CAA Notification : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या कार्यवाहीची अधिसूचना २६ जानेवारीपूर्वी प्रसारित करणार !

नवी देहली : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (‘सीएए’च्या) कार्यवाहीची अधिसूचना २६ जानेवारीपूर्वी प्रसारित करणार आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय बांगलादेशातील हिंदु निर्वासितांसाठी आशेचा किरण ठरणार आहे. या समवेत पाकिस्तानातील अत्याचारांना कंटाळून भारतात आलेल्या हिंदू आणि शीख निर्वासितांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. एका आकडेवारीनुसार वर्ष २०१४ पर्यंत पाकिस्तान आणि अफगाणिस्तान येथून ३२ सहस्र नागरिक भारतात आले आहेत.

१. संसदेने ११ डिसेंबर २०१९ या दिवशी नागरिकत्व सुधारणा कायद्याला संमती दिली होती. हा कायदा लागू करण्यासाठी नियमावली बनवण्याची समयमर्यादा सरकारने ८ वेळा वाढवली आहे.

२. या कायद्याच्या अंतर्गत ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश येथील धार्मिक अत्याचारांना कंटाळून भारतात आलेले हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि ख्रिस्ती या समुदायांतील लोकांना नागरिकत्व दिले जाईल.

३.  ‘सीएए’ कायद्याचा अवैध्यरित्या भारतात आलेल्या शरणार्थींना बाहेर काढण्याशी काहीही संबंध नाही. त्यासाठी विदेशी अधिनियम १९४६ आणि पारपत्र अधिनियम १९२० आधीच लागू असल्याचे सांगण्यात आले.