जन्महिंदूरूपी किडीचा जागृत हिंदूंनी संघटित होऊन प्रखर विरोध करणे आवश्यक !

हिंदु, हिंदुत्व आणि अपघाताने झालेले हिंदु !

१. हिंदुद्वेषी वक्तव्ये करून आसुरी आनंद घेणारे जन्महिंदु काँग्रेस नेते दिग्विजय सिंह !

दिग्विजय सिंह

‘हिदूंना जे जे पूज्य आहेत, ते ते या अपघाताने हिंदु म्हणून जन्मलेल्या हिंदुद्वेष्ट्यांना त्याज्य वाटते आणि मग असे हे हिंदू हिंदूंच्या श्रद्धास्थानांविषयी नाही नाही ते अपशब्द वापरतात. हिंदूंना गाय पूज्य वाटते म्हणूनच हिंदुद्वेष्ट्यांना ती वध्य वाटते. काँग्रेसचे एक नेते दिग्विजय सिंह हे त्यांच्या हिंदुद्वेषाविषयी आणि वाह्यात बडबडीविषयी संपूर्ण भारतभर कुप्रसिद्ध आहेत. मुसलमानांच्या गळ्यात गळे घालतांना आणि हिंदू अन् हिंदु धर्माविषयी अपमानकारक बोलतांना त्यांना आसुरी आनंद होत असतो. हिंदूंना पूज्य आणि मातेसमान असणार्‍या गोमातेविषयी विषाक्त वाणीने ते म्हणाले, ‘‘गाय हा असा पशू आहे, जो आपल्या मलमूत्रामध्ये बसत असतो, अशी गाय आमची माता कशी होऊ शकते ? गोमांस खाण्यातही काही गैर नाही. गोमांस खाण्याचा हिंदू किंवा हिंदु धर्माशी काही संबंध नाही.’’

२. ‘भारतीय शेतीच्या अर्थव्यवस्थेचा मूलाधार गायच आहे’, हे न समजणारे दिग्विजय सिंह !

या देशातील हिंदूंच्या सहस्रो पिढ्या या गोमातेचेच दूध पिऊन पोसल्या गेल्या आहेत. कोणताही दुर्गंध न येणार्‍या गायींच्या मलमूत्रापासूनच या देशातील शेतीचा कस सहस्रो वर्षांपासून अद्याप अबाधित आहे, तिच्या मल आणि मूत्र यांपासून अनेक परिणामकारक औषधे बनवण्यात आली आहेत. तिच्यापासून प्राप्त होणार्‍या बैलांवरच शेतीच्या मशागतीची कामे अद्यापही भारतात होतात. भारतीय शेतीच्या अर्थव्यवस्थेचा मूलाधार गायच आहे ! देव-दानवांच्या समुद्र मंथनातून निघालेल्या १४ रत्नांपैकी एक रत्न ही ‘कामधेनू’च आहे. ज्यांना गायीला माता मानण्यास लाज वाटते, त्यांनी गायीला एक अत्यंत ‘उपयुक्त पशू’ म्हणून अवध्य ठरवण्यास काय हरकत आहे ? पण अशा गोष्टींना मुसलमानांइतकाच हिंदुद्वेष्ट्यांचा विरोध असतो. हिंदूंना काफीर समजून ठार करणार्‍या आणि गाय केवळ एक पशू समजून अमानुषपणे कापणार्‍या मुसलमान मानसिकतेत अन् दिग्विजय सिंह यांच्या मानसिकतेत काय भेद आहे ?

३. आतंकवाद्यांना सन्मान देणारे जन्महिंदु दिग्विजय सिंह !

हिंदूंना आतंकवादी ठरवून जिहादी वृत्तीच्या देशद्रोही आणि धर्मांध झाकीर नाईकच्या गळ्यात गळे घालणार्‍या, कुविख्यात आतंकवादी ओसामाला ‘ओसामाजी’ आणि याकूब मेमनला ‘याकूबसाहेब’ म्हणणार्‍या आणि गायींच्या कत्तलीचे समर्थन करणार्‍या दिग्विजय सिंह यांना हिंदु म्हणता येईल का ? या व्यक्तीचा जन्म हिंदु आई-बापाच्या पोटी झाला; म्हणून त्यांना हिंदू म्हणणे चुकीचे ठरेल. उलट असे हिंदू मुसलमानांपेक्षा अधिक धोकादायक आहेत.

४. हिंदुद्वेष्टे उदयनिधी स्टॅलिन हिंदु धर्माविषयी गरळओक करत असतांना शांतपणे ऐकणारे ‘हिंदु मंदिर असोसिएशन’चे जन्महिंदु अध्यक्ष !

श्री. शंकर गो. पांडे

तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि डी.एम्.के. (द्रविड मुन्नेत्र कळघम् म्हणजेच द्रविड प्रगती संघ) पक्षाचे अध्यक्ष एम्.के. स्टॅलिन यांचे कुपुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी हिंदु धर्माविषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि हिंदु समाजाचा घोर अपमान करणारे विधान नुकतेच केले आहे. उदयनिधी युवक कल्याण आणि खेळ मंत्री या उत्तरदायी पदावर असतांनाही त्यांनी असे विधान करावे, यावरून स्टॅलिन यांच्या मंत्रीमंडळात किती हिंदुद्वेष्ट्या आणि कीड्यासारख्या लोकांची भरती झाली आहे, हे दिसून येते. उदयनिधी म्हणाले, ‘‘हिंदु धर्म हा कोरोना, डेंग्यु आणि मलेरिया यांसारखा जीवघेणा आजार आहे, त्याचा सर्वनाश केला पाहिजे.’’ विशेष म्हणजे उदयनिधी असे बरळत असतांना व्यासपिठावर तमिळनाडू मंत्रीमंडळातील एक मंत्री शेखरबाबू उपस्थित होते. हे मंत्री महोदय तमिळनाडूमधील ‘हिंदु मंदिर असोसिएशन’चे अध्यक्षही आहेत. ज्यांच्या हातात संपूर्ण राज्यातील हिंदूंच्या मंदिरांच्या व्यवस्थापनेचे कार्य आहे, तेच असे उदयनिधीचे वाह्यात विधान चूपचापपणे ऐकत असतील, तर तमिळनाडूमधील मंदिरे, मंदिरांची चल-अचल संपत्ती कितपत सुरक्षित असेल ? याविषयी मनात अनेक शंकांचे काहूर माजते.

यापूर्वी डी.एम्.के. अध्यक्ष आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिनही असेच बरळत होते. ते म्हणाले होते, ‘‘हिंदु पूजारी विवाह लावून देतांना जे मंत्र म्हणतात ते लक्षपूर्वक ऐकले, तर आपल्याला आश्चर्य वाटेल; कारण त्या मंत्रांचा अर्थ अत्यंत घाणेरडा आहे.’’ केवळ काही कालावधीच्या सत्ताप्राप्तीसाठी हिंदु धर्म आणि संस्कार याविषयी अशा नीच शब्दांचा वापर करणार्‍या या धर्मद्रोही हिंदूविषयी काय बोलावे ? हिंदु धर्मातील विवाह संस्कारांविषयी वाह्यात विधाने करणार्‍या एम्.के. स्टॅलिन यांनी विवाहाप्रसंगी म्हटल्या जाणार्‍या मंत्रांचा अर्थ कधी समजून तरी घेतला आहे का ? इतर धर्मियांप्रमाणे हिंदु धर्मातील विवाह हा एक करार नसून १६ संस्कारांपैकी एक पवित्र संस्कार आहे. या संस्कारातील विधीविषयी संपूर्ण माहिती देतो म्हटले, तर ती पुष्कळ सविस्तर होईल. हिंदु विवाह पद्धतीचे जे मंत्र पुरोहितांकडून म्हटले जातात, ते सर्व संस्कृत भाषेत आहेत. त्यातील काही मंत्रांचा अर्थ समजून घेतला, तरी तो किती पवित्र आहे, हे लक्षात येईल.

५. कल्पनेपलीकडील पवित्र आणि परिपूर्ण जीवनाची शिकवण देणारे सनातन हिंदु धर्मातील विवाह विधीचे मंत्र !

वैवाहिक जीवन जगू पहाणार्‍या जोडप्याचा विवाह लावतांना आणि जोडप्याला आशीर्वाद देतांना पुरोहित पहिल्या मंत्राद्वारे इंद्रदेवाजवळ प्रार्थना करतात, ‘‘हे भगवान इंद्रदेवा, तुम्ही या नवविवाहित जोडप्याला चक्रवाक पक्षाच्या नर-मादीला जसे एकत्र आणता त्याप्रमाणेच या जोडप्याला एकत्र आणले आहे.’’ (चक्रवाक पक्षाच्या जोडप्याचे असे एक वैशिष्ट्य सांगितले जाते की, त्यांच्या जोडप्यापैकी एकाचा मृत्यू झाला, तर त्याचा जोडीदार विरह सहन न होऊन त्याच्याही प्राणाचा त्याग करतो. इतके त्यांचे एकमेकांवर अतूट आणि निस्सीम प्रेम असते) पुढे प्रार्थनेत म्हटले गेले आहे, ‘‘हे इंद्रदेवा, या जोडप्याला विवाहाचा आनंद होऊ दे. यासमवेत त्यांना पुत्रप्राप्ती होऊन त्यांना परिपूर्ण जीवन जगता येऊ दे.’’ दुसर्‍या एका प्रार्थनेत पुरोहित नवरदेवाकडून वदवून घेतात ते असे, ‘‘मी आपले कर्तव्य, धन याखेरीज आवश्यकता पडेल त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीत पत्नीचा सल्ला घेईन.’’ मग पुरोहिताच्या सांगण्याप्रमाणे पती त्याच्या पत्नीचा हात आपल्या हातात घेऊन म्हणतो, ‘‘मी तुझा हात कायम पकडून राहीन; जेणेकरून आपल्याला संतती होईल. आपण कधीच वेगळे होता कामा नये. मी इंद्र, वरुण आणि सवितृ देवतांना आपल्या चांगल्या गृहस्थ जीवनासाठी आशीर्वाद मागतो.’’ पुढच्या एका मंत्राद्वारे पती त्याच्या पत्नीला म्हणतो, ‘‘आपण ७ पावले समवेत चाललो आहोत, आता आपण एकमेकांचे मित्र बनले आहोत.’’ अजून एका मंत्राद्वारे पत्नीकडे मागणी करतांना पती म्हणतो, ‘‘मी आकाश आहे, तू पृथ्वी हो. (येथे स्त्रीला ‘पृथ्वी’ म्हटले आहे; कारण ती क्षमाशील आणि पृथ्वीवरच्या सर्व प्राणीमात्रांचे, वृक्षवल्लीचे भरण-पोषण करणारी असते.) मी तुला ऊर्जा देतो, ती तू ग्रहण कर. मी मन आहे, तर तू माझे शब्द हो. मी संगीत आहे, तू माझे गीत हो. आपण दोघेही परस्परांचे पालन-पोषण करू.’’

तात्पर्य, हिंदूंच्या वैवाहिक जीवनात पती किंवा पत्नी यांपैकी कुणीही श्रेष्ठ अथवा कनिष्ठ नाही. दोघेही स्पर्धक नाहीत, तर परस्परानुकुल आणि परस्परावलंबित आहेत. हिंदूंच्या विवाह पद्धतीमध्ये गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करू पहाणार्‍या जोडप्यांना मार्गदर्शक होणारे, त्यांना त्यांच्या कौटुंबिक, सामाजिक कर्तव्यांची जाणीव करून देणारे अनेक मंत्र आणि विधी आहेत. या सर्व मंत्रामध्ये आणि विधीमध्ये कुठेही अश्लीलता किंवा उत्तानपणा नाही. सर्व मंत्र आणि विधी पवित्र अन् मंगल आहेत. या मंत्रातून एम्.के. स्टॅलिन म्हणतात तसे कोणतेही घाणेरडे अर्थ निघत नाहीत.

– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ.

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/759053.html

संपादकीय भूमिका 

हिंदु धार्मिक विधी आणि धर्म यांवर टीका करणार्‍या हिंदुद्वेष्ट्या जन्महिंदूंना शिक्षा होण्यासाठी हिंदूंचे प्रभावी संघटन आवश्यक !