सोमालियाजवळील समुद्रात अपहरण झालेल्या नौकेतून २१ जणांची केली सुटका !

  • भारतीय नौदलाचे मोठे यश

  • १५ भारतियांचा समावेश !

मोगाडिशू (सोमालिया) – अरबी समुद्रात सोमालिया देशाजवळ ४ जानेवारी या दिवशी एका नौकेचे अपहरण करण्यात आले होते. ‘एम्.व्ही. लीला नॉरफोक’ नावाच्या या नौकेवर १५ भारतीय सदस्यांसह २१ जण काम करते होते. या घटनेची माहिती मिळताच भारतीय नौदल त्वरित सक्रीय होऊन कामाला लागले. त्यांनी केलेल्या कारवाईमुळे नौकेवरील १५ भारतियांसह २१ सदस्यांची सुटका करण्यात आली. मार्कोस (भारतीय नौदलातील कमांडो) यांनी केलेल्या या कारवाईत जहाजावर शोधमोहीम घेतली; पण त्यांना अपहरणकर्ते आढळून आले नाहीत.

सुटका करण्यात आलेल्या सदस्यांनी सांगितले की, अपहरण करतांना अपहरणकर्त्यांनी नौकेवर गोळीबार केला होता. त्यानंतर आश्रय घेऊन ते लपून बसले होते. भारतीय नौदलप्रमुख आर्. हरि कुमार यांनी अरबी समुद्रात कार्यरत असलेल्या भारतीय युद्धनौकांना अपहरण करणार्‍या समुद्री लुटारूंच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.