणून घेतले आणि मला धीर दिला. त्यांनी मला नामजपादी उपाय करायला सांगितले. त्यांनी माझ्यासाठी संतांना नामजप करायला सांगितला. त्यामुळे माझ्या मनावरील ताण दूर झाला. माझा आत्मविश्वास वाढला. माझी गुरुदेवांप्रती श्रद्धा वृद्धींगत झाली. त्यांनी मला ‘गुरुदेव तुमच्या समवेत आहेत’, असे सांगून मानसिक आणि आध्यात्मिक बळ दिले. त्यामुळे मला शस्त्रकर्माला आनंदाने सामोरे जाता आले. माझे शस्त्रकर्म झाल्यानंतर आठ दिवसांनीच मी आश्रमात सुखरूप आले. हे सर्व श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या कृपेमुळेच शक्य झाले. त्या कालावधीत ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ सतत समवेत आहेत’, असे मला सतत जाणवत होते.मला श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्यातील ‘साधकांवर निरपेक्ष प्रेम करणे, साधकांशी जवळीक साधणे, परिपूर्ण नियोजन करणे आणि वेळोवेळी पाठपुरावा घेणे’ इत्यादी गुणांचे दर्शन घडले. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या चरणी मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– श्रीमती स्मिता सुबोध नवलकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ७१ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१८.९.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |