उद्योगांसंबंधी व्यवहार सुलभपणे होण्यास प्रोत्साहन देणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत, गोवा

गोवा औद्योगिक महामंडळाचे नवीन बोधचिन्ह सादर करतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि शेजारी उद्योगमंत्री माविन गुदिन्हो

पणजी, २ जानेवारी (वार्ता.) : गोव्यातील उद्योगांमध्ये पालट करण्यास सरकार बांधील असून उद्योगांसंबंधी व्यवहार सुलभपणे कसे करता येतील, यासाठीची प्रक्रिया करण्यास प्रोत्साहन देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. गोवा औद्योगिक महामंडळाने नवीन बोधचिन्ह सिद्ध केले असून त्याचा प्रारंभ करण्याविषयीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

गोवा औद्योगिक महामंडळाचे नवीन बोधचिन्ह

डॉ. सावंत पुढे म्हणाले, ‘‘उद्योगांसंबंधी व्यवहार सुलभ झाल्यास ते उद्योग निर्यात करण्याची केंद्रे बनू शकतील. औद्योगिक क्षेत्रात पालट घडवून आणण्यास आम्ही बांधील आहोत. त्यामुळे उद्योग हे निर्यातीची केंद्रे बनतील. आज आम्ही गोवा औद्योगिक महामंडळासाठी नवीन बोधचिन्ह चालू केले आहे. गोव्यात अधिकाधिक गुंतवणूक झाली पाहिजे. यासाठी आम्ही २९ जानेवारी या दिवशी ताज कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ‘इनव्हेस्ट गोवा २०२४’ चालू करणार आहोत. गोवा औद्योगिक महामंडळाने वर्ष २०२३ मध्ये सिद्ध केलेल्या धोरणानुसार भूखंड खरेदी करणे आणि बांधकाम यासाठीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ‘एक खिडकी योजना’ चालू केली आहे. सरकारच्या धोरणामध्ये महिला उद्योजक, बौद्धिक मालमत्ता असणारे, नवीन उद्योग यांसाठी काही सवलती दिल्या आहेत.’’

उद्योगमंत्री माविन गुदिन्हो म्हणाले, ‘‘वर्ष २०२३ मधील नवीन नियमांनुसार भूखंड देण्यासंबंधीच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि टिकाऊपणा आणण्यासाठी सरकार बांधील आहे.’’ गोवा औद्योगिक महामंडळाचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड म्हणाले, ‘‘नवीन नियमावलीमध्ये भूखंड देण्याविषयीची प्रक्रिया दर्जात्मक आणि सुलभ होण्यावर भर देण्यात आला आहे.’’