धीट आणि देवाची ओढ असलेली ५४ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली खारघर, नवी मुंबई येथील चि. आर्वी अभिजीत जांभळे (वय १ वर्ष) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. आर्वी अभिजीत जांभळे ही या पिढीतील एक आहे !

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 ‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

३.१.२०२४ (मार्गशीर्ष कृष्ण सप्तमी) या दिवशी चि. आर्वी जांभळे हिचा प्रथम वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

चि. आर्वी अभिजीत जांभळे हिला प्रथम वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

चि. आर्वी जांभळे

१. जन्मापूर्वी

१ अ. गर्भधारणा होऊनही बाळ होण्यामध्ये अडचणी येणे : ‘आर्वीचा जन्म होण्यापूर्वी माझा ४ वेळा गर्भपात झाला. वर्ष २०१२ मध्ये मला पहिल्यांदा गर्भधारणा झाली. नंतर अनुमाने दीड ते २ मासांनंतर माझा गर्भपात झाला. वर्ष २०१४ मध्ये मला दुसर्‍यांदा गर्भधारणा झाली; पण २ मासानंतर बाळाच्या हृदयाचे ठोके बंद झाले. वर्ष २०१६ मध्ये मला पुन्हा बाळ होणार असल्याचे लक्षात आले; पण काही दिवसांत मला पुन्हा रक्तस्राव होऊन त्रास होऊ लागला. त्यानंतर पुन्हा वर्ष २०१९ मध्ये मला गर्भधारणा झाली; पण बाळ होण्यासाठी पुष्कळ अडचणी येणार होत्या. त्यामुळे माझे शरीर आणि मन यांवर प्रचंड परिणाम झाला. त्या वेळीही माझा गर्भपात झाला.

सौ. रेश्मा जांभळे

१ आ. दत्तात्रयाचे स्थान नरसोबाची वाडी येथे जाऊन विधी करणे : नंतर आम्ही माझी जन्मपत्रिका एका गुरुजींना दाखवली. त्यांनी सुचवल्याप्रमाणे आम्ही सहकुटुंब नरसोबाच्या वाडीला गेलो. आम्हाला तेथे जातांना अडचणीही आल्या, तरीही आम्ही तेथे जाऊन गुरुजींनी सुचवल्यानुसार सर्व विधी भाव ठेवून पूर्ण केले. आम्हाला तेथे शांतता अनुभवायला मिळाली.

१ इ. वर्ष २०२२ मध्ये गर्भधारणा होणे : वर्ष २०२२ मध्ये मला गर्भधारणा झाल्याचे कळल्यानंतर ९.५.२०२२ या दिवशी माझी रक्ततपासणी केली. त्याचे वैद्यकीय अहवाल चांगले आले. मला जुळी मुले होण्याचे लक्षण दिसत होते. ते माझ्यासाठी त्रासदायक होते. त्यानंतर २१.५.२०२२ माझी ‘सोनोग्राफी’ (टीप) केल्यावर ‘एकच बाळ आहे’, असे निदान झाले. त्यानंतर मला पुन्हा रक्तस्रावाचा त्रास चालू झाला. आधुनिक वैद्यांकडून औषधोपचार घेतल्यावर मला बरे वाटले.

टीप : सोनोग्राफी – विशिष्ट ध्वनीलहरींच्या साहाय्याने पोटातील अवयवांची चित्रे घेण्याची चाचणी

१ ई. एकदा मला सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांचा सत्संग लाभला.

२. शस्त्रकर्म करून बाळाचा जन्म होणे

मला नववा मास लागून ८ दिवस झाल्यानंतर आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘तुमच्या पोटातील पाण्याची पातळी अल्प झाली आहे.’’ १५.१२.२०२३ (मार्गशीर्ष कृष्ण सप्तमी) या दिवशी शस्त्रकर्म करून आर्वीचा जन्म झाला. तिचे जन्माच्या वेळचे वजन (२ किलो ६०० ग्रॅम) अल्प होते.

३. जन्मानंतर

३ अ. जन्म ते ३ मास

१. आर्वीच्या जन्मानंतर दुसर्‍याच दिवशी तिची रक्ततपासणी केली. त्या वेळी ती थोडीही रडली नाही. तेव्हा परिचारिका आम्हाला म्हणाल्या, ‘‘तुमची मुलगी धीट आहे.’’

२. आर्वीच्या रुग्णालयात असतांनाच तिची जन्मपत्रिका बनवली. तेव्हा ज्योतिषी बालिकेच्या वडिलांना म्हणाले, ‘‘मुलीच्या जन्मामुळे तुम्हाला पुष्कळ तेज मिळाले आहे. आर्वीची पत्रिका उत्तम असून १० मुलांच्या क्षमतेएवढी एक मुलगी तुम्हाला श्री गुरूंनी दिली आहे.’’

३ अ ३. बाळ रडायचे न थांबणे आणि श्री गणेशाचा नामजप केल्यावर बाळ शांत होणे : आर्वी काही दिवस रात्री ९ ते १ वाजेपर्यंत सतत रडत असे. तिला रुग्णालयात घेऊन गेल्यावर ती शांत होत असे. आधुनिक वैद्य तिला तपासून सांगत असत, ‘‘बाळ एकदम ठीक आहे’’; मात्र आम्हाला आर्वीच्या रडण्याचे कारण समजत नव्हते. तेव्हा आम्ही रेणुकामातेच्या भक्त असलेल्या एका काकूंना आर्वीचे छायाचित्र दाखवले. त्यांनी बाळासाठी देवीला प्रार्थना केली. त्यानंतर त्या आम्हाला म्हणाल्या, ‘‘हे बाळ अत्यंत दैवी आहे. तुमच्या बाळाला कसलाही त्रास नाही आणि देवीआईचे तिच्यावर लक्ष आहे.’’ त्यांनी आम्हाला श्री गणेशाचा नामजप करायला सांगितला. त्यानंतर आर्वी एकदम शांत झाली

३ आ. ४ मास ते १ वर्ष

१. एकदा गुरुवारच्या भक्तीसत्संगात प्रभु श्रीरामचंद्राविषयी भक्तीगीत चालू होते. आर्वी ते भक्तीगीत आनंदाने आणि मन लावून ऐकत होती. आर्वी ते भक्तीगीत म्हणण्याचा प्रयत्न करत होती.

२. एकदा आर्वीला १०३ अंश फॅरनहाईट एवढा ताप होता. तेव्हा तिला सलग २ दिवस ताप असूनही तिने मुळीच त्रास दिला नाही.’

– सौ. रेश्मा अभिजीत जांभळे (चि. आर्वीची आई), खारघर, नवी मुंबई.

३. ‘आर्वी जन्मापासूनच सात्त्विक आहे. तिच्याकडे पाहून चैतन्य जाणवते.’

– सौ. अश्विनी सूरज सूर्यवंशी (चि. आर्वीची मावशी), खारघर, नवी मुंबई.

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १९.१२.२०२३)

  • यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक