करणी सेनेच्या वतीने पोलीस, प्रशासन आणि पुरातत्व विभाग यांच्याकडे तक्रार
पणजी, ३१ डिसेंबर (वार्ता.) : शंखवाळ (सांकवाळ) येथील ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसा स्थळी (पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराची भूमी असलेले ठिकाण) जानेवारी २०२४ मध्ये होणार्या फेस्ताच्या पार्श्वभूमीवर अवैधरित्या बांधकाम केले जात आहे. यासंबंधी ‘करणी सेने’चे संतोषसिंह राजपूत यांनी वेर्णा पोलीस ठाणे, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी आणि पुरातत्व विभागाचे संचालक यांच्याकडे लेखी तक्रार नोंदवली आहे; मात्र यासंबंधी अजूनही कोणतीच कारवाई झालेली नाही.
वास्तविक वारसा स्थळाच्या १०० मीटर अंतरात पुरातत्व खात्याच्या अनुमतीविना कोणतेच बांधकाम करता येत नाही. ‘करणी सेने’ने तक्रारीत म्हटले आहे की, संबंधित बांधकामामुळे सांस्कृतिक वारसा स्थळाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई करावी आणि अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कठोर उपाययोजना आखाव्यात.