Sugarcane Growers Agitation Goa : ऊस उत्पादकांचे धरणे आंदोलन

साखर कारखाना चालू करण्याची मागणी

साखळी उपोषणास बसलेले शेतकरी

फोंडा, २ जानेवारी (वार्ता.) : संजीवनी साखर कारखाना चालू करण्यासंंबंधी जोपर्यंत सरकार स्पष्टपणे सांगत नाही, तोपर्यंत साखळी उपोषण चालू ठेवण्याचा निर्धार राज्यातील ऊस उत्पादकांनी केला असल्याचे गोमंतक ऊस उत्पादक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी पत्रकारांना सांगितले. २ जानेवारीला सकाळी संजीवनी साखर कारखान्याच्या फाटकासमोर धरणे आंदोलन पुकारल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली.

संजीवनी साखर कारखाना, गोवा

महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांनी गोव्यातील ऊस उत्पादकांना पाठिंबा दर्शवला असून ‘देशभरातील शेतकरी संजीवनी साखर कारखान्यासमोर एकत्र येतील’, अशी चेतावणी महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी दिली आहे. तसेच या धरणे आंदोलनात काँग्रेसचे गोव्यातील अध्यक्ष अमित पाटकर, सावर्डे गट काँग्रेसचे अध्यक्ष गौतम भंडारी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या कित्येक मासांपासून संजीवनी साखर कारखाना बंद असल्याने ऊस उत्पादक हवालदिल झाले आहेत. यापूर्वी सरकारने साखर कारखाना चालवण्यास कंत्राटदार मिळत नसल्याचे म्हटले होते. ‘आम्ही कारखाना चालवू शकणारा कंत्राटदार सरकारला जोडून दिला आहे’, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

शेतकर्‍यांनी म्हटले आहे, ‘‘जोपर्यंत सरकार कारखाना चालू करत नाही, तोपर्यंत आम्ही हे धरणे आंदोलन चालूच ठेवणार आहोत.’’ हा कारखाना चालू झाल्यापासून उसाचे उत्पादन करणारे अनेक शेतकरी या कारखान्यावर अवलंबून आहेत. सरकारने वर्ष २०१९-२० मध्ये पुन्हा पुन्हा निर्माण होणारी तांत्रिक समस्या, यंत्राचे सुट्या भागांची उणीव आणि स्थानिक पातळीवर उसाचा पुरवठा अल्प होणे, ही कारणे सांगून हा कारखाना बंद केला होता. मध्यंतरीच्या काळात सरकारने संजीवनी कारखान्यात इथेनॉल प्रकल्प चालू करणार असल्याचे घोषित केले होते; पण त्यासंबंधी कोणतीही कार्यवाही झालेली नाही.