एकाच वेळी ५ ते ७ ठिकाणी धाडी
पणजी, २ जानेवारी (वार्ता.) : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात होणारी पर्यटकांची गर्दी आणि त्यामुळे येथील हॉटेल आस्थापने, पब, उपाहारगृहे (रेस्टॉरंट) यांमध्ये होणारी उलाढाल लक्षात घेऊन आयकर विभागाने गोव्यातील पब, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट आदींवर धाडी घातल्या आहेत. बेंगळुरूहून आयकर विभागाचे अधिकारी गोव्यात आले असून त्यांनी १ जानेवारीला सायंकाळपासून एकाच वेळी एका मोठ्या आस्थापनाच्या ५ ते ७ शाखांवर धाडी घातल्या. गोव्यात कळंगुट, वागातोर, बागा, मोरजी, हरमल, कांदोळी, कोलवा, बेतालभाटी या समुद्रकिनारी भागांतील हॉटेल, पब, रेस्टॉरंट यांमध्ये मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. ही आस्थापने आयकर चुकवण्याची शक्यता असल्याच्या संशयावरून आयकर विभागाने या धाडी घातल्या आहेत. या वेळी मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आल्याचे समजते.