हिंदु, हिंदुत्व आणि अपघाताने झालेला हिंदू !
१४ जानेवारी २०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदुद्वेषी वक्तव्ये करून आसुरी आनंद घेणारे जन्महिंदु काँग्रेस नेते दिग्विजय सिंह, आतंकवाद्यांना सन्मान देणारे जन्महिंदु दिग्विजय सिंह आणि हिंदुद्वेष्टे उदयनिधी स्टॅलिन हिंदु धर्माविषयी गरळओक करत असतांना शांतपणे ऐकणारे हिंदु मंदिर असोसिएशनचे जन्महिंदु अध्यक्ष’, ही सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
याआधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/754745.html |
६. हिंदु धर्माविषयी अज्ञान आणि पूर्वग्रह यांमुळे विधींविषयी अश्लाघ्य विधाने करणारे जन्महिंदु अमोल मिटकरी !
काही मासांपूर्वी महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही हिंदु विवाह पद्धतीमधील पित्याकडून होणार्या ‘कन्यादान’ या विधीवर विनाकारण व्यंगात्मक विधान केले होते. ते म्हणाले होते, ‘‘कन्या ही काय वस्तू आहे की, जिचे आपण दान करावे ?’’ पुढे ते म्हणाले, ‘‘मी एका लग्नात कन्यादान करतांना भटजींनी वधू-वरांना त्यांचे हात आपल्या हातात द्यायला सांगून ‘मम् भार्या समर्पयामी’, असा मंत्र म्हटल्याचे ऐकले. या मंत्राचा अर्थ असा होतो की, भटजींनी नवरदेवाला त्याची बायको भटजींना समर्पित करायला सांगितले आहे.’’ एखाद्या गोष्टीविषयी अर्धवट माहिती असेल आणि पूर्वग्रह असतील, तर मग अशी विधाने केली जातात आणि दुर्दैवाने हिंदुद्वेषाने पछाडलेल्या अशा अर्धवटरावांची संख्या या देशात सध्या पुष्कळ वाढली आहे.
७. सर्वस्व दान करण्यास शिकवणारी अलौकिक प्राचीन भारतीय संस्कृती !
आपल्याकडे म्हणजे भारतीय संस्कृतीत दानाकडे तुच्छतेने नव्हे, तर त्यागाच्या भावनेने पाहिले जाते. अवयव दानाकडे आपण तुच्छतेने नव्हे, तर त्याग भावनेने पहात असतो. पूर्वी मुलगा ७ वर्षांचा झाला की, त्याला पुढे काही वर्षे गुरुगृही आचार्यांच्या आश्रमात पाठवले जायचे. त्या वेळी पालक आचार्यांना आपला मुलगा ‘दान’ करत असत; जेणेकरून त्याने आचार्यांच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करावे, सर्व शास्त्र शिकून शिक्षित व्हावे, असा हेतू असे. दानाच्या अनेक कथा भारतीय धर्मग्रंथात पानोपानी दिसून येतात. फार काय हिंदु धर्मात स्वतःला दान करण्याची परंपरा आहे. काही जणांनी देश आणि समाज यांसाठी किंवा एखादी संस्था अथवा संघटना यांसाठी त्यांच्या सर्वस्वाचे ‘दान’ केल्याची अनेक उदाहरणे सांगता येतील. फार पूर्वी वाजश्रमा नावाच्या एका ब्राह्मणाला जेव्हा त्याच्याजवळ आवश्यकतेपेक्षा अधिक संपत्ती साठल्याचे दिसून आले, तेव्हा त्याने ‘सर्वस्व दक्षिणा’ नावाचा एक यज्ञ केला आणि त्या यज्ञात आपली सर्व संपत्ती, घरदार, गायीगुरे दान केली. आपले वडील वाजश्रवा यांचा हा दानशूरपणा पाहून त्याचा पुत्र नचिकेता याने आपल्या वडिलांना ‘‘तुम्ही मला कुणाला दान करणार ?’, असा प्रश्न वारंवार विचारला. तेव्हा शेवटी प्रत्येक माणसाला स्वतःचे शरीर यमालाच ‘दान’ करावे लागते, या सत्याची जाणीव असल्यामुळे ते नचिकेताला म्हणाले, ‘‘बाळा, मी तुझे दान यमाला करणार आहे.’’ तात्पर्य, हिंदु धर्मात स्वतःसमवेत पुत्राचेही दान करण्याची प्राचीन परंपरा आहे. त्याच्याकडे तुच्छतेने बघण्याची काही आवश्यकता नाही.
८. कन्यादानाचा पवित्र, मंगलदायी विधी हा कुटुंब, समाज आणि देश यांसाठी मार्गदर्शक !
‘कन्यादान’ हा तर हिंदु विवाह पद्धतीमधील अत्यंत पवित्र आणि हृद्य सोहळा असतो. इतके दिवस लाडाने वाढवलेली आपली सुविद्य आणि सुस्कांरित मुलगी आई-बाबांना फारसा परिचय नसणार्या घरात कायमची पाठवायची असते. आपल्या घरात आतापर्यंत जपलेले आणि वाढवलेले हे कन्यारूपी झाड दुसर्यांच्या घरात लावल्यानंतर तिथे ते रूजले कि नाही ? त्याची योग्य वाढ होईल कि नाही ? याची काळजी माय-बापाच्या मनात दाटून आलेली असते. हिंदु धर्म शास्त्राप्रमाणे कन्यादान, विवाहहोम आणि सप्तपदी हे विधी संपन्न झाल्याविना विवाह विधी पूर्ण झाल्याचे मानले जात नाही. कन्यादानाच्या वेळी पुष्कळ काही मंत्र म्हटले जातात. या सर्व मंत्र आणि विधी यांवषयी पुष्कळ काही सांगता येईल; पण विस्तारभयास्तव सांगता येत नाही. कन्यादानाच्या वेळी जे मंत्र म्हटले जातात, त्याचा थोडक्यात अर्थ सांगितला, तरी ते पुरेसे होईल. कन्यादानाच्या वेळी पिता वराला म्हणतो, ‘‘मी माझी अमुक नाव, प्रवर, गोत्र असणारी कन्या तुम्हाला धर्मपालन आणि उत्तम प्रजा निर्माण करण्यासाठी अर्पण करत आहे. आपण तिचा स्वीकार करावा. असे म्हणून पिता हातात दर्भ, अक्षता आणि पाणी घेऊन वराच्या हातावर सोडतात. नंतर वराकडून ‘ओम स्वस्ति’, म्हणजे ‘मला मान्य आहे’, असे म्हणून त्या कन्येचा पत्नी म्हणून स्वीकार करतो. एम्.के. स्टॅलिन किंवा अमोल मिटकरी म्हणतात त्याप्रमाणे हिंदु विवाह पद्धतीमध्ये जे विधी केले जातात आणि मंत्र म्हटले जातात त्यातून कोणतेच घाणेरडे अर्थ निघत नाहीत. उलट सर्व विधी आणि मंत्र हे पवित्र, मंगलदायक आणि कुटुंब, समाज अन् देश यांच्यासाठी मार्गदर्शक आहेत; पण एम्.के. स्टॅलिन वा अमोल मिटकरी असो यांची विचारदृष्टी मुळातच विकृत आणि घाणेरडी आहे. त्यामुळे त्यांना आपल्या हिंदु धर्मातील सर्वच संस्कार आणि रितीरिवाज यांच्या अर्थामध्ये घाणेरडापणा दिसतो; पण मतांसाठी अन् सत्तेसाठी लाचार झालेल्या या हिंदुद्वेष्ट्यांना इतर धर्मियांच्या जाचक, अमानुष अशा संस्कार आणि रितीरिवाजांमध्ये मात्र कोणताच घाणेरडापणा दिसत नाही. हिंदु विवाह पद्धतीवर टीका करणार्यांनी प्रथम हिंदूंचा विवाह विधी आणि मंत्र यांचे संपूर्ण वाचन करावे, त्यातील अर्थ समजून घ्यावा आणि मग टीकेसाठी स्वतःची जीभ टाळूला लावावी.
९. अल्पसंख्यांकांच्या मतांसाठी लाचार झालेले पुढारी भारताविना अन्य कोणत्याच देशात जन्मलेले नसतील !
हिंदुद्वेष्टे एम्.के. स्टॅलिन यांचे पुत्र आणि तमिळनाडूचे युवा कल्याण अन् खेळ मंत्री उदयनिधी स्टॅलिन हे ‘बापसे बेटा सवाई’ निघाले. हिंदु धर्माविषयी गरळ ओकतांना त्यांनी हिंदु धर्माची तुलना डेंग्यु आणि मलेरिया या रोगांशी करून हा धर्म या देशातून नष्ट करण्याचे आवाहन केले. केवढी ही विकृत विचारसरणी ? अल्पसंख्यांकांच्या मतांसाठी एवढे लाचार होणारे पुढारी भारताविना अन्य कोणत्याच देशात जन्मलेले नसतील. सनातन धर्माला नष्ट करण्यासाठी आजवर काय अल्प प्रयत्न झाले आहेत ? शक, हुण, मोगल, इंग्रज असे अनेक आक्रमक या देशात आले. त्यांनी सहस्रो वर्षे या देशावर राज्य केले, मंदिरे पाडली, देवतांच्या मूर्ती भंग केल्या, हिंदूंचे धर्मग्रंथ जाळले, लाखो हिंदूंच्या कत्तली केल्या, लाखो हिंदु स्त्री-पुरुषांना बाटवले; पण सनातन हिंदु धर्म नष्ट झाला नाही. उलट सनातन हिंदु धर्माला संपवण्याची भाषा आणि प्रयत्न करणारेच अखेर संपले. त्यामुळे उदयनिधी यांच्यासारख्या कावळ्याच्या शापाने हिंदु धर्माची गाय थोडीच मरणार ?
१०. हिंदु धर्मावर बेलगाम आणि घृणित बोलण्याची स्पर्धा लावलेले तमिळनाडूच्या द्रमुक पक्षाचे जन्महिंदु नेते !
‘हिंदुद्वेष्ट्यांच्या शापाने हिंदु धर्माची गाय मरणार नाही’, हे वास्तव असले, तरी हिंदुद्वेष्ट्यांचे सनातन धर्माला शाप देणे काही थांबत नाही. एम्.के. आणि उदयनिधी या बाप-लेकांच्या हिंदु धर्मावरील विकृत विधानांनंतर तमिळनाडूच्या द्रमुक (द्रविड मुन्नेत्र कळघम् म्हणजे द्रविड प्रगती संघ) पक्षाच्या नेत्यांमध्ये हिंदु धर्मावर बेलगाम बोलण्याची जणू स्पर्धा लागली कि काय ? असे वाटते. द्रमुकचे ‘टूजी’ घोटाळा प्रकरणी काही दिवस कारागृहाची हवा खाऊन आलेले खासदार ए. राजा म्हणाले, ‘‘जोपर्यंत तुम्ही हिंदु आहात, तोपर्यंत तुम्ही शुद्र आहात आणि जोपर्यंत तुम्ही शुद्र आहात, तोपर्यंत तुम्ही वेश्येचे पुत्र आहात !’’ तमिळनाडूमधील खासदार तिरूमावलावन म्हणतात, ‘‘एखाद्या मशिदीवर गुंबद (घुमट) असेल, तर ती मशीद आहे. एखाद्या इमारतीची रचना उंच सुळक्यासारखी असेल, तर ते चर्च होय आणि ज्या इमारतीत घृणित मूर्ती असतील, तर ते हिंदु मंदिर आहे.’’ अलूर शहानबाज नावाचे एक आमदार बरळले, ‘‘हिंदु म्हणतात की, श्रीरामाच्या चपलांनी (पादुका) या देशावर अनेक वर्षे राज्य केले. अशांना गायीच्या शेणात चपला बुडवून त्या चपलांनी मारायला पाहिजे.’’ द्रमुकच्या वैचारिक आघाडीचे अध्यक्ष के. वीरमणी म्हणतात, ‘‘महाभारत एक अश्लील पुस्तक आहे. हे पुस्तक वेश्यावृत्तीपासून चालू होते, वेश्यावृत्ती चालू ठेवते आणि वेश्यावृत्तीवरच समाप्त होते.’’ याखेरीजही त्यांनी श्रीराम आणि सीतामाता यांच्याविषयीही अत्यंत अश्लील भाषेचा वापर केला आहे. करुणानिधींची कारागृहाची हवा खाऊन आलेली कनिमोझी नावाची पुत्री, द्रमुकचे अनेक आमदार आणि खासदार यांनीही हिंदु देवीदेवता यांच्याविषयी इतक्या अश्लील आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर केला आहे की, त्यांचा उल्लेख अन् उच्चार करणेही नकोसे वाटते.
११. हिंदु धर्मरूपी गायीला शिव्याशाप देणारे जन्महिंदुरूपी कावळे !
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणतात, ‘‘नरेंद्र मोदींना सत्तेवरून हटवणे पुष्कळ आवश्यक आहे. नाही तर या देशात परत सनातन धर्माची स्थापना होईल.’’ काँग्रेसचे खासदार राहुल गांधी म्हणतात, ‘‘मला या देशातून हिंदुत्वनिष्ठांना नष्ट करायचे आहे.’’ छत्तीसगडचे काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणतात, ‘‘हिंदु धर्म हा चुकीचा धर्म आहे. या धर्माला नेस्तनाबूत केल्याविना या देशाचे कल्याण होणार नाही.’’ उत्तरप्रदेशमधील समाजवादी पक्षाचे स्वामी प्रसाद मौर्य म्हणतात, ‘‘हिंदु धर्म नसून तो एक धोका आहे. तुलसीदासांचे ‘रामचरितमानस’ हे महाकाव्य जाळले पाहिजे.’’ बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे एक नेते म्हणतात, ‘‘बंगालमध्ये हिंदूंना श्रीरामाच्या जयजयकाराच्या घोषणा देण्याची अनुमती देता येणार नाही.’’
देहलीमधील आप पक्षाचे मंत्री राजेंद्र पाल सार्वजनिकरित्या सहस्रो हिंदूंना ‘आम्ही यापुढे कोणत्याही हिंदु देवतेची पूजा करणार नाही’, अशी शपथ देतात.
१२. अन्य धर्मांविषयी काही बोलण्याचे धैर्य नसणारे जन्महिंदू !
मला प्रश्न पडतो हिंदु धर्माविषयी अशी विकृत विधाने करणारे हिंदुद्वेष्टे हे मुसलमान अथवा ख्रिस्ती धर्माविषयी एक तरी वावगा शब्द उच्चारू शकतात का ? तेवढे त्यांचे धैर्य आहे का ? कारण या हिंदुद्वेष्ट्यांना पुरेपूर ठाऊक आहे की, मुसलमान धर्माविषयी एक जरी वावगे विधान, मग ते कितीही सत्य असो, केले की, शिरच्छेद झाल्याविना रहात नाही. मुसलमान धर्मात अभिव्यक्तीचे थोडेही स्वातंत्र्य नसल्याविषयी तक्रार न करणारे हे हिंदुद्वेष्टे हिंदु धर्मातील अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा मात्र मनसोक्त अपलाभ उठवतात. या वेळी ते ना जनाची ना मनाची लाज बाळगतात.
१३. सनातन हिंदु धर्माला या देशातून नष्ट करण्यासाठी एकत्र येऊन आघाडी करणारे विविध पक्षांचे जन्महिंदू !
या देशातून सनातन हिंदु धर्म नष्ट करण्यासाठी हिंदु म्हणून अपघाताने जन्मलेल्या या हिंदुद्वेष्ट्यांनी २६ राजकीय पक्षांना एकत्रित करून ‘इंडिया’ (I.N.D.I.A.) नावाची एक आघाडी सिद्ध केली आहे. एरव्ही एकमेकांविरुद्ध लढणारे, एकमेकांविरुद्ध विष ओकणारे हे संधीसाधू पक्ष भाजप आणि नरेंद्र मोदी यांना सत्तेवरून हटवण्यासाठी एकत्र आले आहेत; पण हे हिंदुद्वेष्टे पक्ष एकत्र येण्यामागचा त्यांचा अजून एक छुपा ‘अजेंडा’ (कार्यसूची) आहे आणि तो आहे ‘या देशातून सनातन धर्माला हद्दपार करणे, नष्ट करणे !’ हा छुपा अजेंडा आघाडीतील काही घटक पक्षांनी बोलूनही दाखवला आहे. तमिळनाडूचे शिक्षणमंत्री पोनमुडींनी एका प्रश्नाचे उत्तर देतांना स्पष्टपणे सांगितले, ‘‘इंडिया आघाडीतील २६ पक्षांत काही मतभेद जरूर आहेत; पण सनातन धर्माविरुद्ध लढण्याच्या मुद्यांवर मात्र सर्व पक्षांचे एकमत आहे.’’ ज्या कट्टर धर्मांध ‘मुस्लिम लिग’ला राहुल गांधी यांनी ‘सेक्युलर’ (निधर्मी) असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे, त्या मुस्लिम लिगने केरळमध्ये नुकताच एक मोर्चा काढला होता. कासारगोड गावात काढलेल्या त्या मोर्च्यात तथाकथित सेक्युलर मुसलमानांनी कोणत्या घोषणा दिल्या असतील ? तर आम्ही ‘हिंदूंना रामायण वाचू देणार नाही. आम्ही त्यांना मंदिरात जिवंत जाळून टाकू, त्यांना फासावर लटकवू’, अशा घोषणा दिल्या. २६ पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीतील एकाही पक्षाने ना पोनमुडींनी केलेल्या विधानावर आक्षेप घेतला ना केरळमधील मुस्लिम लिगने दिलेल्या घोषणांचा निषेध केला.
१४. हिंदु धर्माला नष्ट करण्याचा उद्देश ‘इंडिया’ आघाडीतील सर्व २६ पक्षांमधील हिंदूंना मान्य आहे का ?
या निमित्ताने माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत. ‘इंडिया’ आघाडातील काही पक्षांनी या देशातून सनातन हिंदु धर्माला नष्ट करण्याचा स्वतःचा उद्देश आणि मनोदय स्पष्टपणे व्यक्त केला आहे. आघाडीत जे २६ पक्ष आहेत, त्या पक्षांतील हिंदूंना आणि तथाकथित हिंदुत्वनिष्ठ पक्षांना वरील उद्देश मान्य आहे का ? नुपूर शर्मा यांच्या तथाकथित आक्षेपार्ह विधानाची आपणहून नोंद सर्वाेच्च न्यायालयाने घेऊन त्यांना केवळ कडक शब्दात फटकारलेच नव्हते, तर त्यांना त्यांनी केलेल्या विधानाविषयी क्षमा मागण्याचाही आदेश दिला होता. आता सनातन हिंदु धर्म, त्यांचे धर्मग्रंथ, त्यांच्या देवीदेवता यांच्याविषयी शेकडो आणि वारंवार अपमानास्पद अन् आक्षेपार्ह विधाने केली जात असतांना न्यायालये त्यांची आपणहून नोंद का घेत नाहीत ? अशी आक्षेपार्ह विधाने करणार्यांची कानउघाडणी करून त्यांना क्षमा मागण्यास का सांगत नाहीत ? नरेंद्र मोदी आणि भाजप यांनी आजपर्यंत कधीही या देशातील मुसलमानांना अन् इस्लाम धर्माला नष्ट करण्याची भाषा उच्चारली नाही. या देशातील विविध सवलतींचा लाभ हिंदूंच्या इतकाच मुसलमानांच्या पदरात पडला आहे, तरीही या देशातील मुसलमान समाज मोदी आणि भाजप यांना कधीच मते का देत नाही ? उलट नको त्या शिव्यांची लाखोली का वहातो ?
१५. देशाबाहेर जाऊन नेहमी देशाची अपकीर्ती करणारे काँग्रेसचे राहुल गांधी !
राहुल गांधी नेहमी या देशातील सर्व हिंदुत्वनिष्ठांना नष्ट करण्याची भाषा करतात. भारताचा कट्टर शत्रू असणार्या चीनच्या भारतातील दूतावासात जाऊन त्यांचे आदरातिथ्य स्वीकारतात, भारताचा कट्टर शत्रू जॉर्ज सोरेस असो कि नुपूर शर्माची अपकीर्ती करणारा पत्रकार महंमद जुबैर असो यांच्यासमवेत मधुर संबंध ठेवतात, विदेशात जाऊन भारताची यथेच्छ अपकीर्ती करतात, तरीही लाखो हिंदू मात्र त्यांना मतदान का करतात ? याविषयी अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये काम करणारी कर्मचारी मेरी विलमेन हिनेही एकदा आश्चर्य व्यक्त केले होते. ती म्हणाली होती, ‘‘राहुल गांधी दुसर्या देशात जाऊन नेहमी त्यांच्या देशाच्या विरुद्ध का बोलतात ? याचे मला नेहमी आश्चर्य वाटते; पण यापेक्षाही मला याचे अधिक आश्चर्य वाटते की, तरीही भारतातील जनता त्यांना मतदान करते !’’
१६. जन्महिंदूंना मतपेटीद्वारे त्यांची जागा दाखवा !
हिंदु धर्मात जन्म घेऊनही सनातन धर्माला नष्ट करण्याची भाषा सातत्याने बोलणारे असो कि अशी घातक भाषा बोलणार्यांना साथ देणारे आणि मतदान करणारे असोत, हे सारे जण अपघाताने जन्मलेले हिंदू आहेत. असे म्हणतात की, घराबाहेरील १०० शत्रूंपेक्षा घरातील एकच शत्रू अधिक घातक असतो. अपघाताने जन्मलेले असे हे हिंदू, हिंदु धर्माला लागलेली कीड आहे. ही कीड या देशाला आतून पोखरत आहे. या किडीचा जागृत हिंदूंनी संघटितपणे प्रखर विरोध केला पाहिजे आणि मतपेटीच्या माध्यमातून तिची जागा दाखवून द्यायला हवी !
– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ. पुसद, यवतमाळ.