GangRape Virtual Reality Game : ब्रिटनमध्ये प्रथमच १६ वर्षांच्या मुलीवर ‘व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी गेम’मध्ये (आभासी खेळामध्ये) सामूहिक बलात्कार !

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमध्ये पहिल्यांदाच ‘व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी गेम’मध्ये, म्हणजे ‘मेटाव्हर्स’मध्ये (आभासी जगामध्ये) एका १६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. ब्रिटिश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितेचा आरोप आहे की, काही अज्ञात लोकांनी तिच्या आभासी शरिरावर ‘व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी गेम’मध्ये सामूहिक बलात्कार केला. या काळात तिला शारीरिक दुखापत झाली नाही; पण अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार तिच्या मनावर खर्‍या बलात्कार पीडितेइतका खोल परिणाम झाला आहे. पीडितेने ‘व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी हेडसेट’ घातला होता. ब्रिटनमध्ये सध्या ‘व्हर्च्युअल’ बलात्काराविषयी कोणताही कायदा नसल्याने या प्रकरणाचे अन्वेषण करणे कठीण जाणार आहे.

फेसबूकचे मूळ आस्थापन ‘मेटा’ने वर्ष २०२१ मध्ये ‘हॉरिझॉन वर्ल्ड्स’ नावाची ‘व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी गेम’ बनवला होता. यावर वापरकर्त्यांचे आभासी शरीर निर्माण केले जाऊ शकते. हा खेळ खेळण्यात इतरांचे आभासी शरीरही दिसू शकते. ‘होरायझन वर्ल्ड्स’मध्ये व्हर्च्युअल स्तरावर लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित अनेक प्रकरणे आतापर्यंत समोर आली आहेत. या प्रकरणी ‘मेटा’च्या प्रवक्त्याने सांगितले की, आमच्या मंचावर अशा गुन्ह्यांना स्थान नाही. हे टाळण्यासाठी आम्ही आमच्या वापरकर्त्यांसाठी वैयक्तिक सीमा निर्माण केली आहे. ती अज्ञात लोकांना वापरकर्त्याच्या आभासी शरिरापासून काही फूट दूर ठेवते.

असे लोक वास्तविक जगात अधिक धोकादायक असू शकतात ! – ब्रिटनचे गृहमंत्री

ब्रिटनचे गृहमंत्री जेम्स क्लेव्हर्ली म्हणाले की, आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणात यात बुडाली आहे, त्यामुळेच अशा गोष्टींचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम होतो. ही फार गंभीर गोष्ट आहे. अशा घटनांवरून हेदेखील दिसून येते की, जे लोक ‘व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी’मध्ये मुलीशी असे करू शकतात, ते वास्तविक जगात अधिक धोकादायक असू शकतात.

काय आहे ‘मेटाव्हर्स’ ?


मेटाव्हर्स हे एक आभासी जग आहे, जिथे कुणीही आभासी प्रवेश करू शकतो. यात तो त्या ठिकाणी शारीरिकरित्या उपस्थित असल्याची भावना असते. यात स्वतःचे आभासी शरीर निर्माण करता येते. त्याद्वारे असे शरीर निर्माण करणारे फिरू शकतात, खरेदी करू शकतात, इतर लोकांना भेटू शकतात, मालमत्ता खरेदी करू शकतात आणि वास्तविक जगात जे काही पाहतात ते सर्व करू शकतात. येथे ‘क्रिप्टो’ चलन म्हणून वापरले जाते. ‘मेटाव्हर्स’चा अनुभव घेण्यासाठी वापरकर्त्यांना ‘व्ही.आर्. हेडसेट’ आणि ‘व्ही.आर्. कंट्रोलर’ यांसारख्या आभासी वास्तविकता उपकरणांची आवश्यकता असते.

वर्ष १९९३ मध्ये पहिल्यांदा झाला होता आभासी बलात्कार !

आभासी बलात्काराची पहिली घटना वर्ष १९९३ मध्ये समोर आली होती. त्यानंतर वर्ष २०२२ मध्ये फेसबूकच्या ‘मेटाव्हर्स’मध्ये प्रवेश केल्याच्या घंट्याभरात एका महिला संशोधकावर तिथे उपस्थित असलेल्या दुसर्‍या रूपाने बलात्कार केला होता. या महिला संशोधकाने सांगितले होते की, बलात्कार हा आभासी जगात घडला होता, तरीही तिला तिच्यावर बलात्कार झाल्यासारखे वाटत होते.

संपादकीय भूमिका

विज्ञानाने कितीही नवनवीन शोध लावले, तरी मनुष्याची मानसिकता विकृत असेल, तर अशा शोधांचा वापर अयोग्य गोष्टींसाठीच केला जाणार, हेच पुन्हा यातून लक्षात येते !