Pakistan Air Force China : भारताला शह देण्यासाठी पाकने चीनकडून घेतलेली विमाने निरुपयोगी : पाकची कोट्यवधी रुपयांची फसवणूक !

इस्लामाबाद – चीनकडून पाकची पुन्हा एकदा कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. यामुळे पाकिस्तानी वायूदल यावर्षी त्याचे ‘झेडडीके-०३ काराकोरम ईगल एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल’ ही लढाऊ विमाने वायूदलातून निवृत्त करणार आहे. भारताने इस्रायलकडून खरेदी केलेल्या ‘अवाक्स’ विमानांना सामोरे जाण्यासाठी पाकिस्तानने चीनकडून कोट्यवधी रुपयांची चार ‘झेडडीके-०३ काराकोरम’ विमाने खरेदी केली होती, जी निरुपयोगी ठरली आहेत. त्यामुळे पाकचे वायूदल आता हवाई देखरेखीसाठी स्वीडिश कंपनी ‘साब’ने बनवलेल्या ‘२००० इरिए अवाक्स’ विमानांवर अवलंबून असेल.

तज्ज्ञांच्या मते, पाकचे ‘झेडडीके-०३ काराकोरम’ची रचना चीनच्या ‘शांक्सी व्हाई ८’ या विमानानुसार करण्यात आली आहे. या विमानांच्या खरेदीनंतर पाकिस्तानने दावा केला होता की, या विमानांद्वारे त्यांना लांब अंतरापर्यंत पाळत ठेवणे शक्य होणार आहे. पाक या विमानांद्वारे भारतासमवेत अफगाणिस्तानच्या हालचालींवरही लक्ष ठेवणार होता.

वर्ष २०११ ते २०१५ या कालावधीत चीनने पाकला या विमानांचा पुरवठा केला होता. पाकने ही विमाने निवृत्त करण्याविषयी अचानक घेतलेल्या निर्णयामुळे चीनच्या या विमानांची क्षमता आणि विश्‍वासार्हता यांवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले. या चिनी विमानांना तांत्रिक अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले. स्वीडिनचे ‘२००० इरिए अवाक्स’ हे विमान पाकिस्तानी वायूदलात अत्यंत प्रभावी आणि विश्‍वासार्ह मानले जाते. तथापि त्यांची संख्या फारच अल्प आहे. त्यामुळेच पाक सैन्याने आता मोठ्या शस्त्रास्त्रांसाठी अमेरिकेसह पाश्‍चात्त्य देशांकडे मोर्चा वळवला आहे.

संपादकीय भूमिका

पाकची आर्थिक स्थिती आधीच अत्यंत खालावली आहे, त्यात चीनकडून झालेल्या या फसवणुकीने आणखीच भर घातली आहे ! चीनच्या नादी लागल्यावर दुसरे काय होणार ?