सातारा, १ जानेवारी (वार्ता.) – नवीन ‘भारतीय संहिता २०२३’ नुसार अपघातातील चालकाला १० वर्षे कारावासाची शिक्षा करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक उद्योग धोक्यात आला आहे. ‘हिट अँड रन’च्या प्रस्ताविक कायद्यांतर्गत कठोर तरतुदींविषयी भारतातील रस्ते वाहतूक क्षेत्र तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहे. या कायद्यावर कार्यवाही झाल्यास देशव्यापी वाहतूक बंद होईल, अशी चेतावणी ‘ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस’ कार्यकारिणीचे सदस्य प्रकाश गवळी यांनी दिली आहे.
प्रकाश गवळी म्हणाले, ‘‘प्रस्तावित कायद्यात अनेक त्रुटी आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देणारे वाहतूक क्षेत्र आणि ट्रकचालक या कायद्याच्या संभाव्य परिणामांविषयी भयभीत झाले आहेत. शिक्षेमुळे चालकांमध्ये अराजक स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे काहीजण व्यवसाय बंद करत आहेत. त्यामुळे हा उद्योग धोक्यात आला आहे. चालकांविना वाहतूक व्यवसाय ठप्प होऊन कोट्यवधी लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. प्रस्तावित कायदा वाहतूक क्षेत्रातील प्रतिनिधींशी कोणतीही चर्चा केल्याविना सादर करण्यात आला आहे.’’